प्रेमास भाव-भावनांचे गहिरे रंग यावे; वृंदा करमरकर
सोमवारीय 'काव्यत्रिवेणी' स्पर्धेचे काव्यपरीक्षण

प्रेमास भाव-भावनांचे गहिरे रंग यावे; वृंदा करमरकर
सोमवारीय ‘काव्यत्रिवेणी’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
‘प्रेम हे देवाने दिलेले अमोल वरदान आहे. खऱ्या प्रेमात त्याग असतो. प्रेम हृदयाची भाषा बोलते, प्रेमात असणारा विश्वास नात्याला मजबूत करतो. प्रेम दुःखात आशा देते, आणि एकटेपणात साथ देते’. ते केवळ देहाशी जोडलेले नसते, तर आत्म्याच्या गाभ्याशी जुळलेले असते. प्रेम ही मानवी जीवनातील सर्वात कोमल, पवित्र आणि सामर्थ्यशाली भावना आहे. जशी इंद्रधनुष्याला विविध रंगांनी शोभा येते, तसेच प्रेमालाही विविध भावनांचे रंग लाभले की ते अधिक सुंदर आणि अर्थपूर्ण बनते.
प्रेमाची अनेक रुपे असतात. आईचे आपल्या लेकरांवरचे प्रेम, भावबहिणींचे प्रेम, पती पत्नीतील प्रेम, श्रीराम- भरत यांचे बंधुप्रेम अलौकिक. चौदा वर्ष श्रीरामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून भरताने राज्य कारभार केला. लक्ष्मण आणि रामाचं प्रेम तर सर्वश्रुत आहे. कृष्ण सुदामा यांच्यातील मित्रप्रेम. सुदाम्याच्या मूठभर पोह्यांनी तृप्त होणारा हा द्वारकाधीश आपल्या मित्राला न मागता सारे ऐश्वर्य देतो. गोप गोपिकांचे श्रीकृष्णा वरील प्रेम त्यागमय होते. राधाकृष्ण यांचे अद्वैत साधणारे प्रेम. मीरेची मधुरा भक्ती आणि त्या भक्ती -प्रेमात आकंठ बुडालेला श्रीहरी. त्या प्रेमाच्या अलौकिकतेतून विष मिरेनं प्यालं आणि श्री हरी निळासावळा झाला.
आता भर पावसात पंढरीला जाणाऱ्या हजारो वारकऱ्यांच्या भक्ती पुरात विठूराया नाहून जातो.हे अबीरा नं गंधित झालेले भक्ति -प्रेम. आपले जवान रात्रंदिवस सीमेचे रक्षणकरतात. उन्ह, वारा, पाऊस, कडक गोठवणारी थंडी यांची ते तमा करत नाहीत. केवळ देशप्रेमातून हा अपार त्याग जन्म घेतो. प्रियकर -प्रेयसीचे प्रेम, मदर तेरेसा, बाबासाहेब आमटे, प्रकाश आमटे, मंदाकिनीआमटे, सिंधुताई सपकाळ यांचे समाजावरील निस्वार्थी प्रेम अक्षरश: अनुपमेय आहे. शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले, त्या स्वराज्याच्या प्रेमापोटी शिवरायांवरील निष्ठेसाठी प्राण पणाला लावणारे मावळे, यांचे प्रेम सुध्दा अलौकिकच.
सध्या ऋतुराज वसंताची चाहूल लागली आहे. सृष्टीच्या अंग प्रत्यंगात चैतन्य चेतले आहे. सृष्टी अनेक रंग ल्यायले आहे. वाऱ्यांतून मंद सुगंध दरवळू लागला आहे. झाडांच्या फांद्यांवर नवकुसुमांची, नवपालवीची आरास खुलून दिसत आहे. “वसंत म्हणजे निसर्ग आणि सृष्टीचा आनंदोत्सवच जणू”. वसंत आणि सृष्टी यांचा हा प्रेमरंग मनाला नवचैतन्य देऊन जातो. प्रेमाला रंग यावेत म्हणजे ते विविध भावनांनी रंगून, सजून जावेत. आपुलकी, विश्वास, त्याग, सहानुभूती आणि क्षमा या रंगांनी नटलेले प्रेम जीवनाला आनंद, समाधान आणि शांती प्रदान करते. असे रंगलेले प्रेमच जीवन अधिक सुंदर आणि अर्थपूर्ण बनवते. आजच्या काव्य त्रिवेणी स्पर्धेसाठी आदरणीय राहुल सरांनी ‘प्रेमास रंग यावे’ हा अर्थपूर्ण विषय दिला. सर्व शिलेदारांनी स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिला. मला परीक्षण लिहिण्याची संधी दिल्याबद्दल राहुल सरांची आभारी आहे.
वृंदा (चित्रा) करमरकर
मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक
सांगली जिल्हा सांगली
©मराठीचे शिलेदार समूह



