गाडी शिकलेsss रे.. (भाग २)
सौ. स्वाती मराडे-आटोळे
गाडी शिकलेsss रे..
माझा मागील अंकातील ‘गाडी शिकले रे’ हा लेख म्हणजे मैत्रिणीचे अनुभवकथन होते. त्यावरूनच मला माझाही गाडी शिकण्याचा अनुभव लिहावा वाटला. माझी गाडी शिकणे म्हणजे आईपणाने भितीवर केलेली मात होती. त्यावेळी मार्च महिन्यात शिक्षिका म्हणून जि. प. पुणे यांची ऑर्डर मिळाली. घरापासून अडीच तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या शाळेत रूजू झाले आणि जून महिन्यात मुलीचा जन्म झाला. त्यानंतर मला फक्त पावणेदोन महिन्यांची रजा मिळणार होती. इवला जीव घरी ठेवून जायचं या विचारानेच डोळ्यात पाणी यायचं. मुलीला दहा ते पाच या वेळात आपल्यापासून दूर ठेवायचंय हा विचार एका आईला किती त्रास देत असेल याचा पुरेपूर अनुभव मी या काळात घेतला.
पण शाळेत जायला गाडी घेतली, तर दुपारच्या सुट्टीतही घरी येता येईल या विचाराने उचल खाल्ली. मधली सुट्टी एक तास असायची त्यामुळे येऊन जायला पुरेसा वेळही मिळणार होता. शिवाय दररोज जाण्यायेण्याचाही प्रश्न मिटणार होता. पण मला मात्र दुपारी घरी येण्यासाठी गाडी अगदी महत्वाची वाटू लागली. शेवटी आम्ही दोघांनी गाडी घेण्याचे ठरवले. पैशांची अडचण असतानाही जुळवाजुळव केली. घर ते शाळा या रस्त्यावर उखडलेली मोठमोठी खडी व पावसाळ्यात धो धो वाहणारे दोन ओढेदेखील होते. तेव्हा स्कुटीसारख्या गाड्यांमध्ये आतासारखी विविधता नव्हती व तशी गाडी या रस्त्यावर चालवणे जिकीरीचे होणार होते. शेवटी विचार करून हिरो होंडा कंपनीची ‘स्ट्रीट स्मार्ट’ ही गाडी घेतली. या गाडीचे गिअर व ब्रेक पायात होते. त्यामुळे शिकणे थोडे अवघड जाणार होते. गाडी घेतली की लगेच माझे शिकणेही सुरू झाले. तेव्हा मी माहेरीच होते.
नवीन गाडी पहायला व पेढे घ्यायला सगळे चुलते, चुलत्या, भाऊ, वहिनी आलेले होते. सगळे तिथेच असताना सरांनी व भावांनी गाडीसाठीच्या सूचना देऊन झाल्या. मी विना चप्पल गाडीवर बसायला लागले, तर पायात आधी चप्पल घाल नाहीतर पुन्हा चप्पल घालून गाडी चालवता येणार नाही हेही सांगून झाले. मागे सरांनी बसून सावकाश एक चक्कर आणून झाली. आता एकटीने चालवायची होती. गाडी सुरू केली आणि गिअर टाकण्यासाठी पायाकडे लक्ष गेले तसे एक्सलेटरवरील हात जास्त ओढला गेला आणि गाडी वेगात पुढे गेली तसे माझे चुलते ज्यांना बैलगाडी चालवायची सवय होती ते अरे हो हो हो ss असे म्हणून ओरडले. पण नशिबाने माझ्याकडून दुसऱ्या पायातील ब्रेक दाबला गेला व गाडीचा वेग कमी झाला. मी पडले नाही, परंतु चांगलेच घाबरले. नको रे देवा गाडी शिकायला असे वाटून गेले. त्यादिवशी मी पुन्हा गाडी चालवलीच नाही.
मनात भिती बसलेली त्यामुळे दुसऱ्या दिवशीही गाडीवर बसताना धडधडत होते. यावेळी वस्तीपासून दूर पटांगणात गाडी नेली. इथे कुणी रस्त्यात आडवे येण्याची भिती नव्हती. पडतेय असं वाटलं तर गाडी सोडून दे आणि तू उभा रहा हा पतीचा सल्ला. नाही शिकलीस तर गाडी विकावी लागेल. शिवाय तुझा जाण्यायेण्याचा प्रश्न आहेच. काय करायचं तू ठरव. अजिबात घाबरू नको काही होत नाही. शेवटी दुपारची सुट्टी व मुलगी डोळ्यांपुढे आली. गाडीवर बसले अगदी हळूहळू सुरूवात केली. यावेळी पायाकडे अजिबात पाहिले नाही. सरांच्या सूचनेनुसार चालवत गेले आणि न डगमगता गाडी चालवू लागले. थोडा आत्मविश्वास वाटला. दुसऱ्या दिवसापासून छोटा भाऊ सराव करून घेऊ लागला आणि मी गाडी चालवायला शिकले. आईपणाने भितीवर मात केली.
सौ. स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, पुणे
सहसंपादक, साप्ताहिक साहित्यगंध



