“यशाची पायरी गाठण्यासाठी मनाची साधना महत्वाची”: विष्णू संकपाळ
शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेचे परीक्षण

“यशाची पायरी गाठण्यासाठी मनाची साधना महत्वाची”: विष्णू संकपाळ
शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेचे परीक्षण
“असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे” जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे हे शब्द अजरामर आहेत. क्षेत्र कोणतेही असो, निश्चित ध्येय आणि त्यासाठी झपाटलेपण असेल तर यश दूर नाही. चिरस्थायी यशासाठी कठोर परिश्रमाला पर्याय नाही. एखादी गोष्ट टाळण्यासाठी हजार कारणे असू शकतात पण असाध्य ते साध्य करण्यासाठी केवळ मेहनत, जिद्द आणि चिकाटी पुरेशी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की “तुम्ही गरिबीत जन्मलात हा तुमचा दोष नाही. मात्र गरिबीतच मेलात तर मात्र तुमचाच दोष आहे. मिसाईल मॅन अब्दुल कलाम म्हणतात. निश्चित ध्येय प्राप्तीसाठी झोप उडवणारे स्वप्न पाहा. आणि त्याचा अविरत पाठपुरावा करा. इतकेच काय काल परवा आयपीएस अधिकारी बनलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील यमगे या खेडेगावातील मेंढपाळाचा मुलगा बिरदेव डोणे सुद्धा म्हणतात की, मेंढ्या चारण्याच्या कामापेक्षा अभ्यास सोपा वाटला अस्थिरतेकडून स्थिरतेचा मार्ग निवडला त्यासाठी जीवतोड मेहनत घेतली. तसेच पुणे जिल्ह्य़ातील भोर या दुर्गम भागातील आदिती पारठे ही मुलगी कठोर मेहनतीच्या जोरावर नासापर्यंत पोहचली. दहावी बारावी निकालानंतर पेपरमध्ये अशी अनेक उदाहरणे वाचनात येतात. रेल्वे पटरी शेजारी पत्र्याच्या घरात राहणारा एखादा विद्यार्थी उत्तुंग यश मिळवतो. एखाद्या हमालाची मुलगी गगनभरारी घेऊ शकते. खेडोपाड्यात जाऊन बघाल तर चार सहा किमी अनवाणी पायांनी चालत जाऊन शिकणारी मुले कोणत्याही संसाधनाशिवाय केवल अक्कलहुशारीने धवल यशाचे मानकरी ठरलेत.
जिप शाळेत शिक्षण आणि घरी गुरेढोरे राखून. गोठ्यात किंवा परसदारच्या झाडाखाली अभ्यास, एकमेकांशी चर्चा हेच ट्यूशन.शिक्षकांचे मार्गदर्शन हेच निष्ठा, आणि कोणत्याही गोंगाटात मनाची एकाग्रता साधण्याची कला. अशा मुलांना महागडे मोबाईल, काँप्युटर, महागडी ट्यूशन्स, अत्याधुनिक सोयी सुविधा, याची कमी कधीच जाणवत नाही. कारण परिस्थिती बदलण्याची वज्रनिर्धारी मनस्थिती हेच तर यांचे लक्ष्य असते. त्यामुळे त्यांचे चित्त कोणत्याही परिस्थितीत विचलित होत नाही. उलट केवळ साधने संसाधना पेक्षा कठोर साधना करण्यावरच यांचा ठाम भरोसा असतो.. आणि हीच मुले इतिहास रचतात.
काल ‘शुक्रवारीय हायकू काव्य’ स्पर्धेसाठी समूह प्रमुख आदरणीय राहुल दादांनी दिलेले चित्र पाहता हीच गोष्ट चटकन लक्षात येते. एखाद्या दुर्गम खेड्यातील गवताच्या झावळ्याचे छप्पर वजा घर आणि त्याच्या अंगणात बांबूच्या आधाराने डोक्यावर सावली पुरता उभारलेला आसरा. तेथेच खुल्या हवेत एकाग्रतेने अभ्यास करणारी मुले. आजूबाजूला पडलेल्या अनेक वस्तू आणि गोंगाट सुद्धा असू शकतो. मात्र अभ्यास आणि शिकण्याची गोडी असेल तर अशा कोणत्याही विपरीत परिस्थितीवर मात करण्याचा आत्मविश्वास निर्माण होतोच. याचेच हे ज्वलंत उदाहरण आहे.
बुद्धीचे दान देताना ईश्वर गरीब श्रीमंत असा भेदभाव करत नाही. काहींचा जन्म तोंडात सोन्याचा चमचा घेऊन होतो तर कांहीचा जन्म आठरा विश्व दारिद्रय असलेल्या घरात होतो. यात कुणाचा काही दोष नसतो. मात्र समज खूप महत्वाची असते. ज्यांना ती उमजली त्यांनी परिस्थिती बदलली. अशा लक्षवेधी चित्रावर अपेक्षेनुसार हायकू रचनांची बरसात झाली. विषय तुलनेत सोपा असल्याने कल्पकतेला खूप वाव होता. चित्र अतिशय बोलके होते. ज्यातून अचूक शब्दवेध घेणे सहज शक्य होते. अनेकांनी खूप सुंदर रचनांची पेशकश केली. सर्वांच्या लेखणीला शुभेच्छा आणि मला परिक्षणाची संधी दिल्याबद्दल आ. राहुल दादांचे मनःपूर्वक आभार..
विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर
©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह





