Breaking
अहमदनगरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रसाहित्यगंध

अतिथी देवो भव

अनिता व्यवहारे ता.श्रीरामपूर जि अहमदनगर

0 4 8 2 8 4

अतिथी देवो भव

सत्यम शिवम सुंदरम.. अशा भारतीय संस्कृतीमध्ये ‘अतिथी देवो भव:!’हा संस्काराचा एक भाग मानला जातो. ‘पाहुणे येती घरा तोचि दिवाळी दसरा’. असं माझ्या लहानपणी मी ऐकलं होतं आणि तेव्हा तसं वाटायचं ही. कारण पाहुणे येणार म्हटलं की घर, घराच अंगण, स्वच्छ, टापटीप करण्याची आईची लगबग. बाबांचंही घरात हे आण ते आण चालू असायचं. आमच्यासाठी परीट घडीतले कपडे वगैरे वगैरे.

आमच्या घरी नव्हे; सर्वांच्याच घरी येणाऱ्या पाहुण्यांमध्ये प्रकार भरपूर. काही आगंतुक, काही सांगून येणारे, काही नात्यातले, काही मित्र म्हणून तर काही अनामिक, अपरिचित असायचे. आम्हा मुलांसाठी काही आवडते तर काही नावडते असं बरंच काही. अरे हो, यात अजून एक, काही मार खायला लावणारे तर काही आनंद देणारे. तुम्ही ही अनुभवलेले असणार असे पाहुणे.!

एकदा आईला हवेहवेसे वाटणारे आणि बाबांना नको असणारे म्हणजे आईच्या माहेरचे पाहुणे आले. पुन्हा आमची वर्दी चहा पाण्यासाठी. आता मात्र मी एकदम सभ्यतेचा बुरखा पांघरून आईच्या संस्कारांना मनात जपत सामोरे आले. तर पाहुणे म्हणाले, अरे वा! अगदीच आईच्या वळणावर गेली. आईला हायसं वाटलं. तेवढ्यात नेहमीप्रमाणे छोटा भाऊ समोरून धावत आला आणि मला धडकला कोणीतरी म्हणालं की हा वडिलांच्या वळणावर गेला जणू..आता बाबांच्या रागाचा पारा चढला परिणाम. पाहुण्यांची पाठ वळते ना वळते तोच आम्हाला चोप आणि आई-बाबा एकमेकांवर डागू लागले भांडणाची तोफ.

असे खूप काही प्रसंग आहेत ते तुमच्याही बाबतीत घडले असतीलच. आनंद, दुःख देणारे. आजही आठवल्यावर चेहऱ्यावर हसू पेरणारे. पण काहीही असलं तरी, ‘अतिथी देवो भवः’ असायचे बरं का? कारण तेव्हा माणुसकी नावाची एक गोष्ट साऱ्या घरभर नव्हे गावभर नांदत असायची. त्यामुळे पाहुणे कसेही असले तरी त्यांचे स्वागत. त्यांच्यासाठीची मेजवानी, आदरातिथ्य, मन लावून त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणं, त्यासाठी खास वेळ काढणं, देवाण-घेवाण या सगळ्या आनंददायी गोष्टी घडायच्या. यात लहान मुलांची जरी धावपळ होत असली तरी चंगळ व्हायची.

आणि अलीकडे तर काय? पाहुणे……म्हणजे.. एक तर या शब्दाची व्याख्याच बदलली. आता तर वर्षापासून पाहुणे येणं हा सोपस्कार दुरापास्त झाला आहे. कोरोनाने कहर केलाय. पाहुणे येणं बंद झालं.आपल्या संस्कृतीतला हा संस्कार मिटवायला निघाला होता तो कोरोना, खूप वाईट वाटतं होतं. आता पाहुणे कधी येणारच नाहीत म्हणून, काल संध्याकाळी एका लांबच्या पाहुण्यांचा फोन आला जवळ जवळ तीन चार वर्षांनी फोन आला. म्हणून आनंदाने घेतला तेव्हा ते म्हणाले, उद्या संध्याकाळी येतो आम्ही. ‘पाहुणे येतील उद्या घरी, करावी लागेल सगळी तयारी, थकून जाईल आता आमची स्वारी’, पण….. हो ही मेहमान नवाजी करणार बरं का अगदीच प्रेमाने,आनंदाने….! कारण शेवटी आपले संस्कार आणि संस्कृती ‘अतिथी देवो भव’.!

अनिता व्यवहारे
ता.श्रीरामपूर जि अहमदनगर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे