जीवनातील प्रचंड संघर्ष पेलण्याची ताकत देणारा कवितासंग्रह ‘सुखाचे गोंदनं’
'सुखाचे गोंदनं' काव्यसंग्रहाचे समीक्षण
जीवनातील प्रचंड संघर्ष पेलण्याची ताकत देणारा कवितासंग्रह ‘सुखाचे गोंदनं’
‘सुखाचे गोंदनं’ काव्यसंग्रहाचे समीक्षण
कविवर्य ‘पांडुरंग मुंजाळ’ यांच्या “सुखाचे गोंदनं” या कविता संग्रहाचे प्रकाशन प्रख्यात साहित्यिक अशोक कुबडे यांच्या हस्ते झाले असून, हे पुस्तक मधुशाला प्रकाशन भरतपूर (राजस्थान) यांनी प्रकाशित केले. या पुस्तकाचे मुखपृष्ठ वसंत गाडेकर यांनी निर्माण केले तर; या कविता संग्रहाला प्रस्तावना डॉ. तोळमारे शशिकांत यांनी लिहिली. या पुस्तकाची पाठराखण प्रा.आत्माराम राजेगोरे यांनी केली आहे. या कवितासंग्रहामध्ये मानवी भावभावनांचे अतिशय संवेदनशील हृदयस्पर्शी दर्शन घडते. मुळामध्ये कवीच्या जीवनातील प्रचंड चढउतार, संघर्ष, जगण्याची झालेली आभाळ, दुःख, दारिद्र्य, वेदनेत गेलेलं बालपण, परिस्थितीवर मात करत करत शिक्षणाचा झालेला प्रवास. परिस्थितीशी दोन हात करून सोसलेल्या यातना. मनाच्या गाभाऱ्यात जपलेले दिवास्वप्न.. त्याला आलेले आनंदाचे धुमारे. नवजीवनाची लागलेली ओढ, सोनेरी स्वप्नांचा झालेला स्पर्श, पण अचानक झालेला भ्रमनिरास. भावनात्मक ज्वालामुखीचा झालेला प्रस्फोट त्यात वाहून गेलेलं आपलेपण, प्रेम, जिव्हाळा, स्वप्न, आशा-आकांक्षेची झालेली राख रांगोळी. या बेगडी जगाने दिलेली हुलकावणी, या पार्श्वभूमीवर मनाच्या खोल-खोल तळाशी साचलेली वैचारिक अस्वस्थता बाहेर काढण्याच्या प्रयत्नातून अत्यंत उत्स्फूर्तपणे त्यांची कविता साकार होते, म्हणून त्यांच्या कवितेत प्रेम, विरह, आई-वडिलांविषयी कृतज्ञतेची भावना, दुःख, कष्ट, यातना, शिक्षणातून आलेले शहाणपण व नैराश्य.. उपहास.. अपेक्षा, उपेक्षा सामाजिक संदेश, निसर्ग वर्णन व मानवी मनाचे तरल चित्रण जागोजागी डोकावताना दिसते, म्हणून या कवितासंग्रहाचे नाव जरी “सुखाचे गोंदनं” असलं तरी सुखाच्या गोंदनाचा शोध घेताना होणारी जीवनाची ससेहोलपट, भावभावनांची फरपट, संवेदनांची घुसमट, विविध कवितेच्या माध्यमातून अत्यंत जिवंतपणे व्यक्त होताना दिसते. आभाळ कवितेत आई-वडिलांनी भोगलेले दुःख, यातना, वेदना, कष्ट कवी अधोरेखित करताना लिहतो.
कित्येक वादळ पेललीत बापानं
नियतिला मान्य नसलेली गणितं सोडवलित माईनं..
फक्त माझ्या स्वप्नांना आभाळ देण्यासाठी..
मुलाच्या पालनपोषणासाठी नियतीशी दोन हात करणारा कणखर बाप आभाळ कवितेत साकारला आहे.
