मैत्री जपणारी बंधुत्वाची नाती
सौ. स्वाती मराडे-आटोळे
मैत्री जपणारी बंधुत्वाची नाती
मैत्री जपणारी काही जगावेगळी माणसं असतात. त्यातीलच काहीजण म्हणजे आमच्या दहावी बॅचमधील अवलिया. त्यांच्यामुळेच तब्बल एकतीस वर्षांनी दहावीतील मित्रमैत्रिणींची भेट झाली. अगदी ध्यानीमनी आणि स्वप्नीही नसणारी गोष्ट त्यांच्यामुळे गेट टुगेदरच्या रूपाने लाभली. केवळ हेच नव्हे तर वर्गातील एखाद्या मित्रमैत्रिणीच्या परिसरात काही कामानिमित्त जाणे झाले तर आवर्जून फोन करून घरी जाऊन भेट घेणे, मैत्री टिकवणे व वृद्धिंगत करण्यासाठी आणखी एक पाऊल टाकत विविध माणसांना जोडून ठेवणे हा जणू त्यांना लागलेला छंदच. मलाही असाच आलेला एक सुखदायी अनुभव.
मागील आठवड्यात श्री. आदेश जमदाडेचा फोन आला, ‘स्वाती तू कुठे आहेस? मी व विक्रम सपकाळ उद्या तुझ्या घरी येतोय.’ पण नेमके मीच घरी नव्हते, त्यामुळे आत्ता नको तर पुढील आठवड्यात नक्की या असे सांगितले. पण पुढील आठवड्यात सुरू झाला पावसाचा धुमाकूळ. आता कुठले येणे होतेय असेच वाटत असताना पावसाची उघडीप मिळाली आणि या परिसरात आदेशचे काम होताच श्री. विक्रम सपकाळ व श्री. अभिजीत भागवत या दोघांना सोबत घेऊन आदेश घरी आला.
हा आदेश जमदाडे म्हणजे सातारा जिल्ह्यातील नायगाव येथील. त्याची पत्नी सौ. स्वाती आदेश जमदाडे म्हणजे या गावातील प्रथम नागरिक अर्थात सरपंच. ज्या सावित्रीआईचा वारसा चालवत स्वतःला तिची लेक मानताना मला अभिमान वाटतो त्या सावित्रीआईच्या जन्मगावातून एखादी व्यक्ती आपल्या घरी आल्यावर होणारा आनंद काय वर्णावा..! त्यात ती व्यक्ती माझ्या दहावीच्या वर्गातील व त्यासोबत वर्गातील आणखी दोघेजण.. अगदी माहेरचं कुणी भेटल्याचा आनंद. विक्रम तर आधीपासूनच म्हणतो या माहेरच्या माणसांना कधीही हक्काने हाक मार. आम्ही माहेरपण जपणारच. खरोखरच त्याची अनुभूती आली.
मग काय गप्पांची मैफल रंगणारच होती. पुन्हा एकदा आम्ही सर्वजणच गप्पांमध्ये अगदी तल्लीन होऊन गेलो. यावेळी माझी मुले व पतीही त्यात अगदी रममाण होऊन गेले. आपल्या वर्गातील कुणीतरी काहीतरी वेगळं करत आहे याचा अभिमान मनात ठेवून त्यांच्या कामाचं कौतुक करण्यातही हे सगळे अग्रेसर. ओघानेच माझ्या काव्यसंग्रहाचा विषय आला. त्यावरही गप्पा झाल्या. तिघांनाही पुस्तक दिले. नव्हे हक्काने मागून घेतले. खरेतर माझे पुस्तक प्रकाशित होणार आहे हे याआधी समजले तेव्हा हे सर्वजण आम्ही प्रकाशन सोहळ्यास येतो म्हणाले होते ते ऐकूनही खूप आनंद झालेला. तिकडे येणे झाले नसले तरी घरी येऊन पुस्तक घेऊन जाणे हेदेखील मनास तितकेच आनंद देणारे. अशी मैत्री जपणारी बंधुत्वाची नाती मला लाभली खरोखरच भाग्यवान मी. यासाठी ईश्वराप्रती कृतज्ञ मी.
सौ. स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, पुणे
सहसंपादक, साप्ताहिक साहित्यगंध.



