बाप
बाप आहे तोपर्यंत शितल छाया
संकटातही खंबीर उभी राहणारी माया
आहे तोपर्यंत समजून घ्या “बाप”
खरी तीच असते तुमच्या पाठीवरील थाप..
“फादर्स डे ” निमित्ताने सगळीकडे वडीलांचे फोटो स्टेटस ला पाहण्यात आले आणि मनात प्रश्न आला खरंच ‘बाप’ या अनमोल व्यक्तीसाठी एक दिवस पुरेसा आहे का? बाप खरंच सर्वांना समजला असेल का ? फोटो पाहून तर वाटले की या जगातील कोणताही बाप दुःखी नसावा. ( मी पण फोटो ठेवलाय बरं!) असो.. एक दिवस तरी हवाच ना प्रेम व्यक्त करण्यासाठी.. खरं म्हणजे बाप असणं याहून मोठे ते काय असावे? या जगाने आईचे गोडवे खूप खूप गायले.. तिचे मोल तरी कोणाला शब्दात करता आले का? आहेच ती अनमोल. पण या सगळ्या गोष्टीत ‘बाप ‘दुर्लक्षितच राहिला हो. पण त्याच्या ओठांवर कधीच ‘शिकायत’ ऐकायला मिळाली नाही. आईच्या केलेल्या वर्णनातच जणू त्याने आपले कौतुक शोधले असावे. डोळसपणे पाहिले तर खूप शोकांतिका पहायला मिळतील या नात्याच्या बाबतीत,मग प्रश्न पडतो हाच का तो ‘ फादर्स डे’ चा फोटोतील बाप?
कासवाप्रमाणे दुरूनच आपल्या अपत्यांचे संरक्षण,पालन पोषण करणारा हा बाप तसा जास्त प्रमाणात अपत्यांच्या जवळ नसल्यामुळे कदाचित अपत्यांनी दखल घेतली नसावी,असे तर नसेल ना? पण त्याचे कष्ट,धडपड , प्रेम हे अपत्यांपासून झाकून थोडेच राहिले. साधारणपणे काही हवे नको हे सगळी मुले आईला सांगतात आणि मग आईच्या शिफारशीने ते मुलांना भेटते. प्रेमळ असणारा बाप विनाकारण असाच दुरावत जात असावा कदाचित. सध्या परिस्थिती बदलत चालली आहे, आता बाप आणि अपत्य यांच्यात मैत्रीचे संबंध आढळतात. “सुपर डॅड” की काय ते! खरं म्हणजे वडीलांची जवळीक अपत्यापैकी म्हटले तर मुलीची. बाबा रागात जरी असले तरी त्यांना शांत करण्याची कला फक्त मुलीलाच अवगत असते.
आम्हाला अभ्यासक्रमात “माझा बाप हिटलर” हा पाठ होता. बाप खरंच का हिटलर असतो? खरं सांगायचं म्हणजे आम्ही पण तिघे भावंडे वडिलांना खूप घाबरायचो. आता आम्ही आई बाप झालो, तरी ते आले की आणखीही शांत बसतो. काही हवे नको यासाठी आईच मध्यस्थ असायची. त्यांची कडक शिस्त, टापटीप पणा, वस्तू जागेवरच ठेवणे, मोठ्यांचा आदर करणे, पाहुणचार अशा एक ना अनेक गोष्टी असतील त्या पाळतांना नाकी नऊ यायचे आणि थोडी जरी चूक झाली तरी प्रचंड घाबरायचो. पण याच गोष्टी आज जीवनात किती लाभदायक आहेत हे क्षणाक्षणाला जाणवते आणि त्यांची महानता दाखवून देते.
त्यांचे जे संस्कार होते ,जे तत्व होते ते जीवनाच्या किंवा वास्तविक शाळेत कुठेच शिकायला मिळाले नाहीत. आज आम्ही जे काही यशस्वी आहोत ते सर्व त्यांचेच श्रेय. गावात तसेच घरात शिक्षणाचे पोषक वातावरण नसतांना त्यांनी आम्हाला अतिशय हालापेष्टा सहन करून शिकवले. मुलींना शिकवणे हे तर खेड्यात मान्यच नव्हते,कारण ते तर परक्याचे धन ना ! अशा परिस्थितीमध्ये वडिलांनी मुलगा मुलगी समानतेचा पाठ त्या काळी गिरवला. अभिमानाने सांगावेसे वाटते की त्यांच्या धाडसामुळे माझ्या नंतर बऱ्याच मुली शिक्षणासाठी गावातून बाहेर पडल्या.
आपल्या लेकरांवर आपला विश्वास असायला हवा हे त्यांचे वाक्य नेहमीच वाईट गोष्टी पासून दूर ठेवणारे आणि प्रेरणादायी. त्यांचे मार्गदर्शन सदैव प्रचंड विश्वास देऊन जायचे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मी यशाची शिखरे पादाक्रांत केली,हे मी मान्य करते. माझ्या जीवनातील स्वाभिमान ही त्यांचीच देणगी.जीवनात खूप गुरू भेटले,ते तर मार्गदर्शक असतातच पण माझे वडील माझे पहिले आणि खरे गुरु ठरले. माझे यश म्हणजे माझ्या आन्नांची पुण्याई! कोणी मानो न मानो, पण मी मात्र त्यांच्या विचारांपुढे सदैव नतमस्तक! त्यांच्या पोटी जन्म घेतला ही आमची पुण्याईच! आजही त्यांचे विचार तितकेच प्रेरणादायी आहेत. वय झाले तरी नवीन काहीतरी सतत करत राहण्याची त्यांची उमेद आम्हाला लाजवण्यासारखीच ! खरं म्हणजे त्यांचे उतराई होणे जन्मोजन्मी अशक्य. पण असेल जर का पुनर्जन्म तर मी मात्र त्याचीच मुलगी होणार…..!!!
शर्मिला देशमुख -घुमरे, बीड



