व्यापक दृष्टिकोनातून प्रपंच करावा; वृंदा करमरकर
सोमवारीय काव्यत्रिवेणी स्पर्धेचे परीक्षण
व्यापक दृष्टिकोनातून प्रपंच करावा; वृंदा करमरकर
सोमवारीय काव्यत्रिवेणी स्पर्धेचे परीक्षण
प्राचीन हिंदू समाज व्यवस्थेनुसार माणसाच्या जीवनात चार कालखंड मानले आहेत. ब्रम्हचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्याशाश्रम हे ते चार कालखंड आहेत. यातील गृहस्थाश्रम श्रेष्ठ मानला आहे. ‘प्रपंच करणे म्हणजेच संसार करणे’. योग्य वयात लग्न करून पोटापाण्याचा उद्योग करणे, घरी आलेल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य करणे, सामाजिक, धार्मिक समारंभात तन, मन धनाने सहभागी होणे, मुलांच्या शिक्षणाची, संसाराची व्यवस्था करणे. या गोष्टी प्रपंच करताना कराव्या लागतात.
संत रामदास स्वामी म्हणतात, “आधी प्रपंच करावा नेटका|मग घ्यावे परमार्थ विवेका||”संत रामदासांप्रमाणेच, अन्य संतांनी ही प्रपंच करून परमार्थ साधण्याविषयी आवर्जून सांगितले आहे. प्रपंच म्हणजे संग्रह करणे. जमा करून ठेवणे. आपण जन्माला आल्यापासून बाह्य जगाशी आपला जो व्यवहार असतो तो प्रपंचच आहे. प्रपंच आणि परमार्थ ही या संसाररथाची दोन चाके आहेत. प्रपंच करीत परमार्थ करता येतो. सध्या प्रपंच करताना अतिशय संकुचित दृष्टीकोन बाळगला जातो. प्रपंच विवेकाने करता आला पाहिजे. मोह, लोभ , वासना, कामना विरहित राहून, आसक्ती सोडून निस्वार्थी वृत्तीने प्रपंच करता आला पाहिजे. अपेक्षासोडून कर्तव्य भावनेने प्रपंच करावा. अगदी संसारात राहून कमलपत्राप्रमाणे अलिप्त राहता आले पाहिजे. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे आपले प्रत्येक कर्म भगवंताला अर्पण करता आले पाहिजे हाच परमार्थ आहे.
प्रपंच करावा न होता लिप्त
रहावे कमल पत्रापरी अलिप्त
हीच गृहस्थाश्रमाची मेख
आता आणखी एक गोष्ट म्हणजे प्रपंच करताना इतरांशी प्रेमाने व्यवहार करावा. आपली नाती जपावी विशाल दृष्टीकोन ठेवून अखिल विश्वाशी नाती जोडावी. प्रपंच आनंदाने करावा तरच खरे समाधान लाभेल. आजच्या त्रिवेणी काव्य स्पर्धेसाठी आदरणीय राहुल सरांनी दिलेला ‘प्रपंच’ हा विषय बहुआयामी आहे. शिलेदारांनी पण स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचे आभार.
वृंदा(चित्रा)करमरकर
मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक
सांगली जिल्हा सांगली
©मराठीचे शिलेदार समूह