केवळ पावसाचे वातावरण पाहून आकाशाला ढगांनी वेढलेलं पाहून सुखी होणारा अल्पसंतुष्ट शेतकरी कवीने चित्रीत केला आहे तो “अवसान” या कवितेमध्ये. “आयुष्यातील वेलीवर “कवितेत आयुष्यभर प्रचंड दुःख यातना वेदना झेलून वाट्याला आलेल्या प्रेमाने फसगत केल्यामुळे जीवनाची होणारी दैना साकारली आहे. स्वतःच्या वाट्याला एवढं दुःख आल्यानंतरही कवी मात्र निसर्गातील सौंदर्यातून बोध घेताना “इंद्रधनुची वेलांटी” या कवितेत निसर्गाच्या साजऱ्या गोजिऱ्या रूपाचं सौंदर्याचं चित्रण करतो. वर्णन करतो. पाखरांचा लता व वेलीचं गौरवगीत गातो. या माध्यमातून स्वतःच्या दुःखाला विसरण्याचा प्रयत्न करतो. वैयक्तिक जीवनातील दुःख यातना विसरण्यासाठी शब्दाने कवीला साथ दिली म्हणून कवीचे शब्द कधी वडाच्या पारंब्या होतात, कधी वाळवंटातील मिरेच भक्तीगीत होतात, कधी जीवन प्रकाश होतात, कधी जगण्याचं आकाश होतात, हे “शब्द झालेत” या कवितेच्या माध्यमातून अनुभवायला मिळते.
केवळ आपल्या दुःखात वेदनेत आडकून न पडता पावसाकडे पाहिल्यानंतर कवीला पाऊस हा वसुंधरेच्या विरहापोटी बरसताना दिसतो. मातीच्या तृप्ततेसाठी बरसताना दिसतो. पाखरांची उदास खिन्न-खिन्न गाणी ऐकावी वाटत नाहीत म्हणून तो बरसताना दिसतो. पाण्याचा शोध घेणाऱ्या कष्टकऱ्यां पहाड फोडणाऱ्या वेदना बघत नाहीत म्हणून पाऊस बरसताना दिसतो, म्हणून “पाऊस गाणी” वेदनेतून विरहातून जन्माला येतात. या पावसासोबत विविध रंगांची उधळण करणारे फुलपाखरू निसर्गाचा अद्भुत अविष्कार, आनंद, चैतन्य, असल्याचे कवीला जाणवते, म्हणून तर इवलेसे फुलपाखरू अनेक रंग आणि फुलांचा आस्वाद घेते. आपल्या सौंदर्याने चंचलतेने लोकांची मन आपल्याकडे आकर्षित करून घेते असे कवी सांगतो. असे हे नाजूक फुलपाखरू निसर्गाच्या झंजावातातही आपले अस्तित्व कसे टिकून ठेवते याचे कवीला आश्चर्य वाटते ! आई कवितेत कवी आपल्या आई विषयी कृतज्ञतेची भावना व्यक्त करतात लिहतो..
तुझ्या दुधाची ग चवं
जशी मधाची ग गोडी
कसा सांगू आई तुला
तू गं आयुष्याची होडी..
आईला अशी उपमा देतो. आई म्हणजे पाविञ्याचा कळस.. अंगणातील तुळस.. आई वर्षाव अमृताचा.. आई स्पर्श चैतन्याचा अशा अनेक उपमा देतो. महत्त्वाच म्हणजे सटविने पाचवीला पुंजलेलं भविष्य बदलण्याची ताकद आई मध्ये असल्याची भावना व्यक्त करतो.
भल्या पहाटे उठून
जशी दळते जनाई
कसा मांडू मी शब्दात
आई तुझी ग नवलाई ..
अशी आई विषयी कृतज्ञतेची भावना व्यक्त करताना कवी हळवा होतो.
आधुनिक काळात सण समारंभाचे मर्म हरवत चालण्याची खंत कवी “बाप्पा निघून गेला” या कवितेतून व्यक्त करतात. प्रदूषण, व्यसनाधीनता, ढोंग, गुंडागर्दी, खोटारडेपणा, बेगडी भक्ती इत्यादीला कंटाळून गणपती बाप्पा मंडपातून अचानक निघून गेल्याची भावना व्यक्त करतो. निसर्ग आपल्याला भरभरून देतो पण आपणाला त्याची जाणीव तर नाहीच याची खंत “काळ्या आईने” कवितेतून व्यक्त करतो. कवी म्हणतो काळी आई मला अन्न देते. पाणी देते. मजबूत शरीर देते. समर्पणभाव देते. अनेक महापुरुष काळ्या आईने जन्माला घातले. आपण निदान माणुसकी जपूया असा संदेश कवी देतो. “अभा” कवितेमध्ये पावसाविन शेतकऱ्याची होणारी दैना स्वप्नांची राख रांगोळी पिकांची वाताहात व्यक्त केली आहे..
दिस गेला रात गेली
सारे आभाळ पांगले
सुखाच्या पावसाले कसे
वांझोटे ढग आले…
राब राब राबतो
बाप माझा रानात
माईच्या संसाराला कशी
अवसेचीच रात…
असे भयान वास्तविक आयुष्याला अधोरेखित करतो, तर “पाऊस पडून गेल्यावर” कवितेत पावसामुळे माती चंदन झाल्याची भावना व्यक्त होते. पावसामुळे लेकीची दिवाळी झाल्याची भावना रुजून येते, धरती मधून हिरवं काव्य जन्माला येतं असं कवी म्हणतो. स्वप्नांना सत्याचे अंकुर फुटतात ते केवळ पावसामुळे असं कवी म्हणतो. पावसामुळे मातीला दिवस जातात.. तेव्हा स्वप्नांचा नवा जन्म होतो अशी भावना कवी व्यक्त करतो.
“देवा माझ्या पदरात” कवितेत कवी म्हणतो देवा माझ्या पदरात हेच दान दे. डोक्यामध्ये विचाराचं दान दे.. व कायम संयमाचे भान दे… धरतीला नवचैतन्य दे… डोळ्यांमध्ये करूणा दे… नात्यांमध्ये प्रेम दे… माणसाला माणुसकीचे कुंपण दे… घराला घरपण दे… मुंगीला साखर दे… भुकेल्याला भाकर दे.. सौभाग्याला दान दे… आईच्या चुड्याला दीर्घायुष्याचे वरदान दे… प्रत्येकाला जीवनाचं गाणं दे… “दुष्काळाचा घाव” कविते दुष्काळामुळे गाय कसायाच्या दावणीला जाण्याची भीती आहे. कपड्याविन लेकीची द्रौपदी होण्याची भीती आहे. पिकांची दिवसाढवळ्या माती होते.. भुकेने स्थलांतरित होण्याची वेळ येत आहे. कोरड्या नदीकडे बघून जनावरं हंबरडा फोडत आहेत. दुष्काळाचा घाव कसा झेलायचा हा प्रश्न उपस्थित केला, यातून मार्ग निघत नसेल तर किमान ऐरन बनून सर्वकाही सोसण्याची हिंमत दे.. बळ दे अशी विनंती करतात, दुष्काळामुळे आमच्या अस्तित्वाचीच राख झाल्याची भावना कवी व्यक्त करतो. “माझी कविता” कधी कुठे जन्माला येते हे सांगताना कवी म्हणतो निसर्गाच्या सौंदर्यातून, काळजाच्या ठोक्यातून, प्रेयसीच्या प्रेमातून, कणसाच्या दाण्यातून, घामाच्या थेंबातून, बहिणाबाईच्या ओवीतून, तुकोबाच्या अभंगातून ,सुगरणीच्या खोप्यातून, चंदन रुपी मातीतून, कष्टकऱ्यांच्या कष्टातून, पेरणीच्या चाड्यातून माझी कविता जन्माला येते आसं सुचवतात. “सारे तुझेच भास होते” कवितेत कवी पूर्णता विराहाच्या अग्नीमध्ये होरपळून निघाल्याचे पाहायला मिळते.. म्हणून तर आपल्या प्रियेच्या आठवणीने तिचा साजन पूर्णतः व्याकुळल्याचे चित्र अनुभवायला मिळते, तिच्या सजनाला स्वतःच्या श्वासामध्ये तिचा भास होतो. कुणाचे पैंजण वाजले तर तिचीच आठवण येते. अनोळखी नेञातही तीच दिसते, चंद्राच्या चांदण्यात व भातुकलीच्या खेळातही तीच दिसते, मोगऱ्याच्या गंधामध्ये, स्पर्शाच्या छंदात मृगजळातही केवळ आणि केवळ तिचाच भास होतो. “सारे कसे आज” या कवितेतून समाजातील लाचारी, मुखवटेगिरी, ढोंगीपणा, चंगळवादीवृत्ती, प्रेमाचे झालेले व्यापारीकरण, सत्तांद, राजकारणी इत्यादी बाबीवर अत्यंत प्रखरपणे भाष्य केले आहे. “स्पर्श तुझा होता” या कवितेत प्रियेच्या एका स्पर्शाने जीवनात काय काय बदल होतो हे सांगताना कवी म्हणतो तुझ्या स्पर्शाने शब्दाना सूर मिळतो, कोकिळेला स्वर मिळतो, मन पाखरू होतं, मन पक्षी उंच उंच आकाशी उडत राहतो, आभाळ मुठ्ठीत येत. शब्दांना शब्द जुळून कविता जन्माला येते. “जीवन म्हणजे” काय हे कवितेतून सांगताना जीवन अस्तित्वाचे गाणे, दुःखातून सुख शोधत राहणे, काट्यासोबत गुलाब होणे, मृगजळा सोबत वाहत जाणे, कस्तुरीचा गंध होणे, सागरासम विशाल होणे, काट्याकुट्यातून चालत उंच भरारी घेणे.. अशी जीवनाचे भरजरी वर्णन केले आहे.
