गुणदोषातून चुका आणि शिका
वसुधा वैभव नाईक धनकवडी, जि. पुणे
गुणदोषातून चुका आणि शिका
माणसाकडून चूक होत नाही असे नाही. चूक होते, पण ती मुद्दाम केली जात नाही. पण हे चूक झाल्यानंतर ती सुधारणेही आपले काम आहे. माणसाच्या हातून चुका घडतात आणि श्रेय हरवून बसतात. माणसाच्या ह्या चुकीमधून अनेक गोष्टी शिकायला मिळतात. जणू काही आपल्याच रिकाम्या ओंजळीमध्ये आपल्याला बरेच काही शिकायला मिळते. चूक सुधारणे हा मानवाचा गुणधर्म आहे. अशावेळी चुकीला माफी मिळते. परंतु पुन्हा पुन्हा तीच चूक करणे म्हणजे मुद्दाम केल्यासारखे आहे. त्या चुकीला मात्र माफी नसते. बऱ्याचदा अगदी नगण्य चुकीला सुद्धा आभाळाएवढी शिक्षा मिळत असते. चूक आणि शिक्षा यांची कधीही ताळेबंदी मांडायची नसते. एक कृती, एक शब्द आपल्या चुकीला कारणीभूत असतो. यासाठी आपला शब्द आणि आपली कृती जाणीवपूर्वक योग्य तीच करावी.
शेवटी काय तर एकंदरीत आपली चूक समोरचा पदरात घालणार नाही. आपली आई चूक समजावून घेईल, पण चूक समजावूनही सांगेल, परत ती चूक न करण्यासाठी. “चुका आणि शिका.” ह्या म्हणीप्रमाणे चूक झाली असल्यास मान्य करावे आणि ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करावा.
आपण मात्र सतत शिकत असतो.
जीवनात चुकीला माफी नाही
असे मात्र काही नाही बरं
परत परत ती चूक केली तर
शिक्षा मिळणार हे मात्र खरं…..!!
गुण म्हणजे व्यक्तीचे चांगले स्वभाव विशेष.अवगुण म्हणजे वाईट स्वभाव विशेष होय. माणसात जसे चांगले गुण असतात तसे वाईटही गुण असतात. अवगुण म्हणजेच वाईट गुण. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व माणसांचे निरीक्षण केले असता कुणामध्ये वाईट, तर कुणामध्ये चांगलेही गुण असतात. चांगले गुण म्हणजे उदा- प्रामाणिकपणा, दयाळूपणा, जे समाजासाठी आणि स्वतःसाठी फायदेशीर असतात, तर अवगुण म्हणजे वाईट सवयी किंवा दोष उदा- राग, अहंकार, आळस हे व्यक्तीला कमजोर करतात आणि नात्यांमध्ये दुरावा निर्माण करतात. चांगल्या गुणांचा अतिरेक देखील अवगुण ठरू शकतो, जसे की जास्त विचार करणे किंवा अति-कामात मग्न राहणे.
आपण एक गोष्ट करावी की वाईट माणसांमध्ये चांगले गुण काय आहेत याचा शोध घ्यावा. म्हणजे प्रत्येक माणसातल्या चांगल्या गुणांचा स्वीकार तर करायचा आहे; पण वाईटातून चांगले काय घ्यायचे हे पण शिकायचे आहे. बऱ्याचदा माणसातील चांगुलपणा हा सुद्धा अवगुण ठरू शकतो. कारण अशा माणसाला प्रत्येक ठिकाणी गृहीत धरले जाते. उदा- स्वभाव भोळा असेल तर.. त्या माणसाला काहीही कोणीही बोला त्यावर काही फरक पडणार नाही असे वाटणे.
माणसाला खूप दुःख असेल तो समाजापुढे आपल्या दुःखाचा दिखावा करत नसेल तरी देखील “काय बाई, हिला दुःख होऊनही ही शान्त कशी? ” असेही म्हटले जाते. असे हे जीवन आहे. सर्व गुणसंपन्न कोणताच व्यक्ती नाही. गुण आणि अवगुण दोन्हीही त्या व्यक्तींमध्ये असतातच. चांगले गुण घ्यावेत. वाईट गुणांना सोडून द्यावे. समर्थांच्या मते, ‘अवगुण टाकून चांगले गुण आत्मसात करणे आणि विवेकी राहणे हेच जीवनात यशस्वी होण्याचे आणि सुखी राहण्याचे रहस्य आहे’.
वसुधा वैभव नाईक
धनकवडी, जि. पुणे
==========



