न्यायाचं बाळकडू देणारी स्वराज्यजननी
कार्तिक झेंडे पाटील ता.श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर

न्यायाचं बाळकडू देणारी स्वराज्यजननी
छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची निर्मिती केली. शेकडो वर्षांचा गुलामीचा अंधार हटवून स्वातंत्र्याचा प्रकाश शिवरायांनी इथल्या मातीत पेरला. रयतेचे राज्य उभा राहिले. मात्र शिवरायांचे राज्य हे केवळ तलवारीच्या जोरावर निर्माण झाले नाही; तर ते राज्य न्याय आणि समतेच्या विचारांवर आधारलेले होते. हे विचार शिवरायांच्या ठायी रुजवले ते मासाहेब जिजाऊंनी. मातृशक्तीचे तेजस्वी प्रतीक असणाऱ्या मासाहेब जिजाऊंनी केवळ एका पुत्राला जन्म दिला नाही, तर स्वराज्य आणि समतेच्या विचारांच राज्य निर्माण करणाऱ्या एका युगपुरुषाला घडवल आहे. स्वराज्य हे न्याय आणि समता या मूल्यांवर आधारित राज्य होते. हे राज्य मासाहेब जिजाऊंच्या प्रेरणेने निर्माण झाले. जिजाऊंकडून मिळालेल्या बाळकडूतूनच शिवरायांच्या आतला न्यायप्रशासक राजा घडला.
‘शिवरायांना स्वराज्याचा विचार देणारी महान प्रेरणाशक्ती म्हणजे राजमाता जिजाऊ’. परकीय जुलूमशाहीच्या वरवंट्याखाली भरडल्या जाणाऱ्या सामान्य रयतेचे हाल जिजाऊंनी पाहिले होते. आदिलशाही, मुघलशाही यासारख्या अन्यायी राजवटीत महिलांवर होणाऱ्या अत्याचार आणि सर्वसामान्य रयतेवर होणाऱ्या जुलून जबरदस्तीतून त्यांची मुक्तता करण्याचा निर्धार जिजाऊंनी केला. सर्वसामान्य रयतेच्या डोईवर सुखाचे छत्र धरायचे असेल तर रयतेचे राज्य उभा राहिले पाहिजे, या क्रांतिकारी विचारातूनच स्वराज्याची निर्मिती झाली. जिजाऊंनी शिवरायांना दिलेल्या संस्कार आणि विचारांमधूनच शिवरायांचे व्यक्तिमत्व घडले गेले. जिजाऊंनी शिवरायांना बालपणी रामायण, महाभारत, संतपरंपरेतील कथा सांगून धर्म, सत्य, नितीमत्ता, समता आणि न्यायाचे बाळकडू दिले. ‘रयतेच हित राजासाठी सर्वोच्च असावं’ ही शिकवण त्यांनी शिवरायांना दिली. जिजाऊंच्या या संस्कारांचा प्रभाव शिवरायांच्या जीवन चरित्रात आपल्याला दिसतो. स्त्रियांचा सन्मान, शेतकऱ्यांचे हित आणि अन्याय अत्याचारावर कठोर शासन यातून शिवरायांची न्यायाची भूमिका आपल्या लक्षामध्ये येते.
शिवरायांच्या बालपणी पुण्याच्या लालमहालात जिजाऊंच्यासमोर मावळ प्रांतातील जमिनीचे तंटे, जमिनीवरून होणारे वाद मिटवले जायचे, सामान्य लोकांना न्याय देण्याचे पवित्र कार्य चालायचे. रयतेचे हित जोपासत मासाहेब जिजाऊ हे सर्व प्रश्न निकाली काढायच्या. हे सगळं पाहत-पाहत शिवरायांचे बालपण समृद्ध झाले. शिवरायांनी स्वराज्याच्या न्यायदानात कधीही जातीधर्माचा भेद केला नाही. जिजाऊंच्या महान संस्कारातूनच स्वराज्य उदयास आलं. इथली माणसं माणूस म्हणून जगायला शिकली. बाया बापड्या निर्धास्त झाल्या, शेतकऱ्यांच्या कष्टाला मोल मिळालं, अवघी रयत गुण्या गोविंदाने नांदू लागली ती शिवरायांसारख्या प्रजाहितदक्ष राजामुळे. आणि हे सगळं शक्य झालं ते जिजाऊंच्या शिकवणीतून.
कार्तिक झेंडे पाटील
ता.श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर
========



