Breaking
नागपूरपरीक्षण लेखमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

‘तिमिरातूनी तेजाकडे ‘कवी’ आमच्या नेई जीवना..!!’

डॉ. संजय भानुदास पाचभाई

0 4 8 2 8 7

‘तिमिरातूनी तेजाकडे ‘कवी’ आमच्या नेई जीवना..!!’

स्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम’ या मधुर आवाजाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आवाज इतका गोड होता, पाहिले तर सूत्र संचालन करणारी चिमुकली बहुतेक एक दात पडलेला, उंचीही माईक पर्यंत जेमतेम पुरणारी ‘छकुली’ दिसली. मनात आपसूकच आश्चर्याचे भाव उठले या कोवळ्या वयात तिने संपूर्ण व्यासपीठ काबीज केले. मुलीचे पाय पाळण्यात दिसतात, नाहीतर त्या मर्यादा पुसून आता अंथरुणच मोठे घ्यायचे, हा तिचा नक्कीच कयास होता आणि का राहणार नाही, कारण ती मुलगी कोणाची आहे आदरणीय राहुल पाटील सरांची. वडिलांकडून तिला हे ‘बाळकडू’चे डोज रोज मिळतात.

पाहुणे स्थानापन्न होताच, दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. राहुल सरांनी व्यासपीठ आपल्या हातात घेताच “पंख पैंजण” या कथासंग्रहाचे प्रकाशन संपन्न झाले. कथाकार, लेखिका, प्रसिद्ध कवयित्री व साहित्यकार सौ. कुसुमलता वाकडे यांचा हा पहिलाच कथासंग्रह. मुखपृष्ठ खूप आकर्षक. बसूनच मी प्रस्तावना वाचली त्यातून ‘शितावरून भाताची परीक्षा केली’, आणि केव्हा एकदा कथा वाचतो असे झाले. गडचिरोली, यवतमाळ,भंडारा, चंद्रपूर, सिंदेवाही इतक्या दुरून कवी आलेत. आणि पत्रकार सुद्धा. राहुल सरांच्या कष्टाचे चीज झाले असे मनोमन वाटले. उपस्थिती जरी कमी भासत असली, तरी प्रत्येकाच्या मनात जोश दिसला.

“आकाश जरी निरभ्र होते, बरसल्या शब्दांच्या पाऊसधारा
वीज जरी मध्येच गेली, टाळ्यांच्या पडल्यात गारा..”

ऐन कार्यक्रमाच्या मध्ये लाइट गेली. आता तोपर्यंत चहा पिऊन घेवू असे राहुल सर म्हणाले. पण, पहिलेच कार्यक्रमाला उशीर झाला होता, पहिले एक कार्यक्रम तिथे चालू असल्याने आम्हाला व्यासपीठ जरा उशीराने मिळाले. तशाही परिस्थितीत किल्ला लढवायचाच असा आम्ही प्रण केला आणि आमच्या लहानपणी, महापुरुषांनी दिव्याखाली अभ्यास केल्याचे वाचले होते, त्याचा प्रत्यय त्यावेळी आला. ‘असंही घडतं कधी कधी’ चा अनुभव माझ्यासह अनेकांनी घेतला. पुढे काय झाले? तर, ‘मोबाईलचे टार्च प्रकाशले’. त्याच प्रकाशात माझा मित्र, प्रमुख मार्गदर्शक ‘डॉ. अनिल पावशेकर’ याने मैदान हाती घेतले आणि एक शेर दागला आणि चहा प्यायला जाणारे खुर्चीला खिळून बसले. पत्रकारिता कशी असावी यावरील शेर असो की लेख, कविता कशी असावी आणि त्यात निर्भीडता टिकवणे का आवश्यक आहे, जर लेखन आपल्याला आवडले तर फेसबुक वर किती जणांनी लाइक केले याचा विचार न करता आपण लिहित रहावे हा मोलाचा सल्ला डॉ. अनिलने दिला.

लाइट गेल्यावरही मात्र अंधारात सगळ्यांचे चेहरे झाकाळून गेले होते, पण माझा चेहरा मात्र चकाकत होता. ‘देवाने माझे शरीर पांढरे का केले याचा उलगडा आज झाला आणि मनोमय देवाचे आभार मानले’. पत्रकार, कवी यांचा सत्कार सोहळा, कविता वाचन कविसम्मेलनाच्या अध्यक्षा आदरणीय सविताताई धमगाये, लेखिका “पंख पैंजणकार” सौ.वाकडे ताई यांचे यथोचित भाषण झाले. आभार प्रदर्शन प्रसिद्ध हायकूकार आणि आमच्या सर्वांचे लाडके आदरणीय हंसराज खोब्रागडे सर यांनी केले.

“कौतुक किती करू, या नवोदित कवीचे,
आशय संपन्न रचना, जैसे किरण रवीचे..”

उपस्थितांमध्ये नवोदित कवीही होते त्यांच्या रचना खरच कौतुकास्पद वाटल्या. ‘मंग मलेबी चेव आला’, आन म्याबी देल्ली झोडून वर्‍हाडी रचना ‘होशील का माई राणी’. तवा माई एकुलती एक राणी माह्या मोरं च बसली होती.तिनं नजरंनच इशारा केला. ‘चाल मणे घरी तूहे यौवनाचे काटेच काढते’. दूरवर खेड्या पाड्यावर जावून पत्रकारिता करतांना काय काय करावे लागते याचा अनुभव पत्रकार बंधू कडून ऐकायला मिळाला. स्वताचे जवळचे त्या अमरावती रोड वरील अपघातात बळी गेल्यावरही त्याचे कव्हरेज त्यांना करावे लागले हे ऐकूनच अंगावर शहारे आलेत. दोन दिवसापूर्वीच अपघातात पायाला दुखापत होऊन ही ज्या हिरीरीने पूर्ण कार्यक्रम एकहाती नाही म्हणणार मी एक पायी पेलला त्या आदरणीय राहुल सरांचे कौतुक करायला माझ्याकडे शब्द शिल्लक नाही.

“याहून चांगले असते काही, मी आजवर पाहिले नाही,
सर्वांनी अनुभवले इथे, मी एकटाच बोलत नाही..”

फक्त या शब्दात मी राहुल सरांबद्दल बोलू शकतो. त्याहूनही ते श्रेष्ठ आहेत याची कल्पना सर्वांनाच आहे. भेटू पुढच्या कवी संमेलनात एवढीच आशा..!!!

डॉ. संजय भानुदास पाचभाई
खामला रोड, नागपूर.
(‘संजयवाणी’कार)

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे