प्रार्थना आणि माणूस
अनिता व्यवहारे ता. श्रीरामपूर जि. अहमदनगर
प्रार्थना आणि माणूस
‘सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना, तिमिरातुनी तेजाकडे प्रभू आमच्या ने जीवना.’ शाळेचा परिपाठ, मुले प्रार्थनेत दंग झालेली. शे दोनशे मुलांच्या तोंडून येणारी प्रार्थना ही त्या वातावरणात पावित्र्य निर्माण करणारी होती. माझे ही मन प्रसन्न झाले होते. पण आता ते विचारांच्या भाऊगर्दीत गुरफटले होते. प्रार्थना, म्हणजे देवाची स्तुती तर आहे. पण देवाकडे ती करताना त्यात आपण काही ना काही मागणं मागत असतो. आपल्या या संतांच्या भूमीत ‘हे विश्वची माझे घर’ म्हणत सर्व संतांनी देवाकडे मानव कल्याणच मागितले. माणसाच्या वृत्तीत बदल होऊ दे, आरोग्य लाभू दे, वगैरे ते सर्वांसाठी मागतात. सर्वांच कल्याण व्हावं असं त्यांना वाटतं कारण ते संत आहेत. आपण मानवाला दोष देतो. तो स्वार्थी आहे, मतलबी आहे, खोटारडा आहे, चोर आहे. पण तो माणूस सुद्धा देवाकडे प्रार्थना करतोचं ना! तरीही त्याला वाईट ठरवलं जातं.
अर्थात तो वाईट नाहीचं.! त्याची वृत्ती तर चांगली असते. पण त्याची प्रवृत्ती त्यातून निर्माण होणारी विकृती आणि त्यामुळे त्यातून त्याची विचारांची पद्धती बदलत चालते. अर्थात बऱ्याच अंशी याला परिस्थिती वेळ आणि कधी कधी अचानक आलेला अनुभव या सर्व गोष्टी कारणीभूत असतात. सर्वच माणसं वाईट नसतात अगदी शंभरात एखादा. माझं माणसाविषयी असं मत होण्याचं कारण म्हणजे या प्रार्थना…! ‘प्रभूची लेकरे सारी तयाला सर्व ही प्यारी, कुणा ना तुच्छ लेखावे जगाला प्रेम अर्पावे..’! ही प्रार्थना करणारा माणूसच ना! सर्वजण फक्त म्हणायचे म्हणून प्रार्थना म्हणणारे नसतात. आणि तसं ही असलं तरी, जेव्हा देवाकडे प्रार्थना केली जाते आणि समूहातून केली जाते तेव्हा तिथे मनोभावे म्हणणारे कोणीतरी असेलच ना! मग ती येतेच फळाला.!
‘मनुष्य जन्म हा खरा, तर एखाद्या धुतल्या तांदळासारखा’, तर कधी कधी, पण काही असो. खूप विचार करण्यापेक्षा मी एवढेच म्हणेन, ‘माणूस कसा ही असो मनुष्यजन्म लाभणे ही भाग्याची गोष्ट’. त्याला भगवंताने बनवले त्यावेळी एका बाजूला विवेक आणि दुसऱ्या बाजूला विचार दिले असावेत. विवेक चांगल्या कर्माकडे नेतो आणि विकार वाईट. बऱ्याच वेळा विवेक तर त्याच्या सोबत असतो म्हणून तर तो म्हणतो, ‘भेदभाव अपने दिल से साफ कर सके| दुसरो से भूल हो तो माफ कर सके|| आणि यासाठी ‘हम को मन की शक्ती देना’ आणि याचमुळे त्याचे समाजात स्थान निर्माण होते. तोच स्वतः स्टार बनतो… वगैरे. शेवटी सकारात्मक विचारांचे सामर्थ्य अंगी बाळगले तर माणूस आशावादी बनतो. म्हणूनच मी देवाकडे एकच प्रार्थना करते की, ‘देवा ज्या गोष्टी आम्ही कधीच बदलू शकत नाही, त्या स्वीकारण्याची ताकद आम्हाला दे.’ ‘ज्या गोष्टी आम्ही बदलू शकतो त्या बदलायच सामर्थ्य आम्हाला दे आणि या दोन्हीतला फरक ओळखण्याची पात्रता अंगी असू दे’, तरच माणूस वाईट नाही याची सार्थकता पटेल…! आणि हा मानव जन्म मिळाला याच समाधान ही मिळेल….!
अनिता व्यवहारे
ता. श्रीरामपूर जि. अहमदनगर



