0
4
8
2
9
0
उदास जगणे
उदास वाटते आता जगणे
तुजविण झाले कठीण जिणे
आप्त स्वजन जरी हे भोवती
तुझी जागा सदा दिसते रीती ।।
मुखावरी आणते बळेच हसू
अंतरी नकळत ढळती आसू
वेडे मन म्हणे तू आहेस इथे
कसा न दिसशी मला तू कुठे? ।।
जाणिव जव जव होते फिरूनी
कधी पुन्हा ना तू येशील परतूनी
बंद डोळ्यांमध्ये क्षण तो येतो
काळीज माझे हे चिरून जातो ।।
घर आपुले आता घर ना उरले
सुन्या भिंतींतूनही पाणी झरले
दिवसामागूनी दिवस हे जाती
तुझ्या आठवांनी रात्री भिजती ।।
स्वतःस सावरुन तुज आठवते
पुन्हा नव्याने उभी मी रहाते
पाहशील जव वरुन तू मजला
हसरीच छबी ही दिसेल तुजला ।।
अर्चना सरोदे, सिलवास
दादरा नगर हवेली आणि दमण व दिव
=========
0
4
8
2
9
0



