विश्वाला पत्र
प्रिय ब्रम्हांड,
सा. न. वि. वि.
मी तुला प्रिय म्हटलं, कारण आहेस तू प्रिय. तुझ्याकडे सर्व काही आहे. निळे आकाश जे रात्री ताऱ्यांच्या प्रकाशात उजळून निघते, तर कधी गहन अंधारात काळीकुट्ट चादर ओढून निजतो. ही विशाल धरा, फक्त धरा नाही रे अवकाशातील ग्रह, गोल, तारे, उल्का, लघुग्रह, पिंड, पृथ्वी सारख्या सूर्यमाला. काय नाही तुझ्याकडे सांग बरं? असंख्य सजीव वृक्ष, वेली, गवत, जी नानाविध फळाफुलांनी आणि सुगंधाने विविध रंगात बहरत असतात. विशाल शांत, गंभीर तर कधी खवळणाऱ्या सागरापासून तर चंचल नद्या, ओढे, झरे, धबधबे, छोटे छोटे जलकुंभ रूपात विशाल पाण्याचा साठा घेऊन असतो. धो धो पडणाऱ्या पावसाने कधी चिंब भिजवून आनंद देतोस तर कधी होत्याचे नव्हते करतोस. नुसतं आपल्या वसुंधरेचा विचार केला तरी किती विविधता आहे. काही भागात हिरवे गर्द जंगल, कुठे पांढऱ्याशुभ्र बर्फाने आच्छादित पर्वतराजी. कुठे सुजलाम सुफलाम तर, कुठे कायम दुष्काळी स्थिती.
मी तुला सजीवच मानते. इथले दगडधोंडे, विशाल पर्वत, सतत वाहणाऱ्या नद्या, हिरवी वृक्षराजी, निळेशार पाणी, कणाकणातून वाहणारा वारा सगळे काही तर बोलत असतात. मीच तुझी भाषा समजायला कमी पडते. खूप खूप विशाल आहे तू. मानवाच्या चुकांची नको ना इतकी कठोर शिक्षा देऊ. किती तापतोस बरं. कसं जागायचं रे गरीबांनी,. तुझं एक बरं आहे. खूप लांबवू नकोस पाऊस आता. जीवाची काहीली होतेय रे. यावर्षी खूप वृक्षारोपण करणार आहोत आम्ही. नुसते वृक्षारोपण करून नाही थांबणार तर झाडांचे जतन पण करणार.
‘युनिवर्स’ तू सर्वांवर लक्ष ठेव. माझ्या सर्व गोड मैत्रिणींना हवे ते दे. त्यांना नेहमी आनंदात पाहू दे. माझे सर्व नातेवाईक, मित्र मैत्रिणी, सहकारी सुखात राहू दे.ही वसुंधरा सुजलाम सुफलाम राहू दे. या धरेचा कणकण आनंदात न्हाऊ दे, बागडू दे. एवढंच मागणं आहे बघ तुझ्याकडे. देशील ना.. !
सविता धमगाये, नागपूर
============