“श्रावण सरी” कवितेत वसुंधरेचे अतिशय विलोभनीय वर्णन करण्यात आले आहे. लाजाळूचे लाजणे, गवतावर दवबिंदूचे हसणे, फांदीवरील पक्ष्यांचे किलबिलने, पावसाच्या सरीवर सरी, वेलीवर फुलांची आरास, पंचमीच्या उंच झोक्यासोबत उडणाऱ्या आशा आकांक्षा, जीवनाची उत्कटता दर्शवतात. “स्त्रीचे महत्त्व” कवितेमध्ये संपूर्ण स्ञी जीवनाची महती दर्शवण्यात आलेली आहे. स्त्री म्हणजे अंगाई गीत, स्त्री म्हणजे संस्कार संगीत, स्त्री म्हणजे सुखदुःखाची वीणा, स्त्री म्हणजे जीवनाच सौंदर्य, स्त्री म्हणजे जीवन संगीत, स्त्री म्हणजे तुकोबाची गाथा. “पूर्णविराम” कवितेत आदर्शवादी जीवनाची कास, माणुसकीची सेवा, अन्यायावर आघात, सत्य शिव सौंदर्याची प्रतिष्ठापना, सावित्रीची तळमळ, शिवाजीची स्वराज्य निष्ठा, गांधींचे तत्त्वज्ञान, विवेकानंदाचा मानवतावाद, बुद्धाची करूणा, वाईटाचे दमण.. स्त्रियांचे रक्षण इत्यादीवर भाष्य करण्यात आलेले आहे. “कवितेची पालखी” या कवितेमध्ये…
किनारा गाठायचाय मला
सुखदुःखाच्या लाटा सोबत..
कवितेची पालखी वाहायचीय मला..
आयुष्याच्या घाटासोबत..
फुलांचे रंग रेखाटायचेत मला
काट्याने भारलेल्या देठासोबत..
राञ-राञ जागायचय मला..
आकाशी तारकांच्या बेटासोबत..
माणूस जोडायचाय मला माणुसकीच्या नात्यासोबत.. असं व्यापक आश्वासन देणारी कविता जन्माला येते. कवितेची पालखी ही कविता अशा प्रकारे एक उदात्त तत्त्वज्ञान घेऊन जन्माला येते. “प्रेरणेचा कोहिनूर” कवितेतून डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवन व कार्यावर.. परिश्रमावर.. समर्पणावर.. जिद्दीवर, देशप्रेमावर प्रकाश टाकण्यात आला आहे. “असा दुष्काळ” कवितेत दुष्काळात होरपळून निघालेल्या कष्टकऱ्यांचे अत्यंत हृदय द्रावक चित्रण करण्यात आले आहे.
कवितेत माझ्या आता
कोरड ठक्क रानं आहे
फाटलेल्या काळजातून
अंतरीच गानं आहे..
शेतकऱ्यासोबतच पशुपक्षी प्राणी नात्यागोत्याची ताटातूट कशी होती याचे भयान चित्रण करण्यात आले आहे.
