‘साखरचुंबन :प्रेमाचा आविष्कार’; वृंदा करमरकर
सोमवारीय काव्यत्रिवेणी स्पर्धेचे परीक्षण

‘साखरचुंबन :प्रेमाचा आविष्कार’; वृंदा करमरकर
सोमवारीय काव्यत्रिवेणी स्पर्धेचे परीक्षण
“येशील येशील येशील राणी
पहाटे पहाटे येशील,
तुझिया माझिया प्रेमाची पावती
साखरचुंबन देशील..”
आजच्या विषयाच्या अनुषंगानं आज हे गीत आठवलं. खरंच प्रेम ही एक दैवी देणगी आहे. जगात प्रेम आहे म्हणून या जगात जगण्याचं संजीवक आहे. प्रेमाला अनेक पदर आहेत.अंतरंगातून एखाद्या विषयी वाटणारी ओढ, असोशी म्हणजेच प्रेम. प्रेम म्हणजे वात्सल्य, प्रेम म्हणजे ममता
प्रेम म्हणजे ओढ, प्रेम म्हणजे त्याग, समर्पण.प्रसूतीच्या जीव घेण्या कळा सोसल्यानंतर आपल्या कुशीत झोपलेल्या त्या नवजात अर्भकाचं आई साखरचुंबन घेते. त्यात वात्सल्य रस ओतप्रोत भरलेला असतो. प्रेम व्यक्त करण्याचे साधन म्हणजे आलिंगन,चुंबन.
वास्तविक या निसर्गात ठायीठायी प्रेमाची अनुभूती येते. सकाळी सूर्य उगवतो त्यावेळी तो आवेगानं प्राचीचं चुंबन घेतो आणि ही पूर्वा लाजून लाल होते. पौर्णिमेच्या रात्री नभातील उगवलेलं पूर्ण चंद्रबिंब पाहून सागराला भरती येते. सागर लाटा उंच उंच उसळ्या घेत चंद्राचं चुंबन घेण्यासाठी आतुर होतात. शेवटी चंद्रबिंब त्या मीलनोत्सुक लाटांना आवेगाने कवेत घेतो. कमलिनीच्या धुंद गंधानं वेडावलेला भुंगा रात्री त्या कमलपाशात बध्द होतो. कमलिनीचं चुंबन घेताना त्याला रात्र झाल्याचं भानही रहात नाही. फुलाफुलांभवती रुंजी घालणारा भुंगा ही त्या पुष्पदलांना चुंबतच असतो. सृष्टीतील झाडं, वेली, पशुपक्षी सारी प्रणयधुंद असताना माणूस तरी याला अपवाद असेल का?
‘साखरचुंबन’ हा एक मधुर आविष्कार आहे. मिलनोत्सुक पती पत्नीतील प्रेमाची देवाणघेवाण. प्रियकर प्रेयसातील ते मधुर क्षण, आजन्म लक्षात राहतात. आईनं बाळाचं घेतलेलं साखरचुंबन असो, कि सीमेवर लढण्यासाठी जाणाऱ्या आपल्या वीरपुत्राचं औक्षण करताना आईनं त्याच्या कपाळाचं घेतलेलं चुंबन मनाचे भाव सांगून जातात. मुलीच्या पाठवणी वेळी पिता आपल्या मुलीला आशिर्वाद देताना तिचा माथा चुंबतो. कधी एखाद्याचे हात हातात घेऊन त्यावर ओठ टेकले तरी तो कृतज्ञतेचा क्षण असतो. एकंदरीत साखर चुंबन हा प्रेमाचा आविष्कार असतो. भावनांचं प्रगटीकरण असतं.
आजच्या त्रिवेणी काव्य स्पर्धेसाठी आदरणीय राहुल सरांनी दिलेला जरा हटके असा हा विषय आहे.हलकाफुलका विषय आहे. शिलेदारांनी पण रचना साकार करुन स्पर्धेला उत्फुर्त प्रतिसाद दिला. त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन.
वृंदा(चित्रा)करमरकर
मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक
सांगली जिल्हा सांगली
©मराठीचे शिलेदार समूह





