
कुटुंब कबिला
पणजोबा पणजीची..
वडाची छाया..
आजोबा आजीची…
आभाळमाया…
कर्ते सवरते मायबाप..
सांभाळतात सारा व्याप..
पोरे बाळे, लेकी सूना..
नातवंडांचा गलका झाला..
आहे का असा कुटुंब कबिला…?
वडिलधारे जरी अडाणी..
दुनियादारीचा अभ्यास चोख..
खरेदी, विक्री, व्यवहार ज्ञान..
तोंडपाठ हिशेब रोख ठोक…
पणजीचा अनुभव, आजीचा बटवा..
घरातल्या घरात दवाखाना नटवा..
वडिलधार्यांचा सर्वांना आदर..
पोरासोरांची मोठ्यांना कदर…
दुखणे, खुपणे, आजार जखम ..
सार्यावर मिळे मायेचा मलम..
एकाच छताखाली असा..
सुखे नांदतो गोतावळा…
आहे का असा कुटुंब कबिला…?
गूरं , ढोरं, शेरडं , बकरं…
कोंबडं, कुत्रं सारीच लेकरं..
परस, ओटा , अंगण, गोठा ..
शेती वाडी आनंद मोठा..
विनातक्रार पडेल ते काम…
घर म्हणजे गोकुळ धाम…
पै पाव्हणे, इष्ट, मित्र…
गणगोत्र राबता अहोरात्र..
सरबराई, ख्याली खुशाली..
अंगत पंगत जेवणावळी…
सणवार, कपडा लत्ता…
आहेर माहेर लेकी येता..
नणंद भावजय चेष्टा मस्करी..
नाती गोती जशी श्रीखंड पुरी..
दरवर्षी हलतो घरात पाळणा
आनंदी आनंद नवा पाहुणा..
ना आळस किळस हागलं मुतलं…
न्हाणं धुणं. बाळोतं धुतलं..
अस्सल माया ममतेचा..
अखंड झरा खळखळता..
अनुभवले का कुणी..
अशा स्वर्ग सुखाला…?
जिथे तिथे दिसावा…
असा कुटुंब कबिला…!!
विष्णू संकपाळ, बजाजनगर
छ. संभाजीनगर





