सुखाचे गोंदनं’ जीवनाची ससेहोलपट.. व्यक्त करणारा कविता संग्रह : मा.डॉ.शशिकांत तोळमारे
‘सुखाचे गोंदनं’ जीवनाची ससेहोलपट.. व्यक्त करणारा कविता संग्रह : मा.डॉ.शशिकांत तोळमारे
कवी पांडुरंग मुंजाळ यांच्या सुखाचे गोंदन कवितासंग्रहाचे आई–वडिलांच्या हस्ते दिमाखदार सोहळ्यात सरस्वती क्लासेस वसमत येथे प्रकाशन झाले या कार्यकर्माचे अध्यक्ष मा.प्रा.डॉ.शशिकांत तोळमारे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नांदेडचे युवा गोंडर कादंबरीकार मा.श्री अशोक कुबडे , प्रमुख उपस्थितीत मा.श्री शामरावजी रावले, मा.प्रा.कवी आत्माराम राजेगोरे, जेष्ठ कवी मा.प्रा.मुरलीधर पंढरकर, कवी मा.दत्ता वंजे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती प्रतिमा पूजनाने झाली त्यानंतर प्रमुख पाहुण्याचे शब्द सुमनाने स्वागत करण्यासाठी अतिशय सुरेख आवाजात श्रावणी डांगे,वैष्णवी इंगळे,श्रेया राखोंडे, शितल सवंडकर स्वागत गीत सदर केले. त्यानंतर सर्व प्रमुख पाहुण्यांचे शाल,श्रीफळ हार, रोपटे व सन्मान चिन्ह देवून गौरवण्यात आले. त्यानंतर कवी पांडुरंग मुंजाळ यांच्या आई (शशिकला मुंजाळ) – वडिलांचा (श्रीरंग मुंजाळ ) भव्यदिव्य असा सत्कार ठेवण्यात आला सर्व उपस्थितांना संस्काराची जाणीव करून देणारा क्षण कवीच्या शब्दात सांगायचे झाल्यास… कित्येक वादळ पेलणारा बाप अन् नियतीला मान्य नसलेली गणित सोडवणारी माय, जिंकता जिंकता कित्येकवेळा हरणारा बाप अन् पून्हा जिंकण्याच धाडस देणारी माय फक्त आपल्या मुलांच्या स्वप्नांना आभाळ देण्याच काम करते आहे म्हणून प्रत्येकानी आपल्या आई-बापाला जपल पाहिजे, जगवल पाहिजे हा आशय ‘’सुखाचे गोंदनं..’’ या कविता संग्रहाच्या प्रकाशातून डोळ्याचे पारणे फेडणारा, ऋण व कृतज्ञतेची भावना व्यक्त करणारा होता.
त्यानंतर पाहुण्याचा परीचय झाल्या नंतर कवी पांडुरंग मुंजाळ यांचे कविता कशी जन्माला आली ? कविता का निर्माण झाली या बदल आपले व्यक्त करताना संघर्षमय जीवनाच्या याशोगाथेतून जन्माला आली कविता, समाजाच्या बेगडीपणावर समाजाच्या सु उदात्त, सु संस्कृत, सु शिक्षित, सु प्रामाणिक परंपरेवर कवितेचा जन्म झाला, मनाच्या गाभाऱ्यात विचारांचे झालेले दमण भावभावनांची झालेली कोंडी बाहेर काढण्याचा प्रामाणिक प्रयत्नावर कवितेचा जन्म झाला. त्यांच्या मनोगताने पाहुण्याची आणि सर्व प्रेक्षकांची मने जिंकली.
