चिडचिड ते बडबड ‘केमिकल लोचा’
डॉ. राजेश चंद्रकांत काळे 'राजस' ता. जिल्हा नागपूर
चिडचिड ते बडबड ‘केमिकल लोचा’
“चिडचिड” हा शब्द तुम्ही कित्येकदा ऐकला असेल अनुभवला ही असेल, नाही का? एखादी गोष्ट आपल्या अपेक्षेप्रमाणे झाली नाही. वेळेवर पूर्ण झाली नाही. त्यात काही त्रुटी निघाल्या…., किंवा आपल्या माणसाने आपल्या मनासारखे वागले नाही, अशी अनेक कारणे असू शकतात. आणि मग नकळत चिडचिड सुरू होते.
चिडचिडीमुळे बडबड:
चिडचिड वाढली की शब्दांना लगाम राहत नाही, मनातला ताण थेट ओठांवर येतो. समोरच्याची अवस्था न पाहता बडबड सुरू होते, नंतर मात्र शब्दांचीच खंत बोचत राहते. क्षणिक राग कायमची दरी निर्माण करू शकतो, हे उमगते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. म्हणून चिडचिडीवर संयमाचा उपाय हवा, नाहीतर शब्दच नात्यांना जखमी करतात. पण ही चिडचिड नेमकी असते तरी काय? ती फक्त स्वभावाची सवय आहे का, की तिच्यामागे काही खोल कारणे दडलेली आहेत?
चिडचिड झाली की मेंदूत काय घडते?
चिडचिडीच्या वेळी मेंदूत तणाव निर्माण करणारी हार्मोन्स (Stress Hormones) वाढतात. भावनांचे केंद्र अधिक सक्रिय होते, तर निर्णय घेणारा भाग Prefrontal Cortex हळूहळू कमजोर होतो. परिणामी भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण होते. मेंदूतील रासायनिक संदेशवहनात (Neurotransmitters) बदल होतात. यामुळे मूड स्विंग्स, एकाग्रतेचा अभाव, मानसिक थकवा जाणवू लागतो. या सगळ्याचा थेट परिणाम फक्त मनावरच नाही, तर शरीरावरही होतो.
मेंदूतील प्रमुख बदल:
1. Hyperactive Amygdala (अतिसक्रिय अमिग्डाला): हा भाग भीती, राग आणि धोक्याच्या भावना नियंत्रित करतो. चिडचिडीच्या वेळी तो जास्त सक्रिय होतो, त्यामुळे किरकोळ गोष्टीही मोठ्या वाटू लागतात. लगेच राग येतो आणि परिस्थितीचे गांभीर्य समजणे कठीण होते.
2. Impaired Prefrontal Cortex (कमजोर निर्णयक्षमता): विचार, विवेक आणि भावनांवर नियंत्रण ठेवणारा हा भाग तणावामुळे मंदावतो. मग तर्कसंगत विचार करता येत नाही, योग्य शब्द सापडत नाहीत आणि नंतर पश्चात्ताप होईल असे निर्णय घेतले जातात.
3. Stress Hormones: कॉर्टिसोल आणि ॲड्रेनालाईनसारख्या हार्मोन्सची पातळी वाढते. शरीर कायम ‘लढा किंवा पळा’ (Fight-or-Flight) या अवस्थेत राहते.
4. Neurotransmitter Imbalance: सेरोटोनिन आणि डोपामाइन यांचे संतुलन बिघडते. आनंद कमी होतो, अस्वस्थता वाढते आणि चिडचिड कायमची बनू लागते.
या बदलांचे परिणाम:
१) मानसिक थकवा: सततच्या तणावामुळे मन दमून जाते.
२) एकाग्रतेचा अभाव: लक्ष केंद्रित होत नाही (Brain Fog).
शारीरिक त्रास: डोकेदुखी, पोटदुखी, झोप न लागणे, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे. कारण मन आणि शरीर हे वेगळे नसून एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत.
३)सअगदी इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) सारखे आजारही दीर्घकाळच्या चिडचिडीतून तयार होऊ शकतात.
यापेक्षाही भयंकर परिणाम:
सततच्या चिडचिडीमुळे तुम्ही हळूहळू माणसांपासून दूर जाऊ लागता. मनात दुरावा निर्माण होतो, नात्यांत कटुता साचते, प्रेमात भीती शिरते. आपली माणसं आजूबाजूला असतात, पण आपल्या रागाच्या, चिडचिडीच्या भीतीने ती आपल्यापासून आतून दूर गेलेली असतात… आणि हे आपल्याला कळतसुद्धा नाही. आपल्याला वाटते,
“समोरच्याने मला समजून घेतलं पाहिजे.” पण हो… किती दिवस? जर आपण स्वतःला वेळीच सावरलं नाही, तर हाच आजार आपल्याला एकटेपणाकडे, नैराश्याकडे तर कधी कधी वेडेपणाकडेही ढकलू शकतो.
मग करायचं काय?
थांबा… थोडेसे. एक क्षण स्वतःसाठी घ्या. लगेच प्रत्युत्तर देऊ नका.समोरच्याला दोष देण्याआधी स्वतःकडे पाहा. एखादी गोष्ट मनासारखी होत नसेल, तर थोडा वेळ टाळा.
चिडचिड कमी करण्यासाठी:
१) ध्यान व श्वासोच्छवासाचे व्यायाम: अमिग्डाला शांत करतात.
२) नियमित व्यायाम: तणाव कमी करतो, मन प्रसन्न ठेवतो.
३) संतुलित आहार: ओमेगा-३, अँटीऑक्सिडंट्स असलेले पदार्थ घ्या.
४) पुरेशी झोप: मेंदूला पुनर्बांधणीसाठी वेळ देते.
५) आठवणी जपा: तुमच्या आयुष्यातील प्रेमाचे, गोड क्षण आठवा.
६) मन केंद्रित करा आणि पहा, तुमची चिडचिड हळूहळू कशी विरघळते ते. कारण शांत मन हेच निरोगी शरीराचं आणि सुंदर नात्यांचं मूळ असतं.
“चिडचिड कमी झाली की, मला नक्की कळवा बरं का”?
डॉ. राजेश चंद्रकांत काळे ‘राजस’
ता. जिल्हा नागपूर
rajeshkale215@gmail.com
=========



