Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरछत्रपती संभाजी नगरदेश-विदेशनागपूरपश्चिम महाराष्ट्रबीडमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

बालमनावर संस्काराचे शिंपण करून भावविश्व समृद्ध करणारा बालकाव्यसंग्रह ‘वाघाची मावशी ‘

संग्राम कुमठेकर, लातूर

0 4 8 2 9 0

बालमनावर संस्काराचे शिंपण करून भावविश्व समृद्ध करणारा बालकाव्यसंग्रह ‘वाघाची मावशी

मराठवाड्यातील बीडच्या प्रसिद्ध कवयित्री शर्मिला देशमुख/घुमरे यांचा ‘वाघाची मावशी’ हा पहिलाच बालकाव्यसंग्रह प्रकाशित झाला.यापूर्वी त्यांचा ‘या वळणावर’ हा काव्यसंग्रह वाचण्यात आला होता. स्त्रीवादाचा पुरस्कार व विषमतावादी दुष्ट परंपरांना हिमतीने तोंड देण्याची प्रेरणा देणाऱ्या कविता त्यात होत्या. समाजातील दांभिक प्रवृत्तीवर कवयित्री घणाघाती प्रहार करताना त्यांची प्रगल्भता, सामाजिक जाण व भान याची प्रचिती आली होती. आताचा हा निरागस, निष्पाप बालकांच्या बालमनाचा अचूक ठाव घेऊन समृद्ध बालविश्वाचे दर्शन घडविणारा बालकाव्यसंग्रह म्हणजे ‘वाघाची मावशी’ होय. भल्याभल्यांना जे अवगत होत नाही असं बालमन अजूनही कवयित्रीच्या हृदयात फुलतंय, डुलतंय, खुलतंय, नाचतंय, बागडतंय यावरूनच या बालकाव्याची उंची लक्षात येते.

‘वाघाची मावशी’ हे पुस्तक हाती पडताच त्याचे मुखपृष्ठ लक्ष वेधून घेते. जंगलात ज्याचा दरारा असतो तो वाघ सिंहासनावर विराजमान होऊन ऐटीत बसलेला आहे. भोवताली मांजर, खारुताई ससोबा, झाडावरची चिऊताई, माकडे, पोपट, पाण्यातील मासा, बेडूकमामा बालकांना आकर्षित करणारे असेच आहेत. आतील बालकाव्य व त्याच्याशी अनुरूप असणारी रंगीत चित्रे खिळवून ठेवणारीच आहेत. आतील चित्रे आपल्याशी संवाद साधत आहेत असंच वाटते. त्यामुळे फक्त बालकांनाच नाही तर पालकांनासुद्धा वाचण्याची इच्छा होईल असे नाही; तर ती गुणगुणावीत अशी लयबद्ध, तालबद्ध आहेत. छोट्या छोट्या प्रसंगातून पालकांच्या मनावर उत्तम संस्कार होतील व संस्कारक्षम पिढी निर्माण होईल हीच खुणगाठ मनाशी बांधून नीतिमान, बुद्धिमान, विज्ञानवादी, निसर्गप्रेमी, प्राणीमात्रांवर प्रेम करणारा, खऱ्या सुखाच्या व समाधानाच्या वाटा चालण्यास प्रेरित करणाऱ्या कवितांचा समावेश यामध्ये आहे. कवयित्रीने ‘माझा खाऊ’ कवितेत मांजर, ससा, माकड खारुताई, चिमणी, बैल, कुत्रा यांचा खाऊ काय असतो. अतिशय गंमतीदार शब्दांचे यमक साधून बालमनात रुजविले आहे.अचूक यमक ही या बालकाव्याची विशेषता म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

वाघाची मावशी
गालात हसली
सरसर चढून
झाडावर बसली
(वाघाची मावशी)
पाण्याचे तळे कसे
आकाशात तू बांधले
सोबत घेऊन चालतो
कधी नाही का सांडले
( ढगा रे ढगा)
सवंगडी आपण सारे
राज्य चालवायला शिकू या
राजा कसा असावा
शिवबाच्या गोष्टीतून वाचू या
( नवा डाव आता )
लाडाची मनीमाऊ
हट्टाला पेटली
वाढदिवस करा म्हणून
रुसून बसली
( मनीमाऊचा वाढदिवस )
नसताना तू
मीच बनेन चिऊ
पिल्लांना तुझ्या
घालीन मी खाऊ
( चिऊताई )
अचानक मनीमाऊने घातली झडप
उंदीर मामा क्षणातच बिळात गडप
(मनीमाऊ)
बालकांचे भावविश्व समृद्ध करणाऱ्या अशा अनेक रचना या बालकाव्याचे वैशिष्ट्य आहे.

