“नवीन पर्वाची सुरूवात – न्यु मून स्कूलमध्ये प्रवेशोत्सवाने गजबजला पहिला दिवस”
तारका रूखमोडे प्रतिनिधी गोंदिया
“नवीन पर्वाची सुरूवात – न्यु मून स्कूलमध्ये प्रवेशोत्सवाने गजबजला पहिला दिवस”
तारका रूखमोडे प्रतिनिधी गोंदिया
अर्जुनी /मोरगाव: न्यु मून इंग्लिश मिडीयम स्कूल तथा सायन्स ज्युनिअर कॉलेज अर्जुनी/मोर. येथे नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात मोठ्या उत्साहात व जल्लोषात करण्यात आली. पहिल्याच दिवशी शाळेचं प्रांगण उमलत्या भावचेहऱ्यांनी आणि उत्साही पालकांनी गजबजून गेलं होतं.
फुलांनी सजवलेले शाळेचे स्वागतद्वार, मधूर संगीत, व विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सज्ज शिक्षकांचा आनंदी स्वागतघोष यामुळे वातावरण भारावून गेले होते. विद्यार्थ्यांचे औक्षण करून व गुलाब पुष्प देऊन,टाळ्यांच्या गजरात आणि गाण्यांच्या सुरात शाळेत प्रवेश देण्यात आला.सुरेख आकर्षण म्हणजे महिला शिक्षिकांनी वेलकम नृत्य सादर करत विद्यार्थ्यांचे स्वागत केले.व चिमुकल्यांच्या हस्तठशाने चित्रतरू निर्माण केला गेला.
मागील वर्षातील वर्ग पहिलीचा विद्यार्थी रीशांत मुनेश्वर याने इंडियन टॅलेंट ओलंपियाड परीक्षेमध्ये गणित या विषयात महाराष्ट्रातून 18 वी रँक प्राप्त करून शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे. त्यामुळे मान्यवरांच्या हस्ते रीशांतला मेडल,प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. सोबतच सहकारी शिक्षकांचे कौतुक करण्यात आले.या प्रसंगी मान्यवर म्हणून संस्थासचिव ओमप्रकाशसिंह पवार,,राकेश उंदिरवाडे,तारका रुखमोडे, त्रिवेणी थेर,चेतना मेश्राम उपस्थित होते.
“शाळा ही केवळ अभ्यासाची जागा नसून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे मंदिर आहे. जिज्ञासू वृत्ती, सकारात्मक विचार आणि सातत्यपूर्ण प्रयत्न या गोष्टी विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये जोपासाव्यात.अशा उर्जादायी शुभेच्छा मान्यवरांनी नवीन शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना दिल्या व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला.
पहिल्याच दिवशी विद्यार्थी आपापल्या वर्गात नव्या उमेदीनं बसले. प्रवेशाचा हा आनंदोत्सव शाळेच्या सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे संस्मरणीय ठरला.





