ज्ञानेश्वरीचे मूर्त रूप : माऊलींची संजीवन समाधी
अनिता व्यवहारे ता श्रीरामपूर जि अहिल्यानगर

ज्ञानेश्वरीचे मूर्त रूप : माऊलींची संजीवन समाधी
नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी,
एक तरी ओवी अनुभवावी…||
संत नामदेवांच्या या ओवीतच ज्ञानेश्वरीचे दैवी महत्त्व सामावलेले आहे. ‘जीवनाची कला, भक्तीचा मार्ग आणि कर्मयोगाची दिशा सांगणारा हा ग्रंथ म्हणजे अमर आनंदाचे भांडार..! प्रत्येक ओवीतून व्यक्त होणारा अनुभव आणि अध्यात्माचा सुगंध मानवाच्या मनाला शांततेचा आणि आनंदाचा संदेश देतो. संपूर्ण मानवजातीला खऱ्या सुखाचा आणि जीवन जगण्याचा मार्ग दाखवणारी भगवद्गीता आणि त्या गीतारूप ज्ञानाचे सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत आणि भावनेतून स्पष्टीकरण देणारी ज्ञानेश्वरी, ही संत ज्ञानेश्वर माऊलींची अमूल्य देणगी. “कर्म, ज्ञान आणि भक्ती या त्रिमार्गांचा सुंदर संगम साधून त्यांनी परमेश्वर प्राप्तीचा मार्ग लोकांसमोर उलगडला.”
त्यांनी सांगितले की जाती, धर्म, पंथ, राष्ट्र या भिंती बांधून मानवतेला विभागणे हे चुकीचे नव्हे तर पाप आहे. ‘समाजात प्रेम, शांतता आणि समरसतेचे राज्य नांदो हीच त्यांची प्रार्थना होती’. म्हणूनच ज्ञानेश्वरीच्या शेवटी त्यांनी आता विश्वात्मके देवे” या प्रसादायदानातून संपूर्ण विश्वासाठी मंगलकामना केली. अशा या विश्वगुरूंना आणि त्यांच्या कुटुंबियांना समाजाकडून अन्यायकारक वागणूक मिळत राहिली, तरीही त्यांच्या अंतःकरणातील शांतता आणि करुणा कधीच डळमळली नाही. त्यांनी आपले कार्य अखंडपणे चालूच ठेवले.
वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षीच माऊलींनी आपले जीवनकार्य पूर्ण केले. अंतर्मनात विचार जागा झाला. हा देह कोणाचा? आत्माराम त्याचा तोच जाणे… आणि त्यांनी ‘संजीवन समाधी’ घेण्याचा निर्णय घेतला. परंतु वडीलबंधू आणि सद्गुरु निवृत्तीनाथ म्हणाले, “ज्ञाना, अजून थोडे दिवस थांब.” गुरूच्या आज्ञेनुसार माऊली दोन वर्षे थांबले आणि वयाच्या एकविसाव्या वर्षी भगवंताची परवानगी घेऊन संजीवन समाधी निश्चित केली.
संजीवन समाधी म्हणजे जिवंत असतानाच देहातून ब्रह्मभावात स्थिर होणे..! देहाचा त्याग नव्हे, तर आत्मरूपात विलीन होणे. माऊली म्हणाले, समाधी साधन संजीवन नाम, शांती दया सम सर्वभूती..! सद्गुरु निवृत्तीनाथांच्या हरिनाम दीक्षेमुळेच ही समाधी अलौकिक ठरेल, असे त्यांनी सांगितले. शके १२१८, कार्तिक वद्य त्रयोदशी हा दिवस ठरला. असे म्हटले जाते की माऊलींनी यापूर्वी १०८ वेळा विविध युगांत विविध रूपांत समाधी घेतली होती. आळंदीतील सिद्धेश्वर मंदिरासमोरील नंदीखालील विवर हेच त्यांचे समाधीस्थान ठरले. भगवंताच्या सांगण्यानुसार नंदी हलवल्यावर खाली विवर उघडले आणि तेच स्थळ निवडले गेले.
