0
4
8
2
9
0
पटांगण
चिरेबंदी वाड्यासमोर
पटांगण मोठे नि छान
गोटया चेंडू विटीदांडू
खेळताना हरवते भान…!!
पटांगणात बसल्यावर
दूरदूर पळून जाते थंडी
गोळया बिस्कीट लपवी
आजोबांची जादूई बंडी…!!
पटांगणात झाडे आहेत
उन्हाळ्यात सावली गार
चिंचा बोरे जांभूळ आणि
पाडाचे आंबे गोड फार…!!
सुट्टीमध्ये सुरपारंब्याचा
आम्हा मुलांना आवडतो
खारुताई सारखा जो तो
पटकन झाडावर चढतो…!!
रात्रीची अंगतपंगत सुद्धा
पटांगणात आमची छान
सर्व जेवतात सोबत येथे
स्त्री पुरुष मोठे नि लहान…!!
सिमेंटच्या जंगलात आता
पटांगण मुलांना दिसेना
एकलकोंडी माणसे झाली
कोणी कोणाजवळ बसेना…!!
राजश्री मिसाळ ढाकणे
ता.जि.बीड
========
0
4
8
2
9
0



