हळुवार प्रेम
डॉ राजेश चंद्रकांत काळे 'राजस' ता. जिल्हा नागपूर
हळुवार प्रेम
आजही तू कधी भेटलास, तर एक प्रश्न विचारीन असे मी मनाशी ठरवते. कारण हा प्रश्न आजचा नाही… तो वर्षानुवर्षे मनात साठत गेलेला आहे. तू दिसताच मात्र माझ्या प्रश्नाला बगल दिली जात होती. कधी कधी वाटते, मीच तो प्रश्न विसरून जात होते. असे का होते, हे मला कधीच उमगले नाही. पण तुझा तो तेजोमय, हसरा चेहरा पाहिला की मी स्वतःलाच हरवून बसायची आणि काहीही न बोलता फक्त तुलाच पाहत राहायची. आज हे सगळं आठवतेय, कारण त्या आठवणींची सुरुवात खूप पूर्वीची आहे.
त्या काळात मी रोज ठरवत असे, आज भेटल्यावर प्रश्न विचारायचा. तुझ्यासमोर माझी सगळी प्रश्नावली मांडायची. पण प्रत्येक भेटीत तेच घडायचं. तू समोर यायचास, आणि माझे शब्द मनातच थांबायचे. तुला भेटण्याची ओढ होती. तुझ्याशी बोलण्याची आस होती. पण प्रत्यक्षात मी तुझ्याच आवाजात, तुझ्याच डोळ्यांत पुन्हा पुन्हा हरवत जायचे. अशी कित्येक वर्षं सरली. हळूहळू माझे केस वार्धक्याच्या वळणावर जाऊ लागले, पण तुला भेटून “खूप काही बोलायचं आहे” ही भावना कधीच कमी झाली नाही. काळ पुढे गेला. भेटी कमी झाल्या आणि एक दिवस… भेटी पूर्णत: थांबल्या.
आज आपण भेटत नाही. तरीही त्या प्रश्नांची यादी माझ्याजवळ आहे. आज मी ती मनातल्या मनात वाचते. स्वतःलाच त्यांची उत्तरं मागते. काही प्रश्नांची उत्तरं मिळाल्यासारखी वाटतात, पण काही आजही अनुत्तरीतच राहतात. कधी कधी वाटते, आता या सगळ्याचा काय उपयोग? उगाच का आपण या न दिसणाऱ्या बंधनात अडकल्यासारखं वागायचं? पण हे मन मानायला तयार होत नाही. आणि मग… एक दिवस मी ठरवले. आज धाडस करायचं. आज माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मागायचीच. थरथरत्या आवाजात मी त्याला फोन लावला. पण त्याने प्रतिसाद दिला नाही. फोन उचलला नाही. एकदा… दोनदा… तेच उत्तर… शांतता.
मनात राग उसळला. इतके दिवस मी फोन केला नाही, तर त्यानेही केला नाही. माझी साधी विचारपूसही केली नाही. मनातच पुटपुटले “आता तो जगो वा… मला काय त्याचं!” हे बोलताच छातीत कळ आली. काहीतरी चुकीचं बोलल्याचा अपराधीपणाचा भास झाला. मी अस्वस्थ झाले. पुन्हा फोन लावला… पण आवाज आला, फोन संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे. तेवढ्यात दारावर बेल वाजली. मी दचकून दार उघडलं. समोर बघते तर काय…….. कुरिअरवाला उभा होता. त्याने चेहर्यावर काही तरी लावल्यासारखे वाटले,पण का कुणास ठाऊक त्याचा चेहरा, कुठेतरी पाहिल्यासारखा वाटला. त्याने नमस्कार करत स्मितहास्य दिलं आणि माझ्या हातात एक बॉक्स दिला. मी विचारलं, “कुणी पाठवलं?” तो काहीच बोलला नाही.
“तुला कुठेतरी पाहिलंय असं वाटतं,” मी म्हणाले. तो पुन्हा हसला पण काहीच बोलला नाही , सही घेतली व पार्सल देवून तो निघून गेला. पण तो गेल्यावर का कुणास ठाऊक कुणीतरी आपलं आपल्यालाच भेटायला आलं होतं व पुन्हा निघून गेलं ….असं वाटलं. दार बंद करताच माझं लक्ष त्या बॉक्सकडे गेलं. हात थरथरत होते. मी हळूच तो उघडला. त्यात आमचे दोघांचे फोटो होते. वेगवेगळ्या काळातले, वेगवेगळ्या अंतरावरचे, पण भाव एकच न बोललेलं प्रेम.
शेवटी एक पत्र होतं. मी ते अलगद उघडलं. “तू रोज प्रश्न विचारण्याची तयारी करत होतीस, हे मला माहीत होतं. पण तू भेटलीस की तुझ्या डोळ्यांत इतकं काही बोललेलं असायचं की शब्द अपुरे वाटायचे.” डोळ्यांत पाणी तरळलं..!! “मी कधी तुला थांबवलं नाही, आणि कधी जवळही ओढलं नाही. कारण काही प्रेमं हळूच जपली तरच आयुष्यभर टिकतात.” हृदय जोरात धडधडू लागलं. “मी फोन उचलला नाही, कारण आज उत्तर द्यायचं ठरवलं होतं. फोनवर नाही… तर समोर उभं राहून.” तेवढ्यात दारावर पुन्हा बेल वाजली. हृदयाचे ठोके अधिकच तीव्र झालेले होते
मी दार उघडलं. समोर पाहतो तर कोण……तो उभा होता. तोच तेजोमय हसरा चेहरा. तेच डोळे ज्यात मी आयुष्यभर हरवत आले होते. तो हळूच म्हणाला, “आज तरी प्रश्न विचारशील का?” मी हसले. डोळे पुसले. आणि म्हणाले, “आज प्रश्न नाहीत. कारण ज्या नात्यात प्रश्न असतात, त्यात शंका असते. आपल्या नात्यात… फक्त प्रेम होतं.” तो एक पाऊल जवळ आला. माझा हात हातात घेत म्हणाला, “मग या प्रेमाला नाव देऊया का?” मी हलकेच मान डोलावली. “आपलं नातं म्हणजे हळुवार प्रेम. जिथे स्पर्शाआधी विश्वास आहे, शब्दांआधी नजरा आहेत, आणि उशीर झाला तरी साथ आयुष्यभराची आहे.” तो हसला. आणि त्या हसण्यात माझे सारे अनुत्तरीत प्रश्न अखेर शांत झाले. कित्येक वर्षांनी मला, माझं हक्काचं प्रेम मिळाले.
डॉ राजेश चंद्रकांत काळे ‘राजस’
ता. जिल्हा नागपूर
==========