तो दिवस एकादशीच्या उपवासाचा. माऊलींनी त्याआधीच उपवास आरंभला होता. ‘द्वादशीला भगवंतांनी दिव्य अन्न तयार करून स्वतः माऊलींना भोजन वाढले. ते अन्न त्यांच्या देहात अमृतरस झाले,’ आणि माऊलींचे संपूर्ण शरीर तेजोमय झाले. त्या रात्री हरिनामाचा अखंड गजर झाला. कार्तिक वद्य त्रयोदशीच्या सकाळी नामदेवांच्या पुत्रांनी समाधीस्थळ सजवले. तुळशी, बेलपत्र, दर्भासन, मृगचर्म आणि तेज देणारे रत्नदीप ठेवले. भगवंतांनी स्वतः माऊलींची महापूजा केली. त्यानंतर माऊली समाधीकडे निघाले. त्यांच्या हातात एक काठी होती. समाधीशेजारी त्यांनी ती रोवली, आणि “त्यांच्या आशीर्वादाने त्या काठीला पालवी फुटली. तोच आजचा अजानवृक्ष.. संजीवक शक्तीचे साक्षात प्रतीक.
‘देव आणि निवृत्ती धरिले दोन्ही कर,
‘जातो निवृत्ती ज्ञानेश्वर समाधीस..!.’
माऊली समाधीस्थळी आसनस्थ झाले. त्यांच्या मुखावर दैवी शांतता, डोळ्यांत तेज आणि आनंदाचा झरोक होता. गुरूंना नमस्कार करून क्षमा मागून त्यांनी भीममुद्रा धारण केली. निवृत्तीनाथांनी समाधीचे दार बंद केले, आणि नामदेव म्हणाले, “लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ..” त्या क्षणी उपस्थित संतजन अश्रूंना आवरू शकले नाहीत. संत गोरा कुंभार, संत नामदेव, सर्व संतांच्या डोळ्यांतून करुणा ओघळली. निवृत्तीनाथ आणि भगवंत यांच्या डोळ्यांतही अश्रू आले. दोघे एकमेकांना विचारत होते आपण का रडतो आहोत? तेव्हा निवृत्तीनाथ म्हणाले, माझा धाकटा भाऊ कधीही अवज्ञा केली नाही. आणि भगवंत म्हणाले, माझा खेळिया गेला, माझा परममित्र गेला.!
माऊलींचा दिव्य देह पंचमहाभूतांत विलीन झाला, परंतु त्यांचे चैतन्य आजही आळंदीच्या वाऱ्यात, हरिनामाच्या नादात आणि भक्तांच्या अंतःकरणात दरवळते!. अडीचशे वर्षांनंतर संत एकनाथ महाराजांना स्वप्नात दर्शन देऊन माऊली म्हणाले, “ज्या अजानवृक्षाजवळ मी समाधी घेतली, त्या वृक्षांच्या मुळाशी माझे चैतन्य आहे”. तेव्हा श्रीनाथ महाराज आळंदीला आले आणि समाधीस्थळी माऊलींचे ब्रह्मरूप दर्शन घेतले. समोर ठेवलेले पंचखाद्य, बेलपत्र, नैवेद्य… सर्व जसेच्या तसे टवटवीत होते. ते तेजोमय चैतन्य आजही त्या भूमीत, त्या वाऱ्यात, आणि त्या ओव्यात स्पंदत आहे. ज्ञानदेव माऊली हे केवळ संत नव्हेत, तर “ज्ञानाचे मूर्तिमंत स्वरूप आहेत.” त्यांची ‘संजीवन समाधी’ हा देहातून देहात आणि चैतन्यातून विश्वचैतन्यात विलीन होण्याचा दैवी उत्सव आहे’.
“ज्ञानियांचे राजे, महाकैवल्य तेजोनिधी,
श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी त्रिवार नमस्कार..!
अनिता व्यवहारे
ता श्रीरामपूर जि अहिल्यानगर
=========