“सुखाचे गोंदन” कवितेत जीवनातील काळोख.. पावसामुळे येणारे चैतन्य, मातीची गर्भधारणा, हिरव स्वप्न, शरीरावरील जखमा.. साखरेतील गोडवा, जगण्याचं गाणं, सुखाचं गोंदनं, कपाळी कुंकवात मायेची हिरवळ.. असं जीवनाचे सार सांगणारे तत्त्व पाहायला मिळते. “माझी मराठी” कवितेत मराठीचा गोडवा गाताना पसायदानाची विशालता, शाश्वत सत्य, संस्कृतीचा थोरवा, लोकगीताचा गोडवा, महदंबेचे ढवळे, इंदिराबाई व बहिणाबाई ची कविता, नामदेव व तुकोबाची जीवन गाथा.. व्यक्त होते. “तुझा माझा धर्म” कवितेतून जगात माणुसकी हा एकमेव सर्वश्रेष्ठ धर्म असल्याचे सांगितले आहे. “का राहिले नाही भान” या कवितेत भीम ज्ञानाचा सागर, भीम बहुजनांची अस्मिता, भीम काळजाचा ठेका, भीम माणुसकीचं गाव, भीम प्रकांड पंडित, भीम करूणेचा सागर, भीम बोधी वृक्षाची सावली, भीम मानवतेचा एल्गार, भीम चवदार तळ्याचे पाणी, भीम रत्नाची खाण, भीम भारताचा अभिमान, भीम संविधानाची गाथा, भीम माणुसकीचा दाता, भीम समतेच गाणं.. असं म्हटलं आहे. ‘’पेरणी’’ कविते जेव्हा घामाचा थेंब काळ्या जमिनीत मुरतो तेव्हा कोठे अंकुराला कोंब येतो असे म्हटले आहे. उन्हाच्या झळा सोसत काळी माती गर्भारते तरी रानातल्या झाडांची कशी कत्तल होते असा प्रश्न केला आहे.
चंद्राचं चांदणं, या कवितेत कवीने पौर्णिमेच्या प्रखर चंद्र बिंबामुळे संपूर्ण जीवसृष्टी उल्हासित चैतन्यमई आनंददायी झाल्याचे म्हटले आहे. पृथ्वीवरील दवबिंदू चंद्रामुळे मोत्या प्रमाणे चमकतात ते चंद्राकडे पाहून स्मीतहास्य करतात असे म्हटले आहे. शिवाय संपूर्ण जीवसृष्टी झाडं.., वेली.., लता.., मंद धुंद प्रकाशात न्हावून निघतात तेव्हा जाई-जुई मोगऱ्याचा गंध संपूर्ण आसमंतात पसरतो अशा या प्रसन्न रात्री सखीचा हात हातात घेऊन फिरण्याचा भास होतो. सखीचा हात हातात घेऊन फिरण्याची गावभर चर्चा पसरते तेव्हा संपूर्ण गावात एकमेकांच्या कानात कुजबुजण्याचा आवाज येतो तेव्हा मन प्रफुलित होते असे कवी म्हणतो. “किनारा” कवितेमध्ये कवी म्हणतो कविता आपल्या जगण्याचं साधन आहे, कविता आपला श्वास आहे, कविता आपला ध्यास आहे, कविता सुखदुःखाची सोबती आहे, कवितेने मला उंबऱ्याच भान दिल, बुद्धाचं तत्त्वज्ञान दिलं, एवढेच नव्हे तर कवीचे गीत ऐकण्यासाठी पक्षी आतुरतेने वाट पाहतात.. तेव्हा कवी म्हणतो..
माझ्या शब्दाचा किनारा
जणू फेसाळती लाटा
माझी कविताच माझी
माझ्या जीवनाच्या वाटा..
“होईल का सूर्योदय” कवितेत कवीने शिक्षणाने भ्रमनिरास केल्याची भावना व्यक्त केली आहे. ज्ञानाच्या डोहात खोलवर बुडालो पण नोकरीचा पत्ता लागलाच नाही. आई-वडिलांच्या स्वप्नांचा चुराडा झाल्याची भावना तीव्र होते. नोकरी नसल्याने जीव गुदमरतो, तरी पैसेवाला स्पर्धा परीक्षेचा रिझल्ट घेउन जातो.. ही खंत व्यक्त केली आहे. हे चिञ पाहून शिक्षित तरुण मात्र आतून बाहेरून पूर्णपणे हेलावून जातो.. म्हणून स्वातंत्र्याच्या रौप्यमहोत्सवातही नौकरीचा प्रश्न अनुत्तरीत राहतो की काय..? ही भावना निर्माण होते. कधीतरी आमच्याही वाट्याला “सूर्योदय येईल का ?” अशी खंत कवी व्यक्त करतो.
