कटू गोड आठवणींचा ‘गारवा नवा’ आता मनी रुजवा”; वृंदा करमरकर
सोमवारीय काव्यत्रिवेणी स्पर्धेचे परीक्षण
“कटू गोड आठवणींचा ‘गारवा नवा’ आता मनी रुजवा”; वृंदा करमरकर
सोमवारीय काव्यत्रिवेणी स्पर्धेचे परीक्षण
पावसाच्या सरी अंगणात बरसल्या की, गारव्याच्या कुशीत आठवणी बहरतात, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. पावसाळ्यातील श्रावण महिना तर अगदी कलंदर असतो. तो व्रतस्थ तर असतो च पण रसिकही असतो. या महिन्यात पावसामुळं साऱ्या सृष्टीला एक नवं सौंदर्य लाभतं. हिरवाईनं नटलेले डोंगर, झुळझुळ वाहणारे झरे, धुक्याची दुलई पांघरलेली गावं, प्राजक्त, मोगरा, जाईजुई, केवडा, सोनचाफा यांचा दरवळ मन मोहून टाकतो. निसर्ग अंगांगी फुलतो. आकाशात दिसणारे इंद्रधनुष्य, पावसाच्या थेंबांनी सजलेली पानं, फुलं आणि पक्ष्यांचं कूजन मनाला भुरळ घालतं. श्रावणातल्या सकाळी कोवळ्या उन्हात पावसाचे थेंब चमकतात, जणू काही रत्नजडित दवबिंदूच.श्रावण आपल्या बरोबर सणांचं रिंगणच घेऊन येतो. मंगळा गौर,नागपंचमी, श्रावणी शुक्रवार ,सोमवार असे पवित्र दिवस असतात. त्यात चातुर्मासही असतो.
श्रावण महिना निसर्ग सौंदर्य आणि धार्मिकता यांचा सुंदर संगम असतो.या महिन्यात सृष्टी ताजीटवटवीत होते आणि मन चिंतनशील होते, म्हणूनच श्रावणाला “सृष्टीचा उत्सव” असेही म्हणतात. यावेळी हवेत एक वेगळाच गारवा येतो.तो केवळ हवा हवासा वाटतो. यावेळी प्रेय सीला प्रियकराची आठवण येते. यातूनच महाकवी कालिदासानं प्रियेला निरोप सांगण्यासाठी मेघाला आळवत ‘मेघदूत’ हे महाकाव्य लिहिलं. आपल्या प्रियजनांची या गारव्यात सय येते. पावसाच्या सरी, हिरव्या गार शेतात भिजणारे दिवस, ओल्या मातीचा सुगंध, आणि शाळेतील सहली यांची आठवण या गारव्यात हमखास येते.
आईच्या हातची पुरणपोळी, नैवैद्याचा दरवळ या गारव्या त अधिकच आनंद देतो. दारी टांगलेले झुळझुळते रेनकोट, आणि पावसात चिंब होऊन आलेली मित्रमंडळी, यामुळं बालपणीचा पावसाळा पुन्हा जिवंत होतो.झाडांवर टपक णारे थेंब, खिडकीपलीकडून दिसणारी धुक्याची चादर, आणि कानात वाजणारे दूरदूरच्या ढगांचे आवाज — या साऱ्यामुळे मनात एक शांत, पण हळवी जाणीव दाटून येते. यावेळी माणूस फक्त बाहेरच्या सृष्टीत हरवलेला नसतो, तर तो स्वतःच्या आठवणींच्याही गारव्यात रमलेला असतो. जुन्या डायऱ्या, पत्रे, आणि फोटो पुन्हा हातात घेतले जातात. काही आठवणी गोड, काही जरा दुख:दायक, पण दोन्ही गारव्यासारख्या मनात खोलवर रुजलेल्या.
श्रावण म्हणजे सृष्टीचा गारवा आणि मनाचा निवांतपणा. आठवणींच्या धाग्यांनी विणलेला हा एक भावविश्वाचा उत्सव असतो. आठवांचा रुजवा असतो हा गारवा नवा. पण कित्येकदा या पावसाळ्यात अती वेगानं वारे वाहणं, त्यामुळं हवेत खूप गारवा येणं, ढगफुटी होणं त्यामुळं शेतीचं अपार नुकसान होतं. किनाऱ्या लगतच्या गावांमध्ये चक्रीवादळाचा धोका संभवतो. म्हणून ऋतुचक्रातील हे, बदल वेळीच ओळखले पाहिजेत. आजच्या या काव्य त्रिवेणी स्पर्धेसाठीआपल्या आदरणीय राहुल सरांनी ‘हा ‘गारवा’नवा’ हा वैचारिक विषय दिला. सर्व शिलेदारांनी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.
वृंदा(चित्रा)करमरकर
मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक
सांगली जिल्हा सांगली
©मराठीचे शिलेदार समूह



