नाट्यकलेचे खरे जनक ; विष्णुदास भावे
लेखिका तारका रूखमोडे अर्जुनी मोरगाव, गोंदिया
नाट्यकलेचे खरे जनक ; विष्णुदास भावे
भारतीय संस्कृतीच्या साहित्य इतिहासात रंगभूमीचे नाव सुवर्णाक्षरात नोंदवले जाईल इतके महान कार्य मराठी रंगभूमीचे आजतागायतचे आहे. कारण, समाजमनाचे व मताचे स्वच्छ प्रतिबिंब नाटकातून उभे राहते. हा समाज आरसा दाखवण्याचं कर्तृत्वशील कार्य करणारं बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे नाटककारातील अग्रज ‘विष्णुदास अमृत भावे’ होय.
मराठी रंगभूमीला विष्णुदास भावे यांचे महान योगदान आहे. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वप्रभेला नाटक हे केवळ मनोरंजनाचं उद्दिष्ट न ठेवता त्यात त्यांनी जीव ओतून धार्मिक पद्धतीचे लोकशिक्षण तथा मनोरंजनाचं एक नवं दर्पण व नाटकाचा एक विशिष्ट ढाचा समाजासमोर मांडला.हे नवं स्थित्यंतर त्यांनी घडवून आणलं. ५नोव्हेंबर १८४३ रोजी सांगली येथे ‘सीता स्वयंवर’ हे आख्यानावर आधारित नाट्य प्रयोग करून रंगभूमीचे बीज रोवले.रामायणातील दहा विषयांवर वैविध्यपूर्ण नाटके लिहून त्यांचा नूतन प्रयोग सांगली संस्थानात करून प्रेक्षकांना आकर्षित केलं.महाराष्ट्रात त्यांनी नाटकात नवीन पदांची रचना केली.अख्ख्या महाराष्ट्राला हा प्रयोग नवीन होता. कारण तत्पूर्वी महाराष्ट्रात निव्वळ मनोरंजनाच्या स्वरूपात कोणताही शिष्टसंमत प्रकार रूढ नव्हताच.
बरीचशी करमणूक धार्मिक स्वरूपाची होती, कळसूत्री बाहुल्या, लळिते व तमाशा असे करमणुकीचे प्रकार होते. सर्वांचा एकाच वेळी आस्वाद घेता येईल असे सुरुचीपूर्ण काही नव्हतेच. परंतु भावेंनी कथा व पुराण यावर आधारित मनोरंजनासोबतच यथायोग्य लोकशिक्षण व्यासनारदांच्या वाक्पीठांच्याद्वारे समाजास देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्यांच्या नाटकात शोकरस, वीररस उत्तमप्रकारे साधला.
भाषाही सुश्लिष्ट,भारदस्त, प्रौढ वापरून, काव्यपूर्ण पदे,चटकदार संवाद यथायोग्य योजली.सूत्रधाराची विनोदी भाषणे,श्री व सरस्वती स्तवनाने प्रारंभ ही पद्धत वापरली.नट स्वयंस्फूर्तीने प्रसंगोचित संवाद करीत. पखवाजाचा स्वर साज चढवून अनेक रागरागिण्यांचा उपयोगही केला. नाट्यकलेसाठी गरजेचे असणारे साधनासांभारासह कलेच्या दृष्टीने स्वयंपूर्ण स्वतंत्र असे अधिष्ठान निर्माण करून नाट्यप्रयोग हेच जिचे उद्दिष्ट अशी संघटना निर्माण करून ती समाजासमोर सादर केली.म्हणूनच मराठी रंगभूमीचे ‘निर्माते'(जनक)त्यांना मानले जाते.
१८४३ साली आपल्या आश्रयदात्यांसमोर ‘सीता स्वयंवर’ या स्वरचित नाट्याचा अभिनव प्रयोग करून त्यांनी एका नवीनच युगाला जन्म दिला.त्यांच्या पुणे मुंबई दौऱ्यांमुळे महाराष्ट्रात करमणुकीचे एक नवीन क्षेत्र निर्माण झाले.नंतर त्यांच्यापासून स्फूर्ती घेऊन अनेक नाट्यमंडळे निघाली ही अपूर्व क्रांती व हे पहिले स्थित्यंतर झाले ते केवळ विष्णुदासांमुळेच.’नाटक’ नावाचे गोंडस नामकरण त्यांच्याचमुळे झाले.
महाराष्ट्र तथा देशाला रंगभूमी त्यांनीच उपलब्ध करून दिली. नाटककार, पत्रकार, दिग्दर्शन तालीम मास्तर, कपडेवाला, रंगवाला सर्व भूमिका ते स्वत: पार पाडायचे.हा सर्व रंगभूमीचा एक विशिष्ट साचा त्यांनी स्वतः निर्माण केला,मराठी रंगभूमीवर पुढे कोणासच हे काम करावे लागले नाही म्हणून विष्णुदासांच्या उन्मेषशालिनी, नवप्रतिभेची कल्पना येते.म्हणूनच महाराष्ट्राचा भरतमुनी,रंगभूमीचा विश्वकर्मा, जनक हे नामाभिधान त्यांना अगदी यथार्थ आहे.”मराठी अस्मिता जपणाऱ्या या महान विश्वकर्म्याचा मराठी रंगभूमीला व आम्हा मराठी माणसांना सार्थ अभिमान आहे”.
लेखिका तारका रूखमोडे
अर्जुनी मोरगाव, गोंदिया



