0
4
8
2
9
3
तुझ्यात जीव माझा
मन आतूर वेडया
चिंब भिजण्या प्रेमवर्षावात
अगणित बाहू पसरून घ्यावे
दाह शमविण्या अलगद कवेत ॥
सर्वांगाची झाली लाही
जिवघेण्या तुझ्या विरहात
शृंगारही करपून गेला
चातकापरी तुझ्या प्रतिक्षेत ॥
पापणकाठ कोरडा झाला
भेगाळली सुकोमल काया
आसुसलेले मन अधिर वेडया
एकरूप तुझ्यात व्हाया ॥
कधी रुष्ट होऊनी अदृश्य होई
मन अधिर भेटाया
क्रोधिष्ट होऊनी कधि झोडपशी
होते पाणी पाणी काया ॥
अमृतधारा प्राशन करूनी
मळे फूलविन म्हणते
प्रेमसरींनी तृप्त न्हाऊनी
जीवन पेरीन म्हणते ॥
नको दुरावा बरस राजा
गुंतला तुझ्यात जीव माझा
तू असता -नसता कासावीस हा
कंठाशी प्राण तुझ्या वसुंधरेचा ॥
सरला टाले
राळेगाव यवतमाळ
========
0
4
8
2
9
3



