वादविवाद.. एक प्रभावी संवादकला; वृंदा करमरकर
सोमवारीय 'काव्यत्रिवेणी' स्पर्धेचे परीक्षण
वादविवाद.. एक प्रभावी संवादकला; वृंदा करमरकर
सोमवारीय ‘काव्यत्रिवेणी’ स्पर्धेचे परीक्षण
वादविवाद म्हणजे एखाद्या विशिष्ट विषयावर दोन परस्पर विरोधी मतांची तार्किक आणि मुद्देसूद मांडणी. वादविवाद ही एक बौद्धिक प्रक्रिया आहे. जिच्यात आपले विचार स्पष्ट, सुसंगत आणि प्रभावी पद्धतीने मांडावे लागतात. हे केवळ मतप्रदर्शन नसून, युक्तिवाद करून श्रोत्यांना पटवण्याचे कौशल्य ही असते. वादविवाद म्हणजे वाकयुद्ध नव्हे, तर विवेकी विचारांचे शास्त्रशुद्धसादरीकरण.त्यासाठी वक्त्याने विषयाचा सखोल अभ्यास करणे आवश्यक असते. कारण वादविवादामध्ये फक्त भाषणाचा गतीमानपणा नव्हे, तर दिलेल्या मुद्द्यांची तथ्यात्मक मांडणी, उपयुक्त उदाहरणे, आणि योग्य भाषा वापरणे महत्त्वाचे असते. वादविवादामध्ये विरोधकांचे मुद्दे समजून घेऊन त्याला योग्य प्रत्युत्तर देणेही तेवढेच आवश्यक आहे.
वादविवाद हा केवळ स्पर्धा किंवा कार्यक्रमांपुरता मर्यादित नाही. तो अनेक क्षेत्रांत आढळतो. शाळा,महाविद्यालयांमध्ये वादविवाद स्पर्धा घेतल्या जातात. या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, वक्तृत्व कला आणि विश्लेषण शक्ती विकसित होते. राजकारणात संसदेमध्ये विविध विषयांवर वादविवाद होतो, जे लोकशाहीसाठी आवश्यक असते. न्यायालयात वकिलांचे वादविवादच निर्णय प्रक्रियेचा भाग असतो. माध्यमांमध्येही चर्चासत्रांद्वारे विविध सामाजिक, राजकीय व आर्थिक विषयांवर वादविवाद घडतो.
वादविवाद हा मतभेद व्यक्त करण्याचा एक सुसंस्कृत मार्ग आहे. तो समाजातील विविध प्रश्नांवर विचारमंथन घडवतो, नव्या संकल्पना जन्माला घालतो आणि व्यक्तिमत्त्व विकासास हातभार लावतो. वादविवाद ही एक प्रभावी संवादकला असून ती प्रत्येकाने आत्मसात करावी. वादविवाद हा केवळ जिंकण्यासाठी नव्हे, तर समजून घेण्यासाठी आहे. यातून व्यक्तिमत्त्व विकास, समाजप्रबोधन आणि बौद्धिक प्रगल्भता साधता येते. मत भिन्नता असणे स्वाभाविक आहे, पण त्याचे सुसंस्कृत पद्धतीने सादरीकरण वादविवादातून शक्य होते. त्यामुळे आजच्या माहिती-
तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाने वादविवादासारखी संवादकला आत्मसात करणे गरजेचे आहे.
मात्र, वादविवाद करताना काही गोष्टी टाळणे आवश्यक आहे.त्यात व्यक्तिगत टीका, खोटी माहिती,आक्रस्ताळेपणा आणि इतरांच्या बोलण्यात व्यत्यय या गोष्टींचा समावेश होतो. वादविवादामध्ये नम्र, संयमी आणि तार्किक पद्धतीने संवाद साधणे महत्त्वाचे असते. नाहीतर वादविवाद करताना कुणी आक्रमक भूमिका घेतली तर चर्चेचे रुपांतर वितंडवादात होते. चर्चेचा मुद्दा दूर कुठेतरी भरकटतो आणि वादविवादात प्रश्न न सुटता नाती तुटली जातात. आजच्या ‘काव्य त्रिवेणी’ स्पर्धेसाठी आदरणीय राहुल सरांनी ‘वादविवाद’ हा वेगळा पण वैचारिक विषय दिला आहे. खरंच त्याबाबत राहुल सरांचे कौतुक करावे वाटते. आपण सर्व शिलेदारांनी स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिला आहे. त्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन..!!!
वृंदा(चित्रा)करमरकर
मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक
सांगली जिल्हा सांगली
©मराठीचे शिलेदार समूह



