“कालबाह्य होऊ घातलेली ती प्रेमळ शिक्षा हाताची घडी”: शर्मिला देशमुख
मंगळवारीय आम्ही बालकवी स्पर्धेचे काव्यपरीक्षण
“कालबाह्य होऊ घातलेली ती प्रेमळ शिक्षा हाताची घडी”: शर्मिला देशमुख
‘मंगळवारीय आम्ही बालकवी स्पर्धेचे काव्यपरीक्षण‘
“हाताची घडी तोंडावर बोट, मामाच्या खिशात फाटकी नोट…”
‘हाताची घडी’ ही संकल्पना कालबाह्य होत चालली असली तरीही त्या संकल्पनेतील प्रेम, आनंद आजही या ओळींमधून स्पष्टपणे जाणवतो. वर्गामध्ये विद्यार्थ्यांचा गोंधळ सुरू झाला की, त्यांना शांत करण्याचा पर्याय म्हणून गुरुजी हाताची घडी तोंडावर बोट असे म्हणत आणि विद्यार्थी लगेच हाताची घडी घालून तोंडावर बोट ठेवत आणि वर्ग कसा अगदी शांत होई. आज कृतीशील अध्ययन अध्यापन पद्धतीमध्ये या संकल्पना कालबाह्य झाल्या आहेत.
‘छडी लागे छम छम विद्या येई घमघम..’ हेही त्याच कालखंडातील समकालीन ब्रीद म्हणावयास हरकत नाही. पण खरच अंतर्मुख व्हायचे म्हटले, तर तो कालखंड होताच तसा भारी. गुरुजी म्हटले की त्यांच्याबद्दलचा आदर, आदरयुक्त भीती ही काही वेगळीच होती. गुरुजींच्या समोरून जाणेही त्याकाळी आम्हाला नको वाटायचे कारण आदरयुक्त भीती. गुरुजींनी सांगितले म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेघ ..इतका तो ठाम विश्वास! तसा गावागावात, खेड्यापाड्यांमध्ये गुरुजींना मानही तितकाच मिळत असे. औद्योगीकरणाचे वारे वाहू लागले तसे शिक्षणामध्येही आमुलाग्र बदल झाले. पहिली शिक्षण पद्धती कालबाह्य ठरत गेली.
काळ बदलला.. ज्या पालकांचे पालक आमच्या मुलाला नाही आले, अभ्यास नाही केला तर मरेपर्यंत मारा म्हणून सांगायला यायचे त्याच पालकांचे मुले आज पालक बनून शाळेत येतात आमच्या मुलाला मारू नका हे सांगायला. तसं पाहता आरटीई ऍक्ट 2009 कलम 17 द्वारे मुलांना शारीरिक किंवा मानसिक त्रास देणे किंवा शिक्षा करणे प्रतिबंधित आहे. मुलांच्या सुरक्षित आणि सकारात्मक शिक्षणाच्या वातावरणाची खात्री करणे हा यामागचा उद्देश आहे. हा उद्देश खरंच चांगला आहे, मुलांना शिक्षा देऊन समजावण्यापेक्षा प्रेमाने समजावले तर ते अधिक चांगले समजते हे शिक्षक म्हणून मी ठामपणे सांगू शकते. आणि या बदलत्या काळासोबतच हाताची घडी तोंडावर बोट ही संकल्पना कधी मागे पडली हे समजले नाही.
कधीकधी असे कालबाह्य झालेले विषय देऊन ‘राहुल दादा’ सर्व जुन्या आठवणींना उजाळा देण्याचे काम करत असतात आणि आम्ही व आमचे बालकवी या जुन्या आठवणीमध्ये अगदी रंगून जातो. पुन्हा बालपणात जाऊन रममान होतो सर्व आठवणी ताज्या होतात आणि त्या शब्दांमध्ये उतरतात. पण बालकवितेविषयी काही सांगणे आवश्यक वाटत आहे.
बालकविता ही बालपणात जाऊन बासुलभ कल्पनांमध्ये, बालपण स्वतः जगून लिहिणे आवश्यक आहे. त्यामध्ये बाल सुलभ भावना या अंर्तआत्म्यातून येणे आवश्यक आहे. बऱ्याच वेळा एखादी कविता ही बालकविताच आहे का असा प्रश्न पडायला लागतो. इतर कवितांचे वाचन, संकल्पना , कल्पना, बालसुलभ भावना या समजून घेऊन लिहिण्याचा सर्व बालकवींनी प्रयत्न करावा. विषय समजून घेऊन त्यानुरूप विषयात सखोल जाऊन लेखन करावे,तरच ती बालकविता ठरेल अन्यथा ती कविता या प्रकारात मोडेल. असो सर्व बालकवींना बालकाव्य लेखनासाठी भरभरून शुभेच्छा. सर्वांचे प्रयत्न हे कौतुकास्पद आहेत. मला राहुल दादांनी परीक्षण लेखनाची संधी दिली त्याबद्दल त्यांचे शतशः ऋण.तूर्तास थांबते.. धन्यवाद!!
शर्मिला देशमुख -घुमरे, बीड
मुख्यपरीक्षक /समीक्षक/ लेखक/कवयित्री
सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह



