मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्थेचा ‘अभिजात भाषा समारंभ’ संभाजीनगर येथे साजरा होणार.
सविता पाटील ठाकरे
मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्थेचा ‘अभिजात भाषा समारंभ’ संभाजीनगर येथे साजरा होणार.
दिनांक ०७ मे २०२५ वार बुधवार रोजी शाहू भवन, जिजाऊ मंदिर,बाबा पेट्रोल पंप जवळ येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. मराठीचे शिलेदार समूहाचे सर्वेसर्वा आ. राहुल पाटील सर यांच्या अध्यक्षतेखाली शाहू भवन येथे नियोजन बैठकीत अनेक गोष्टींचा आढावा घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मराठी भाषा गौरव अंक काढण्याचे ठरवले,तसेच मराठी काव्यवाचन स्पर्धेचे भव्यदिव्य आयोजन करण्याचे नक्की करण्यात आले. विजेत्या कवी कवयित्रींना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्याबाबतही नियोजन करण्यात आले. मराठीचे शिलदार समूह प्रकाशन विभागातर्फे आजवर ३०० पेक्षा जास्त कवितासंग्रहांचे प्रकाशन झालेले आहे. संभाजीनगर येथील कार्यक्रमाचे औचित्य साधून जवळपास १२ नवीन काव्यसंग्रहांचेही या कार्यक्रमात प्रकाशन होणार आहे.
अधिव्याख्याता डॉ.पद्माताई जाधव-वाखुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन समितीचे सदस्य श्री विजय शिर्के, विष्णू संकपाळ, श्री.अखिल पठाण, वर्षा मोटे इत्यादी सदस्य या आयोजन बैठकीसाठी उपस्थित होते. सदर बैठकीसाठी सिलवासा येथून श्री.प्रशांत ठाकरे हेही उपस्थित होते. संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने कवी कवयित्री या काव्यवाचन स्पर्धेसाठी उपस्थित राहतील असा विश्वास आयोजन समितीचे सदस्य श्री विष्णू संकपाळ यांनी व्यक्त केला व त्या अनुषंगाने नियोजन करण्याचे नक्की करण्यात आले.
दर्जेदार साहित्य निर्मिती ही मराठीचे शिलेदार समूहाची उज्वल परंपरा आहे ती पुढे चालत ठेवून उच्च दर्जाचा वार्षिक अंक काढण्याचा मानस यावेळेस समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी व्यक्त केला. या प्रसंगी प्रशांत सर यांनी संपूर्ण नियोजन आयोजन समिती समोर ठेवले व सर्वांचे आभार मानण्यात आले.





