रायगड जिल्हा कुस्तीगीर संघटनेच्या सरचिटणीसपदी प्रमोद मनोहर भगत
तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी
रायगड जिल्हा कुस्तीगीर संघटनेच्या सरचिटणीसपदी प्रमोद मनोहर भगत
तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी
अलिबाग: (दि १९) बुधवार दि. १३ ऑगस्ट २०२५ रोजी खासदार श्री. सुनिल तटकरे कुस्ती प्रशिक्षण केंद्र, वाडगाव – अलिबाग येथे झालेल्या रायगड जिल्हा कुस्तीगीर संघटनेच्या बैठकीमध्ये बाबासाहेब नाजरे हायस्कूल व जुनिअर कॉलेज, आवासचे माजी मुख्याध्यापक / प्राचार्य, आवास गावातील कुस्तीप्रेमी व्यक्तिमत्व, रायगड भूषण प्रमोद मनोहर भगत सर यांची रायगड जिल्हा कुस्तीगीर संघटनेच्या सरचिटणीसपदी एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
गेली अनेक वर्षे प्रमोद मनोहर भगत सर अलिबाग तालुका कुस्तीगीर संघटनेचे सचिव व रायगड जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे सहसचिव म्हणून कार्यरत आहेत. लहानपणापासून प्रमोद मनोहर भगत सर यांना कुस्ती खेळाची आवड असल्यामुळे, कुस्तीखेळावरील प्रेमामुळे शालेय जीवनानंतरही त्यांच्यातील नामवंत मल्ल शांत बसू शकला नाही.
वयोमानानुसार त्यांनी स्वतः कुस्ती खेळणे थांबविले. पण त्यांच्यातला एक आदर्श कुस्ती प्रशिक्षक, उत्कृष्ट वस्ताद जागा झाला. त्यांच्या अथक परिश्रमाने आवासचा कुस्तीसंघ आजतागायत टिकून आहे. फक्त टिकूनच नाही तर आवास कुस्ती संघाचा त्यांच्या मेहनतीमुळे आजही सर्वत्र नावलौकिक आहे. तरुणांमध्ये ते कुस्ती खेळाविषयी आवड निर्माण करीत आहेत, त्यांना कुस्ती खेळण्यासाठी प्रोत्साहन देत आहात. नियमितपणे आपला अमूल्य वेळ खर्च करुन, तन, मन, धन अर्पून कुस्ती खेळाडूंचा सराव घेत आहेत, मार्गदर्शन करीत आहेत.
कुस्ती स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी खेळाडूंना प्रोत्साहन देत आहेत. खेळाडूंना दुखापत झाली तर त्यांच्या उपचाराचा खर्च ते स्वतः करत आहेत. कुस्ती हेच तीर्थक्षेत्र मानून त्यासाठी अहोरात्र झटत आहेत. त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे, कष्टामुळे बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास मधील व आवास गावातील, अलिबाग तालुक्यातील मल्ल राष्ट्रीयस्तरापर्यंत पोहचून घवघवीत यश संपादन करू शकले.
आजवर त्यांनी मोठमोठ्या कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट राज्यस्तरीय पंच म्हणून चोख कामगिरी बजावली आहे. प्रमोद मनोहर भगत सर यांची रायगड जिल्हा कुस्तीगीर संघटनेच्या सरचिटणीसपदी निवड झाल्या बद्दल त्यांचे अलिबाग तालुका पंचायत समिती माजी सदस्य रणजीत प्रभाकर राणे, ग्रुप ग्रामपंचायत आवासच्या सरपंच अभिलाषा अभिजीत राणे, माजी सरपंच व विद्यमान सदस्य अभिजीत प्रभाकर राणे, उपसरपंच राजेंद्र वाकडे, सर्व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच आवास व पंचक्रोशीतील ग्रामस्थ तसेच रायगड जिल्हातील कुस्ती प्रेमींकडून प्रमोद मनोहर भगत सर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





