कानापेक्षा जास्त विश्वास, डोळ्यावर ठेवून निर्णय घ्यावा; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेचे परीक्षण

कानापेक्षा जास्त विश्वास, डोळ्यावर ठेवून निर्णय घ्यावा; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेचे परीक्षण
प्रत्येक ऐकीव गोष्टीवर संपूर्ण विश्वास ठेवू नये, कारण अशा कोणत्याही घटनेचे तीन पैलू असतात. एक सांगणार्याचा, दोन ऐकणार्याचा, आणि तिसरा अत्यंत महत्वाचा पैलू म्हणजे सत्य.! एकच असत्य अनेकांच्या तोंडून ऐकले की ती सत्य वाटू लागते. मात्र ते पूर्णसत्य नसते. आणि संपूर्ण खातरजमा झाल्याशिवाय ऐकीव अर्धसत्याला पूर्ण सत्य मानणे म्हणजे अफवांना खतपाणी घालण्यासारखे असते. असे बोलले जाते की, कान आणि डोळे यात चार बोटांचे अंतर असते. या दोन्हींचा योग्य ताळमेळ साधला नाही तर दोन व्यक्तीमधले हेच अंतर अधिकाधिक रूंदावत जाते. ज्यामुळे नात्यात खूप मोठी दरी निर्माण होऊ शकते. फक्त दोन व्यक्तीच नाही तर समाज, जात, धर्म या पातळीवर सुद्धा अशा अफवा तेढ निर्माण करू शकतात. सामाजिक सौख्य सलोखा, कायदा सुव्यवस्था गोत्यात येऊ शकते..एखादी अशी अफवा जातीय दंगल निर्माण करू शकते.. त्यामुळे अशा काही ऐकीव गोष्टींचा प्रचार प्रसार करणे प्रचंड धोकादायक ठरू शकते.
याच गोष्टींची दुसरी बाजू म्हणजे कांही व्यक्तींना इतरांचे कान भरण्यात खूप स्वारस्य असते. याला चुगलखोरी असे सुद्धा म्हंटले जाते. इकडचे तिकडे तिकडचे इकडे करून काही चांगल्या नातेसंबंधात विष कालवण्याचे काम पद्धतशीरपणे केले जाते. अशा वेळी मात्र अशा तिसर्या व्यक्तीच्या सांगण्यावर विश्वास दाखवण्यापूर्वी सारासार विवेक बुद्धीने योग्य विचार करून निर्णय घ्यावा. जेणेकरून चांगली विश्वासू नाती उध्वस्त होणार नाहीत. म्हणून चहाड्या, चुगल्या, अफवा हा एक शाप आहे. जो आपसातील ऋणानुबंध, दृढ विश्वासालाही सुरूंग लावतो. याचे खूप दूरगामी परिणाम होतात. कधी कधी अशा चुगलखोरीने दोघांचे भांडण तिसर्याचा लाभ होऊ शकतो. त्यामुळे कानापेक्षा डोळ्यावर जास्त विश्वास ठेवून, डोक्याने निर्णय घेणे जास्त महत्वाचे.
*भरले कान*
*सत्याचा विपर्यास*
*तुटे विश्वास*
काल शुक्रवारीय हायकू काव्य स्पर्धेसाठी आ. राहूल सरांनी दिलेला चित्र विषय याच आशयाचा होता. किंबहुना आपल्या अवतीभोवती असे प्रकार सर्रास चालतातच. आणि याच गोष्टीला हायकू च्या माध्यमातून वाचा फोडण्याचे जबाबदारी शिलेदारांवर सोपवली. समूहात फेरफटका मारल्यानंतर लक्षात आले की अनेकांनी अतिशय कल्पक मार्मिक शेरेबाजी केली आहे. या चित्रविषयाला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न जरूर झाला आहे. शिवाय हायकू काव्य प्रकारात अनेकांच्या लेखण्या अगदी सफाईदारपणे पेश होताहेत. सर्वांच्या हायकू वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आज मला परिक्षण लिहिण्याची संधी दिल्याबद्दल आ. राहूल दादा आणि समूह प्रशासनाचा मी आभारी आहे.
विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर
©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह





