आयुष्यातील नवे वळण
कुसुमलता दिलीप वाकडे
आयुष्यातील नवे वळण
“सूर्यसारखे तळपुनी जावे, क्षितिजावरून जाताना
दगडलाही पाझर फुटावा, निरोप शेवटी देताना ”
माझ्या आयुष्यातील दुसरे पर्व 30 सप्टेंबर 2023 ला सुरू झाले. मी 12 वी झाल्यानंतर डी.एड्. ला प्रवेश घेतला. डी.एड्. व्दितीय वर्षाला असतानाच मला एम्प्लॉयमेंट मार्फत पंचायत समिती भद्रावती, जिल्हा परिषद चंद्रपूर येथे क्लर्क या पदाकरीता बाय पोस्ट घरच्या पत्त्यावर आर्डर आली होती. कारण माझे वडील 9,10,11,12 वर्ग शिकत असतानाच मला उन्हाळी सुटयात टाईपिंग क्लासेस लावून द्यायचे व माझी इंग्रजी,मराठी, हिंदी टाईपिंग 30 ,40 ची स्पीड चांगली असल्यामुळे छान टक्केवारी असायची. मी भद्रावती कधी बघितले नव्हते आणि त्यावेळेस माझे वय 20 वर्ष असेल. आजोबाची प्रकृती बरी नसल्यामुळे आई बाबुजी तुमसरला आजोळी गेले होते.आम्ही बल्लारपूरला राहत होतो. ऑफिस वेळ माहित नसल्यामुळे मी भद्रावती ऑफिसला 12 वाजता पोहोचले.मला रुजू प्रतिवेदन कसे लिहायचे माहित नसल्यामुळे तेथील सातपुते बाबुनी कच्चे अर्ज लिहून दिले. त्याप्रमाणे मी माझ्या हस्ताक्षरात रूजू प्रतिवेदन सादर केले.मी क्लर्क या पदावर 09/09/1986 पासून रुजू झाले.
ऑफिस वेळ सकाळी 10 ते 5.45 असल्यामुळे बाबुजीनी पंचायत समिती च्या जवळच किरायांची खोली बघितली माझ्यासोबत माझी आजी राहत असे.मला सुरुवातीलाच बीडीओ बी.एन.राऊत साहेबांनी शिक्षण विभाग दिले जनरली नवीन क्लर्कला आवक जावक टेबल दिला जातो.माझ्यासोबत असणारे वरिष्ठ लिपिक उमरे बाबुनी सुरुवातीला मदत केली. नोटशीट कशी तयार करायची, सेवापुस्तकात सुट्याच्या नोंदी, वेतनवाढ, इत्यादी त्या काळात पगार बील हातानी विशिष्ट फार्मवर तयार करावा लागत असे. मला शिक्षण विभाग मिळाल्यामुळे शिक्षकांचे सेवापुस्तक हॅंडल करण्यापासून त्याच्या सुट्या पगार बील संपूर्ण बाबी पाहावे लागत असे एका बीटात 45 शिक्षक म्हणजेच बारा तेरा शाळेचा समुह ,माझ्याकडे तीन बीट होते मांगली,चोरा चंदनखेडा, व इतरही कागदोपत्री डाग असायची ज्याचा पत्रव्यवहार तात्काळ करावा लागायचा मी हे सर्व लवकरच अवगत केले.
माझे नियमित रेग्युलर काम बघुन गटशिक्षणाधिकारी मा. मुंडे साहेबांना माझे काम आवडायचे.13 जून 1987 ला माझे लग्न झाले. पती आयुध निर्माणी भद्रावती येथे नोकरीवर असल्यामुळे स्थानांतराचा प्रश्नच नव्हता.त्याच वर्षी डी.एड्.पास झाले. माझे तीन नंणद, एक दिर, नोकरी, घरातील सर्व कामे सांभाळून मी स्वतःचे शिक्षण चालू ठेवले.सोबतच बी.ए. पास झाले.जेव्हा मी माझ्या शिक्षण विभागातील शिक्षकाचे कार्य बघुन मला सुध्दा वाटु लागले की आपल्याकडे ड्रिगी असताना का बरे शिक्षकी पेशेत जाऊ नये. मी शिक्षक नियुक्तीची परीक्षा दिली व मला जि.प.चंद्रपूर अंतर्गत भद्रावती पंचायत समिती मिळाली.
मी शिक्षिका सेवेत 09/03/1993 ला रुजू झालेत. पण मा.गटशिक्षणाधिकारी यांनी लिपिकांचे अनुभव असल्यामुळे रुजू होण्याकरीता फक्त एक दिवस कन्या शाळेला रुजू होऊ दिले. व पंचायत समिती कार्यालयात कार्यरत ठेवले.पण माझ्याकडे दुसर्या बाळाचे आगमन असल्यामुळे 30 एप्रिल ला आपल्या कन्या शाळेत रुजु झाले. पती डिफेन्स येथे सेवेत असल्यामुळे मी जि.प.उच्च प्राथमिक शाळा आयुध निर्माणी येथे आपसी बदली करून घेतली.याच कालावधीत एम.ए समाजशास्त्रात तसेच बी.एड्.प्रथम श्रेणीत पास झाले.पदवीधर असल्यामुळे बरेच उपक्रम शाळेत राबवावे लागत असायचे. 1998 ला पतीचे आयुध निर्माणी भंडारा येथे स्थानांतर झाले व मुली लहान असल्यामुळे 2001 ला मी जिल्हा स्थानांतर भंडारा येथे करून घेतले. मला पंचायत समिती मोहाडी मिळाले. कनिष्ठ लिपिकांचे अनुभव म्हणून गटशिक्षणाधिकारी मा विनोद चरपे साहेबांनी एक महिना कार्यालयातच कार्यरत ठेवले.त्यानंतर जिल्हा परिषद वरठी क्र1 येथे माझी नियुक्ती झाली.
जवाहर नगर येथे राहत असल्यामुळे 30 कि.मी.बसने जाणे-येणे करायची 2001 ते 2013 पर्यंत मी या शाळेत बरेच उपक्रम व विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका शोभा शेंडे यांना माझ्यावर संपूर्ण विश्वास त्या प्रकृतीमुळे वारंवार सुटीवर जायच्या जाताना मलाच चार्ज दयाच्या.मी नियमित काटेकोरपणे शैक्षणिक उपक्रम, शाळा व्यवस्थापन समिती सभा,स्नेहसंमेलन, प्रत्येक थोर पुरुषाच्या जंयती व पुण्यतिथी, पालक सभा, शालेय पोषण इत्यादी कार्यालयीन कामे तसेच नियमित वर्ग व शिष्यवृत्ती वर्ग शाळेत 9 वाजता पोहचून घेत असाची बरेच विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक सुध्दा झालेत. शिकविण्याची शैली उत्कृष्ट असल्यामुळे पालकांचा कल आपल्या पाल्यास माझ्या वर्गात बसण्यावर भर असायचा.
त्या काळात एका एका वर्गात 50-60 विद्यार्थी असायचे व एका वर्गाचे तीन -चार अ,ब,क,ड अश्या तुकड्या असायच्या. त्यानंतर पुन्हा पतीचे स्थानांतर 2007 ला आयुध निर्माणी चंद्रपूरला झालेत. मुलीच्या शिक्षणासाठी मी मुलीना घेऊन नागपूर येथील घरी शिफ्ट झालेत येथुन नागपूर ते भंडारा नियमित ट्रेन चा प्रवास घरी जायला रात्री 8-9 वाजायचे. त्यानंतर 2013 ला ऑनलाईन बद्ल्या झाल्यात.त्यामध्ये मला पाचगाव मिळाले इथे मला वर्ग तसेच मुख्याध्यापकांचा चार्ज सांभाळावा लागला.येथील पालक मनमिळाऊ बरेचदा पालक सभा घेऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्येवर काय चांगले करता येईल यावर कल असायचा. 2014 ला पदवीधर शिक्षिका म्हणून पदोन्नती झाली व मला जि.प.उच्च प्राथमिक एकलारी डिजिटल शाळा तसेच मोहाडी तालुक्यात समृद्ध शाळा मूल्यमापन अंतर्गत ‘अ ‘ श्रेणीत असलेली ही एकलारी शाळा मिळाली.या शाळेत विद्यार्थ्यांकरीता भरपूर उपक्रम राबविता आलेत.
पदवीधर शिक्षिका असल्यामुळे माझ्याकडे 6 किंवा 7 वर्ग असायचा विद्यार्थ्यांना विज्ञान प्रदर्शनात सहभागी होण्याकरीता तयारी करून घेणे, त्याचे प्रोजेक्ट तयार करणे प्रत्येक विद्यार्थ्यांची थोर पुरुषाच्या जंयती, पुण्यातिथी करीता भाषणाचा सराव घेणे, स्वच्छता अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांकडून गावात पथनाट्यातून जनजागृती करणे, या गावातील पालक शाळेत येऊन आपल्या पाल्याचे चाचणी,आकारीक पेपर प्रत्यक्ष पाहून घेत.स्नेहसंमेनात विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने सहभागी होत असत. कॉम्प्युटर आवडीने शिकुन घेण्याचा अठ्हास असायचा.जवळच गावाला लागुन 2 कि.मी.अंतरावर सनफ्लॅग कंपनी असल्यामुळे शाळेला आर्थिक सहकार्य लाभायचे किंवा विद्यार्थ्यांना 15ऑगस्ट ,26 जानेवारीला कंपनीकडून बक्षीस मिळत असत.सांस्कृतिक कार्यक्रमात येथील पालक सहभाग घेत असत. मी मुलांना कधीच कुठली इजा होऊ दिली नाही.माझी शिकविण्याची शैलीच हा माझा हातखंड होता.मी विद्यार्थ्यांना कधीच मारले नाही.त्यांना शिक्षा म्हणजे एक तर अभ्यास दुसर्या दिवशी दिलेला गृहपाठ तपासणे. माझे विद्यार्थ्यांना सांगणे होते अभ्यास समजला नाहीतर माझ्याकडून रिपीट करावयाला लावा.मी मुलांना जवळ घेऊन मायेने कुरवाळायचे. माझ्या वाढदिवसाला मी शाळेतील संपूर्ण विद्यार्थ्यांना छान जेवण कढी,भात, पोळ्या,दोन भाज्या,जिलेबी किंवा लाडू असे गोड जेवण देत असे.संपूर्ण विद्यार्थ्यांकरीता वही,नोटबुक, कंपास बाॅक्स, पाऊच, पेन प्रत्येक वर्षी वेगवेगळे गिफ्ट नागपूर वरूनच घेऊन जात असे.
2018 मध्ये माझे स्थानांतर भंडारा जिल्ह्य़ातील पिपरी येथे झाले व हीच माझ्या सेवेतील शेवटची शाळा ठरली. या शाळेत सुध्दा नेहमी प्रमाणेच उपक्रम राबवित असायची अध्यापणात नवीन तंत्राचा वापर तंत्रस्नेही म्हणून वापर व्हायचा 8 मार्च जागतिक महिला दिनी मुलीना इंदिरा गांधी, कल्पना चावला, झाशीची राणी, सावित्रीबाई फुले, मदर टेरेसा,जीजामाता अशा विविध थोर कर्तृत्ववान स्त्रीयांचा वेशभुषेत श्लोगन किंवा थोडक्यात भाषण स्वरुपात भुमिका वटविण्यास सांगायची. 22 मार्च 2020 साली कोरोणा काळ म्हणून घोषित करण्यात आला.या कालावधीत शाळा बंद पण शिक्षण सुरू होते. कधी कुठे झाडाच्या खाली तर कधी विद्यार्थ्यांच्या घरी शिकवावे लागायचे.बसेस बंद मी आपल्याच टु-व्हिलरनी शाळेत 60 कि.मी पिपरीला जात असे.या पिरेड मध्ये विद्यार्थ्यांचा ऑनलाईन ग्रुप तयार केला. शिकवायचे म्हणजे सर्कसच त्यांना होमवर्क पाठविणे ते तपासून पुन्हा वहया परत पेजेस ग्रुपवर पाठवित असे.अडचण असल्यास विद्यार्थी काल करायचे. याच काळात शासनाकडे असाही एक काळ शोध निबंध लिहून पाठविला.
बघता बघता पाच वर्ष या शाळेत निघुन गेलीत. 30 सप्टेंबर 2023 माझा सेवानिवृत्ती चा दिवस येऊन ठेपला. माझ्या कुटुंबातील आप्तेष्ट माझ्या तीन नंणद,माझे बहीण भाऊ आम्ही तीन गाडया करून नागपूर वरून पिपरीकरीता निघालोत शाळेच्या गेटबाहेर आमच्या शिक्षिका मैत्रिणीने स्वागत केलेत.माझ्या ठाणा केंद्रातील शिक्षकवृंद,अंगणवाडी शिक्षिका, आशा वर्कर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक, व पालक या माझ्या सेवानिवृत्ती कार्यक्रमास उपस्थित होते.
आजच माझ्या शाळेतील श्री. ज्ञानेश्वर बागडे सर यांचा सुध्दा याच 30 सप्टेंबरला एकाच दिवसी सेवानिवृत्त होणार होतो. मुख्याध्यापकांनी प्रास्ताविक, केंद्रप्रमुख, शाळेतील शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रवीण लांडगे, अंगणवाडी शिक्षिका उषा गाढवे यांनी माझ्याविषयी भरभरुन मनोगत व्यक्त केलेत.माझ्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते, विद्यार्थी व शिक्षक सुध्दा गहिवरले होते.मला सुध्दा सर्वाणी दिलेले प्रेम,माझी शाळा, माझे विद्यार्थी, अभ्यास व स्वतःच्या सेवाकाळातील मनोगत व्यक्त केले. मला शाल ,श्रीफळ साडीचोळी देऊन, सहपती शाळेनी पाठवण केली .मी शाळेला एक भेट म्हणून मोठे कपाट दिले. माझी संपूर्ण सेवा 37 वर्ष 2 महिने 21 दिवस झालेत. कार्यक्रमात शिक्षक, विद्यार्थी, स्वयंपाकीण ताई, संपूर्ण ठाणा केंद्रातील शिक्षक यांचेसोबत फोटो काढलेत. माझ्याकडून सर्वाना जेवण देण्यात आले.शाळेच्या बाहेर पाऊले पडत नव्हती.पण जड अंतकरणाने सर्वाचा निरोप घेतला.
“निरोपाचा क्षण आला अण, पावले झाली स्तब्ध,
बोलके झाले डोळे अन् मुके झाले शब्द “
कुसुमलता दिलीप वाकडे
दिघोरी रोड,नागपूर
======



