“काळ्या आईची ओटी भरायसाठी तरी जगायचं इथेच”; स्वाती मराडे
“काळ्या आईची ओटी भरायसाठी तरी जगायचं इथेच”; स्वाती मराडे
गुरूवारीय चित्र चारोळी स्पर्धेचे काव्यपरीक्षण
मातीतून सोनं पिकवण्यासाठी तो जीव टाकतो गहाण अन् घामाच्या मोत्यांचं देतो धरणीला दान.. तो शेतकरी.
आकाशाकडे डोळे लावून लावून ज्याच्या डोळ्यात पाऊस उतरतो अन् स्वतःचं छप्पर गळकं असलं तरी पाऊस पाहून जो आनंदी होतो.. तो शेतकरी. कष्टाची कमाई कधी कुणी उघड्यावर ठेवेल का? पण राब राबतो व दैवाच्या हवाल्यावर सगळं सोडतो. हातात पीक येईपर्यंत त्याला फायदा होईल की तोटा याचा ज्याला हिशोब लागत नाही.. तो शेतकरी.
अहो बाजारात गेलात तर तुम्हाला झुकतं मापही तोच देतो. कधी कधी एखादी भाजीची पेंडीही तशीच आपल्या पिशवीत घालतो..तो शेतकरी.
कधी कधी तो अवकाळी येतो आणि सपान त्याचं वाहून नेतो. तरीही उठतो आणि पुन्हा कामाला लागतो. कारण त्याला माहीत आहे, पैसा कितीही असला तरी भाकरीसाठी शेतातच राबावं लागतं, ऊन, वारा,पाऊस सगळं सोसावं लागतं. भरभरून दान देणारा पाऊस कधीकधी वेड्यासारखं वागून होत्याचं नव्हतं करतो पण तरीही पुन्हा पुन्हा जो शेतीचा जुगार खेळतो.. तो शेतकरी.
आणि या शेतकऱ्याच्या सुखाचा, दु:खाचा व कष्टाचाही भागीदार असलेला मी.. एक वृषभ. मीही गाळतो घाम त्याच्यासोबत रानात. कधी ओझं हलकं करण्याचा प्रयत्न करतो तर कधी काळ्या आईची ओटी भरायला हातभार लावतो. पण तुम्हाला माहितीय का? काम झाल्यावर तो आधी मला सावलीत विसाव्यासाठी नेतो. त्याने घास खाण्याआधी मला वैरण देतो. पाठीवर मायेने हात फिरवतो आणि मगच स्वतः जेवायला घेतो. कधीकधी शेतात राबताना लेकराला अंगाई गावी तशी माझ्यासाठीही ओवी गातो. मलाही वाटतं मग मीही त्याचंच लेकरू आहे तर.. असं जिवापाड जपतोय. म्हणूनच मला कायम त्याचा सहवास हवाय. जगायचंय इथंच त्याच्या सोबत. नकोय मला कसली झूल, नको कोणतंही बेगड..!!
या मातीतच जगणं मरणं,
तेही असावं तुझ्या सोबत.
या मातीतच जन्म लाभला
या मातीतच हवंय मरण
जगायचंय इथंच या देहाला
बळीराजा..
नित्य मनात रे तुझंच स्मरण..!!
आज चित्र चारोळी स्पर्धेसाठी आलेले चित्र रानातील कृषीमित्राचे. बैल म्हातारा झाला की बिनकामाचा होतो. मग कित्येकवेळा त्याला कसायाला विकले जाते. त्याने याआधी सोबतीने केलेल्या कष्टाचा कदाचित तेव्हा विसर पडतो. असे होऊ नये म्हणूनच कदाचित तो म्हणतोय.. आता यापुढेही मला जगायचंय इथंच. या हृदयस्पर्शी अर्थाने अनेक रचना समूहात आल्या व आशयघन लाक्षणिक अर्थानेही बऱ्याच रचना आल्या. हृदयस्पर्शी व वैचारिक लेखणीसाठी सहभागी सर्व रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन.
छत्रपती संभाजीनगर येथे सात मे रोजी होत असलेल्या ‘गौरव अभिजात मराठी २०२५’ या कार्यक्रमास आपण नक्कीच सहभागी व्हाल अशी आशा करते. आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार.
स्वाती मराडे, इंदापूर पुणे
मुख्य परीक्षक, सहप्रशासक, लेखिका
©मराठीचे शिलेदार समूह