त्या नंतर कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. गोंडर कादंबरीचे लेखक श्री अशोक कुबडे आपल्या भाषणात कविता संग्रहाचे तोंड भरून कौतुक केले. कवी खूप अस्वस्थ असतो, तो आपल्याच भावविश्वात रममाण असतो. संयमाची शिदोरी अन् संस्कारांची श्रीमंती देणारा ‘’सुखाचे गोंदनं..’’ हा कविता संग्रह होय. त्यानंतर कवी आत्माराम राजेगोरे यांनी एक कविता आपल्या शैलीतून सदर केली त्यानंतर अध्यक्षीय भाषणात प्रा,डॉ.शशिकांत तोळमारे यांनी कवितासंग्रहाचे नाव जरी “सुखाचे गोंदनं” असलं तरी सुखाच्या गोंदनाचा शोध घेताना होणारी जीवनाची ससेहोलपट, भाव-भावनांची फरपट, संवेदनांची घुसमट, विविध कवितेच्या माध्यमातून अत्यंत जिवंतपणे व्यक्त होताना दिसते. आभाळ कवितेत आई-वडिलांनी भोगलेले दुःख, यातना, वेदना, कष्ट कवी पांडुरंग मुंजाळ यांनी अधोरेखित केला आहे. त्याच बरोबर आई कवितेत कवी आपल्या आई विषयी कृतज्ञतेची भावना व्यक्त करतात लिहतो.. तुझ्या दुधाची ग चवं, जशी मधाची ग गोडी, कसा सांगू आई तुला, तू गं आयुष्याची होडी.. आईला अशी उपमा देतो. आई म्हणजे पावित्र्याचा कळस.. अंगणातील तुळस.. आई वर्षाव अमृताचा.. आई स्पर्श चैतन्याचा अशा अनेक उपमा देतो. महत्त्वाच म्हणजे सटविने पाचवीला पुंजलेलं भविष्य बदलण्याची ताकद आई मध्ये असल्याची भावना व्यक्त करतो. पुढे कवी असे लिहितो की, भल्या पहाटे उठून, जशी दळते जनाई, कसा मांडू मी शब्दात, आई तुझी ग नवलाई.. अशी आई विषयी कृतज्ञतेची भावना व्यक्त करताना कवी हळवा होतो. पुढे असे म्हणतात की, “सारे कसे आज” या कवितेतून समाजातील लाचारी, मुखवटेगिरी, ढोंगीपणा, चंगळवादीवृत्ती, प्रेमाचे झालेले व्यापारीकरण, सत्तांद, राजकारणी इत्यादी बाबीवर अत्यंत प्रखरपणे भाष्य केले आहे. “स्पर्श तुझा होता” या कवितेत प्रियेच्या एका स्पर्शाने जीवनात काय काय बदल होतो हे सांगताना कवी म्हणतो तुझ्या स्पर्शाने शब्दाना सूर मिळतो, कोकिळेला स्वर मिळतो, मन पाखरू होतं, मन पक्षी उंच-उंच आकाशी उडत राहतो, आभाळ मुठ्ठीत येत. शब्दांना शब्द जुळून कविता जन्माला येते. “जीवन म्हणजे” काय हे कवितेतून सांगताना जीवन अस्तित्वाचे गाणे, दुःखातून सुख शोधत राहणे, काट्यासोबत गुलाब होणे, मृगजळा सोबत वाहत जाणे, कस्तुरीचा गंध होणे, सागरासम विशाल होणे, काट्याकुट्यातून चालत उंच भरारी घेणे.. अशी जीवनाचे भरजरी वर्णन केले आहे.
यानंतर प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सरस्वती क्लासेसचे ६० विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शन सहभागी होऊन प्रयोगाच्या प्रतिकृती निर्माण केल्या होत्या तो बक्षीस वितरण पार पडले त्यात प्रथम पुरस्काराचे मानकरी प्रदीप बोखारे,चंद्रकांत बोखारे, सोपान सरडे तर द्वितीय योगेश चोपडे, सुरज ठोंबरे,प्रतिक पवार, शिवशंकर करे, श्रेया पडोळे,अक्षदा कदम, सृष्टी हरबळे, श्रद्धा जाधव व तृतीय मानकरी विद्यार्थिनी श्रावणी डांगे विजेत्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.राम कदम यांनी केले तर कवी पांडुरंग मुंजाळ यांनी ऋण व्यक्त केले. प्रकाशन सोहळ्याची सांगता राष्ट्रगीताने झाली. या कार्यक्रमात संतोष काळे सर यांच्या सरस्वती क्लासेसचा मोलाचा वाट आहे. तसेच निलेश मुसळे, प्रा.गजानन हिरवे, प्रा.अशोक कऱ्हाळे, प्रा.विनोद कदम, प्रा.बालाजी सवंडकर, प्रा.प्रदीप डोंगरकडेकर, बालाजी जाधव, अभिषेक साखरे, आरती वैद्य,शारदा कुरवाडे, आदींनी परीश्रम घेतले. धनश्री कदम यांनी यांनी नववारीच्या वेशात पाहुण्याचे स्वागत केले हे विशेष या प्रकाशन सोहळ्यामुळे कवी पांडुरंग मुंजाळ यांच्या ‘’सुखाचे गोंदनं..’ या कविता संग्रहाचे सर्वत्र कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



