गाडी शिकलेsss रेss ..!
स्वाती मराडे-आटोळे
गाडी शिकलेsss रेss ..!
नोकरी करायची तर गाडी यायलाच पाहिजे होती, तेव्हाचा ही गोष्ट. अशा ठिकाणी बदली झाली की तिथे जाण्यासाठी ना कोणती बस, ना तिथे रहाण्याची सोय. पर्याय एकच गाडी शिकणे. मनात तर मोठी धाकधूक. गाडी येणारच नाही हे तिचे ठाम मत तर मी शिकवतो गं तू नको काळजी करू हा नवऱ्याचा विश्वास. गाडी शिकायची म्हटलं, तर आधी गाडी पाहिजे. तिची पण खरेदी झाली. तेव्हा गाडी पासिंग वगैरे नंतर व्हायचं त्यामुळे लगेच ताब्यात पण मिळाली.
दुसऱ्या दिवशी काम आवरेपर्यंत अकरा वाजले. नवऱ्याने लगेच गाडी शिकण्याचा पहिला धडा सुरू केला. असं बसायचं. इथं मूठ पकडायची, ती ओढली की गाडी पुढे पळते. दुसऱ्या हातात ब्रेक पकडायचा. गरज असेल तेव्हा ओढायचा. थांबताना काय करायचं, कसं उतरायचं हे सगळं दाखवून झालं. मनातल्या मनात तिची पण उजळणी झाली. ‘सोप्पं तर आहे हीss गाडी चालवेल मी आता..! (हे पण मनातच बरं का..!)’
बसली गाडीवर. बटनस्टार्ट केली. इकडून नवऱ्याच्या सूचना, ब्रेक धर.. मूठ ओढ आणि ब्रेक सोडून गाडी हळूहळू पुढे जाऊ दे. मूठ ओढली पण ब्रेक वरचा हात काही सुटेचना. गाडी आपली जागेवरच डारडूर डारडूर..! ‘अगं हा हात सोड.’ इकडचा हात सोडला की तिकडचा हात जागेवर जायचा. ‘अगं मूठ पण ओढ’ नवऱ्याची सूचना. मूठ ओढली की गाडी हालली लगेच पुन्हा हात माघारी आणि गाडी जागेवरच. अर्धा तास झाले तरी मूठ ओढ, ब्रेक सोड, हा खेळ काही संपेना आणि गाडीही जागची हलेना. बघता बघता बारा वाजत आले घड्याळातही आणि नवऱ्याच्या चेहऱ्यावरही. त्याचा उत्साह कमी होऊ नये म्हणून तीच म्हणाली, ‘एकदा तू मागे बसून दाखव ना.’ तो मागे बसला आणि हातात हॅण्डल पकडला, तिनेही पकडला पण बहुतेक तो पूजेला बसल्यावर मम म्हणण्यापुरता असतो तसा असेल बहुतेक.
नवरा मागे बसल्यावर एक छान चक्कर आणून झाली. आता तो खाली उतरला आणि तिला चालव म्हटला पण पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. गाडी पुढे जाईना. आता दोघेही दमले. गाडी पार्किंगमध्ये लावली आणि छान झोप काढली. तिला तर झोपेतही त्या सूचनाच ऐकू येत होत्या. पुन्हा दचकून उठली आणि तिच्या मनात विचार आला गाडी नाही शिकले तर नोकरी सोडावी लागेल. नवऱ्याला उठवले. ‘चला गाडी शिकवायला.’ त्यालाही वाटले चला उशीर कशाला? पुन्हा एकदा सूचनांची उजळणी झाली. तिने मनावर दगड ठेवून हळूहळू मूठ ओढली, गाडी पुढे निघाली पण पायच वर उचलेना. पळत्या गाडीवर ती खाली पाय ठेवून चालतेय.. कल्पना करा कसं दृश्य असेल ते. ‘अगं पाय वर घे..’ पुन्हा सूचना. झाले पाय वर घेतले आणि हात सोडून दिले.
एका दणक्यात गाडी आडवी आणि ती उभी. दिवसा तारे चमकले. पण सुदैवाने गाडीला व तिलाही खरचटलं सुद्धा नव्हतं. गाडीला काही झाले नाही ते बरे नाहीतर, पासिंगची पंचाईत झाली असती हा तिचा भाबडा विचार नवऱ्याला सांगितला तर तो ओरडलाच ‘अगं तुला पण काही झाले असते तर?’ आता मात्र नवऱ्याने गाडी घेतली आणि शोरूमला नेऊन ठेवली ती पासिंग करूनच आणली.
चार दिवसांनी पुन्हा गाडीचे धडे. पण प्रगती शून्य. मुलानेही प्रयत्न करून पाहिला. दोघेही हताश झाले. नवऱ्याने शेवटी ड्रायव्हिंग स्कूल गाठले. तेव्हा तिथे स्कुटीपण शिकवत असत. ‘स्कुटी शिकवायचे किती रूपये घेता?’ ‘पाचशे रूपये. ‘हे हजार घ्या पण हिला गाडी शिकवा.’ तो पोऱ्या डोळे फाडून पाहू लागला. त्यालाही आधीच खात्री पटली असेल बहुतेक या बाईला गाडी शिकवायला दुप्पट मेहनत करावी लागणार.
कशीतरी गाडी पुढे सरकली. ती गाडी इतकी हळू चालवायची की सायकल चालवणारे आरामात पुढे जायचे. पण हिने तिकडे कधी मान वळवली नाही. नाहीतर पुन्हा एकदा गाडी आडवी आणि ती उभी असे झाले असते. आता खरे पुढची कसोटी होती. गाडी नोकरीच्या गावात न्यायची. तिथपर्यंत जाताना दुसरी एक मैत्रीण अलीकडच्या गावात सोबत असणार होती. तिथपर्यंत गाडी तिने घ्यायची असे ठरले. तिथून पुढे तीन किलोमीटर हिला एकटीलाच जावे लागणार होते. आठ दिवस नवरा पुढे वेगळ्या गाडीवर आणि ही मागे स्कुटीवर असे सुरू होते. पुढून कुणी आलेच तर आधीच त्याला ही ओरडून बाजूला व्हायला सांगायची. अशी ही त्यांची वरात निघायची. आता येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना तिचे ड्रायव्हिंग स्कील बऱ्यापैकी माहित झाले होते. त्यामुळे ते आधीच आपली गाडी बाजूला घ्यायचे आणि रस्ता मोकळा करून द्यायचे. बघता बघता तीन महिने झाले सरावाने गाडी जमायला लागली. आतातर कुणाला वाटणारही नाही तिची गाडी शिकताना एवढी गंमत झाली असेल. पण काहीही असो.. ‘गाडी शिकतानाच्या त्या गोड आठवणी मात्र आम्हाला खळखळून हसवून गेल्या’.
स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, पुणे
सहसंपादक, साप्ताहिक साहित्यगंध.