‘गालगुच्या’ रचनेतून मनोरंजनासोबतच आजी- आजोबा,आई-बाबा घरात असणे किती आनंददायी असते.’नाकावरचा राग’ रचनेतून बहीण-भावाचे प्रेम यातून कवयित्री आटत चाललेल्या नात्यातील पाणवठ्यांना पुनर्जीवित करण्याचा मानस बाळगते असेच वाटते.’ढगा रे ढगा’ही कविता तर लहानच काय मोठ्यांच्या मनालाही भुरळ पाडेल अशीच लयबद्ध आहे. बालकाच्या कल्पनाशक्तीचा व सर्जनशीलतेचा विकास यामुळे होतो. बालमनात निर्माण होणाऱ्या विविध प्रश्नांची उकल हसत खेळत अनेक काव्यातून करण्यात आलेली आहे. यामुळे कवयित्री फक्त कल्पनेचे पंख लावूनच भरारी घेते असे नाही तर कवयित्रीने बालकांच्या संशोधक वृत्तीला खतपाणी घालण्याची अफलातून किमया साधली आहे.’बैलजोडी’ रचनेत शेती करण्यासाठी बैलाचे योगदान बालमनावर बिंबवताना कवयित्री म्हणते,

आवडीची बैलजोडी
कशी आहे लाखात
राबराबती आपल्यासाठी
रानीवनी भर उन्हात

‘नवा डाव आता ‘ या रचनेतून जी लोकं आपला इतिहास विसरतात ती लोक कधीच इतिहास घडवू शकत नाहीत. कठीण परिस्थितीवर मात करून जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर शिवरायांच्या कर्तबगारीचा मागोवा घेण्याची आकांक्षा बालकांमध्ये निर्माण करण्याची किमया अचूक साधली आहे. वृक्षांचे महत्त्व विशद करताना ‘पक्षी येता अंगणी’ या रचनेत कवयित्री म्हणते,

पक्षी येता अंगणी
चिवचिवाट फार
झाडे लावा अंगणात
मिळेल सावली गार

म्हणतात ना ‘आयुष्याची इमारत सुसंस्काराच्या भक्कम पायावर उभी असली की ती कोसळण्याचे भय माणसाला नसते.’ बालमने सुसंस्कृत घडविण्याची शाश्वती हा बालकाव्यसंग्रह देतो. एका स्त्रीच्या आयुष्यात तिच्या दुःखाचे अनेक कारणे असतात पण तिच्या आनंदाचे एकमेव कारण म्हणजे तिची मुलं असतात. हाच धागा पकडून कवयित्रीने बालकांचे भावविश्व, कल्पनाविश्व समृद्ध करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.

स्वातंत्र्यपूर्व भारताचा विचार केला तर, त्या काळात मनुवादी संस्कृतीमुळे माणसाचे माणूसपण नाकारणारी समाजव्यवस्था अस्तित्वात आलेली होती. धगधगणाऱ्या वास्तव जीवनाचे चित्रण साहित्यातून मांडण्याची गरज असताना कल्पनेचे पंख लावून याच अमानुष प्रथा,परंपराचे गोडवे गाणारे, काल्पनिक कथा,काव्य निर्माण करण्यात आले होते. परंतु ब्रिटिश राजवटीमुळे शिक्षणातून लोकशाही मूल्यांची ओळख लोकांना तर झालीच पण त्यामुळे साहित्याची दिशा बदलली गेली. मानवमुक्तीच्या चळवळीतून सामाजिक क्रांती घडली गेली. तेव्हा वास्तववादी साहित्याचा उदय झाला. कोणतेही वास्तववादी साहित्य काळजाला भिडणारे असते. हाच धागा पकडून कवयित्री शर्मिला देशमुख/घुमरे यांनी बालकाव्य लिहिताना कल्पनेचे पंख लावून भरारी घेताना गंमतीशीरपणे, सहजतेने सोप्या शब्दात मांडणी केलेली असून वास्तवाचे भान बालमनात जागृत करण्याचा जो अनोखा प्रयत्न केला आहे तो प्रशंसनीय असाच आहे.

‘वाघाची मावशी’या बालकाव्यसंग्रहात एकूण ३५ रचना समाविष्ट असून सर्वच रचना वाचनीय आहेत. विशेषतः ससोबा, फुगेवाला,कच्चा लिंबू, पतंग माझा, नाकावरचा राग,पारंब्या,मोरपीस,फवारा, गोलगप्पा, कानटोपी, पिपाणी, नवा डावा आता,दाढीवाला बुवा,या मजेशीर,मनोवेधक व प्रेरित करणाऱ्या रचना आहेत. या बाल काव्यसंग्रहातील अनेक रचना पूर्व प्राथमिक व प्राथमिक स्तरावरील अभ्यासक्रमात समाविष्ट केल्या तर नाविन्याचा शोध घेणारी विज्ञाननिष्ठ पिढी निर्माण होईल यात शंका नाही.

काव्यसुगंध दरवळण्यासाठी नुसते शब्दवैभव असून उपयोगाचे नाही, तर जीवनानुभवाची साथ असायला हवी. कवयित्री शर्मिला देशमुख/घुमरे यांचे हे बालकाव्य वाचताना भाव सौंदर्य व विचारसौंदर्याचा सुरेख संगम असलेला दिसून येतो. म्हणून ‘वाघाची मावशी’ हे बालकाव्य प्रत्येकाला हवहवसं वाटेल असंच आहे. उत्तम प्रतीचा कागद,आकर्षक बांधणी, प्रत्येक रचनेला साजेशे चित्र,चोखंदळ वाचकांना आपलंसं करेल व वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळेल हीच अपेक्षा . या बालकाव्याबद्दल एवढेच म्हणता येईल,कवयित्री बालकांवर इतकं नि:स्वार्थ प्रेम करते की ती आजही बालकांच्या मनातलं अचूक जाणू शकते. कवयित्रीच्या हृदयात हे बालमन असेच बहरत राहो व लेखणीतून नाविन्यपूर्ण साहित्यसंपदा मराठी साहित्याची श्रीमंती वाढवीत राहो हीच सदिच्छा…!!!

संग्राम कुमठेकर, लातूर
कवी, लेखक, सहप्रशासक

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे