पाऊले चालती शाळेची वाट
अनिता व्यवहारे ता श्रीरामपूर जि अहमदनगर

पाऊले चालती शाळेची वाट
“Good morning Madam…!” शब्द कानावर आले आणि हायसं वाटलं…! Good day मुलांनो, म्हणून मी ही मुलांना प्रतिसाद दिला. माझ्या या वाक्यावर खाली बसणारी मुले आज उभीच होती. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आणि चेहऱ्यावर आनंद दिसत होता. त्याला कारण मी 31/05/2024 ला सेवानिवृत्त झाले आणि त्यानंतर मुलांना भेटलेच नाही. त्यांना भेटण्याची तीव्र इच्छा झाल्यामुळे मी शाळेत आले होते. मी आज शाळेत येईल याची मुलांना अजिबात कल्पना नव्हती. म्हणूनच मला पाहून त्यांना आश्चर्य वाटले.सर्व वर्ग चालू होते. मी इयत्ता नववीच्या वर्गात गेले. आज आपण शिकवण्यासाठी नव्हे तर मुलांना भेटण्यासाठी आलोय हे मी विसरून गेले.नेहमीप्रमाणे त्यांना प्रश्न विचारू लागले, काय मुलांनो अभ्यास करताय ना!अपेक्षा कुठय, महेश रोज येतो ना? गणेशचं काय चाललं?अशा प्रश्नांची सरबत्ती चालूच होती.
मुले ही नेहमीप्रमाणे माझ्याशी मनमोकळं बोलत होती.खूप दिवसांनी त्यांच्या मनातलं मला सांगायला ती उत्सुक दिसली. पण माझ्याकडे वेळ कमी असल्यामुळे आणि मला प्रत्येक वर्गात जायचं असल्याने त्यांचा निरोप घेऊन मी दहावीच्या वर्गाकडे वळले. तिथे गणिताचा तास चालू होता. परंतु मला आलेलं पाहिल्यामुळे त्यांचे तिथे लक्ष लागत नव्हते. मी देखील विचार न करता तास संपण्याची वाट न बघता त्यांच्या वर्गात गेले. त्यांच्या चेहऱ्यावरही आनंद झळकत होता. ‘जणू इतका वेळ चेहऱ्यावर प्लस मायनस चा झालेला गोंधळ आता आनंदाच्या मल्टिप्लाय मध्ये वर्ग झाला होता’. मुलींना तर खूपच आनंद झाला होता.तुम्ही आता पुन्हा आम्हाला शिकवायला या, असचं त्या जणू सांगत होत्या.
विशेष करून नववी, दहावीच्या मुलींचं आणि माझं खास bonding होतं. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर लटका रुसवा दिसून येत होता. जणू त्या माझ्यावर रुसल्या होत्या. त्यांना खूप काही बोलायचं होतं.तब्बल दोन अडीच महिन्यानंतर खूप काही गमती जमती असतील, काही विशेष प्रसंग असतील ते सर्व माझ्याशी शेअर करायचे होते.त्याचं कारण त्यांचं माझ्याशी नातं शिक्षिक-विद्यार्थी एवढंच नव्हतं तर आई व मुलगी आणि मैत्रीच देखील होत. त्यामुळेच असाव बहुदा. त्या वर्गातून पाय निघत नव्हता परंतु प्रत्येक वर्गातल्या मुलांना मला भेटायचं म्हणून मी निघाले आठवी,सातवी, सहावी प्रत्येक वर्गात तोच अनुभव.ओ मॅडम..! तुम्ही आल्या का? आता रोज येणार का? छोट्या मुलांना माझ्याशी बोलायचं होतं पण काय बोलावं हेच सुचत नव्हतं.
तो काय म्हणतो, तिला तुम्हाला काहीतरी सांगायचय अस म्हणत एकमेकांवर ढकलत होते. तेवढ्यात सातवीतील समिक्षा आली आणि पटकन म्हणाली, मॅडम तुम्ही कशा आहात? बऱ्या आहात ना! मला तिचं कौतुक वाटलं.किती आस्थेने चौकशी करीत होती. पूजा, आरती सख्या बहिणी पण जिवलग मैत्रिणी.एक सहावीत आणि एक नववीत. दोघी एकत्रच भेटल्या.मोठी पूजा थोडी साधी भोळी पण छोटी आरती. मला मागच्या वर्षीच्या सहलीतला प्रसंग आठवला पूजा आमची साधी भोळी. आणि छोटी आरती तितकीच चुणचुणीत. प्रत्येक ठिकाणी बस थांबल्यावर बहिणीची चौकशी करणारी. अगदी तिचा आवरून देणं, मेकअप करणं सगळं आरती स्वतःच करायची.एखादी वस्तू मला नको पण माझ्या दीदीला द्या म्हणणारी आरती आजही त्या बहिणी सोबतच होती. गौरी, सृष्टीचं लाजून हसणं मला नेहमीच आवडायचं. आजही तेच. मुलं माझ्या भोवती ये जा करत होती.एखाद्या मुलाकडे माझी नजर गेली नाही तर,तो मुद्दाम माझ्या पुढे मागे यायचा- जायचा.
मॅडमने आपल्याशी काहीतरी बोलावं असं त्यांना वाटायचं.लाडू,मोदक अभिजीत धन्नो, कार्तिकी, पायल सगळेच माझ्या भोवती पिंगा घालत होते.गौरी आरती माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या,” मॅडम मागच्या वेळेस तुम्ही म्हणाल्या होत्या आम्हाला राष्ट्रगीतात घेऊ. आता या वर्षी आम्हाला राष्ट्रगीतात भाग घ्यायचा आहे.लाडूला भाषणात भाग घ्यायचा होता तर अभिजीत सांगत होता माझं लोकमान्य टिळकांचे भाषण पाठ आहे. रोन्या चं (रोहन )गुरु पौर्णिमेनिमित्त भाषण होतं. एक रोहन दुसऱ्या रोहन बद्दल सांगत होता. मॅडम रोहनचा दहा तारखेला वाढदिवस आहे. असं सगळं ऐकून मला गलबलून येत होतं. साई, करण आता भांडण करीत नाही. त्यांचं हे सगळं ऐकताना मला चुटपुट लागून राहिली होती.आता मी येणार नाही सांगायला नको वाटत होतं. शेवटी पाचवीच्या वर्गात गेले सगळे चेहरे नविन.पण त्यांना मात्र मी नविन नव्हत. माझं नाव मी काय आणि कसं शिकवते हे माहीत असल्यासारखं ते सांगत होते. माझ्याशी दोस्ती करू पाहत होते.मला ओळखलं का? म्हणताच एका मुलीने उभं राहून सांगितलं,मॅडम तुम्ही अनिता व्यवहारे मॅडम…तुम्ही सगळ्या वर्गाला मराठी शिकवतात..भाषण लिहून देता… अशी यादीच तिच्याकडे होती.
एव्हाना सगळी शाळाच माझ्या भोवती गोळा झाली होती. पण मला फारसा वेळ नसल्यामुळे तिथे थांबणे शक्य नव्हतं. तेव्हा मी सर्व मुलांना बाय करून त्यांचा निरोप घेत होते. मी निघाले तशी इतका वेळची किलबिल शांत झाली. मी गाडीत बसले तेव्हा गाडी जवळ सगळी मुलं गोळा झाले इतक्यात गणेशचा छोटा भाऊ तसा जरा आगाऊचं…गाडी जवळ आला आणि माझ्याशी काही बोलणार तोच मी हात बाहेर काढून त्याला म्हटलं, “अरे आज पासून आपण दोघं दोस्त” त्याच्याशी केलेलं ते हस्तांदोलन हाताला मायेचा ओलावा देऊन गेलं आणि मी सर्व विद्यार्थी शिक्षक शाळा यांचा निरोप घेतला…! पावलांनी सोडली होती जरी वाट शाळेची…! तरी ओढ काही थांबत नव्हती
चिमुकल्यांच्या भेटीची… “
अनिता व्यवहारे
ता श्रीरामपूर जि अहमदनगर
=========