दुसऱ्या बाजूला “लेखनी” कवितेच्या माध्यमातून कवी लेखनी विषयी कृतज्ञतेची भावना व्यक्त करतो, आपण लेखणीमुळे स्वावलंबी, निर्भय, विचारी, संवेदनशील बनल्याचे बोलून दाखवतो. माझी लेखनी माझा जीवन प्रकाश ! माझी लेखनी वाहते उत्सवाचे प्रकाश सोहळे. माझी लेखनी रंजल्या गांजल्याची व्यथा. माझी लेखनी कधी तुकोबाची गाथा.. ही कृतज्ञतेची भावना लेखणी विषयी कवी बोलून दाखवतो. “असा संस्कार” कवितेच्या माध्यमातून कवी मुलांना केवळ आदर्श सांगू नका, तर तुम्ही स्वतः त्यांचे आदर्श बना.. असा सल्ला देतो. केवळ वांझुटे संस्कार करू नका.. तर क्रियावान बना. स्वतः आचरणातून विचाराची पेरणी करा.. असा सल्ला देतो. देहाची नश्वरता ओळखून संस्काराचे मोती रुजवूया असे कवी सुचवतो. जीवनाची सार्थकता ही शुद्ध आचरण व चांगल्या संस्कारात दडल्याचे कवी सांगतो. अशाच एका निसर्ग वर्णनात कवी म्हणतो ओल्या मातीला गंध सृजनाचा, मोगऱ्याचा गंध जणू सृष्टीला बहार, सोनेरी किरणांची जणू सोनेरी झालंर, खेळ उन पावसाचा आकाशी सप्तरंगी कमान. चिऊ काऊच्या लग्नात कोकिळ गाते गाणं. निसर्गाच्या सौंदर्यात लागे पांडुरंगाचे ध्यान.. ही आर्ततेची भावना कवीला आनंद देते. “लेक आलीया परतीने” या कवितेत लग्नानंतर माहेरवाशी येणाऱ्या लेकीच्या स्वागतासाठी आतुरलेल्या आईच्या हळव्या मनाचे दर्शन अत्यंत हळुवारपणे साकारले आहे. माईच्या लेखी लेक म्हणजे आनंद, आनंदी मन, लेक म्हणजे हिरवा चुडा, लेक म्हणजे काळजाचा तुकडा, लेक म्हणजे सुखाचे प्रतिबिंब, लेक म्हणजे संसाराचे सार, लेक म्हणजे परमेश्वराचा उपहार, या लेकीच्या आगमनाची शुभ वार्ता मनाला सुखद धक्का देते. लेक संसाराचा पाया, लेख प्रपंचातील माया अशी उदात्ततेची भावना निर्माण होते.. म्हणून ती लेकीला तुझ्या संसाराचा पिसारा फुलवं आणि नवीन वंशविस्तार कर असा आशीर्वाद देते. लेक माहेरी येण्याची आतुरता व्यक्त करणाऱ्या ओळी…
आवाज येता गं गाडीचा
माय कावरी बावरी..
आया बायाना सांगते
लेक येतेय माहेरी…
असे मातेचे विशाल हृदय लेक आलिया परतून कवितेत अनुभवायला मिळते.
अशाप्रकारे नवोदित कवी ‘पांडुरंग मुंजाळ’ यांनी आपल्या पहिल्याच प्रयत्नातून अत्यंत आशयघन व प्रगल्भ रचना साकारल्या आहेत. त्यांच्या कवितेत सामाजिक भान आहे, सामाजिक जान आहे, विरह.. दुःख.. कारूण्य.. प्रेरणा व प्रोत्साहन देणाऱ्या शब्दातून त्यांनी सृजनाची पालखी उचलली आहे म्हणून त्यांच्या पुढील लिखाणास हृदय पूर्वक शुभेच्छा देतो. त्यांचे म्हणने त्यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर असे म्हणता येईल…
“माझ्या लेखणीला आज
कसे लागले डोहाळे..
आली प्रकाश किरणे
करा उत्सव सोहळे..
करा उत्सव सोहळे…”
पुस्तक : सुखाचे गोंदनं… (कवितासंग्रह)
लेखक : पांडुरंग मुंजाळ (गोंदनकार)
प्रकाशक : मधुशाला प्रकाशन, भरतपूर (राजस्थान)
मुखपृष्ठ : वसंत गाडेकर
पाठराखण : आत्माराम राजेगोरे
पृष्ठसंख्या : ११२
स्वागत मूल्य : २२०
प्रा.डॉ.शशिकांत तोळमारे
श्री.योगानंद स्वामी कला महाविद्यालय
ता.वसमत,जि.हिंगोली



