Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध

पुन्हा अनुभवले आनंदाचे पर्व..!

सौ. स्वाती मराडे-आटोळे

0 4 8 2 9 3

पुन्हा अनुभवले आनंदाचे पर्व..!

तुला माझी आठवण राहील का गं.., की विसरून जाशील?’ हे वैशालीचे शब्द पुन्हा पुन्हा आठवायचे आणि वाटायचं आठवणीत तर तू नेहमीच आहेस गं.. पण आपल्या नशिबात पुन्हा भेट आहे की नाही ते मात्र माहीत नाही. शाळा संपताना संगिताशी भेट व्हायची राहिलीच. मन भरून बोलायचे राहिले आणि डोळा भरून पहायचेही. ही खंत मनात कायमच होती. आता कुठे असेल? कशी असेल.. भेट होईल का पुन्हा? मनात अनेक प्रश्न पण उत्तर मात्र नव्हते. शाळेतील अनेक मैत्रिणी आणि खो-खो, चित्रकला, लेझीम.. या तर कधीच न पुसणाऱ्या आठवणी.

माझं माहेर आणि सासर दोन्हीही शाळेच्या गावापासून दूरवर. त्यामुळे दहावी झाल्यानंतर पुन्हा कधी तरडगावला जाणेही नाही. यावर्षी काही कामानिमित्त दोनवेळा तरडगावला गेले पण परकेपणाचीच छटा जाणवत राहिली. संपर्काची एवढी आधुनिक साधने आली पण त्यासाठीही नक्की पत्ता हवाच असतो ना. तोच नव्हता. हा पत्ता मिळवण्यासाठी शेवटी मुलांनी चंगच बांधला. हजेरी शोधली, नावे मिळवली. मुलींची माहेरची घरे गाठली. माझ्या तर माहेरचाही पत्ता कुणाकडे असण्याचा प्रश्नच नव्हता पण योगायोगाने त्यांना पहिलीपासूनची माझी मैत्रीण संध्या भेटली आणि माझाही नंबर तिच्याकडून मिळाला. मुलांनी एकेकाचा फोन नंबर मिळवत कडीला कडी जोडत एक साखळी तयार केली. तयार झाला १९९४ च्या दहावी बॅचचा व्हाटस ॲप ग्रुप. ग्रुपवर येताच एकेक फोन सुरू झाले. प्रत्येक फोन तासभर बोलल्याशिवाय संपत नव्हता तरीही मन भरत नव्हतंच. ओढ लागली ती भेटीची आणि तयारी सुरू झाली स्नेहमेळाव्याची‌.

यात्रेला जोडून गेट टुगेदर घेतले तर मुलींना यायला जास्त अडचण येणार नाही. याचा विचार करून मुद्दामहून मुख्य यात्रेच्या आधीचा दिवस निश्चित झाला. त्यामुळे मुलींकडून मोठ्या उत्साहाने दखल घेतली गेली. तरीही मनात शंका होतीच.. जावे की नको. मैत्रीणींचे फोन नंबर मिळालेत तर आपले आपणच भेटावे का? मुलांना भेटून काय करायचं? मान ना मान मैं तेरा मेहमान.. असं कशाला उगाचच. पण स्नेहमेळावा नियोजन समिती ज्या पद्धतीने काम करत होती ते पाहून आम्ही मैत्रिणींनी ठरवले एकदा जाऊन तर पाहूया कसे वाटते. शाळेतही जाता येईल. शिक्षकही भेटतील.

नोंदणी केल्यानंतर जसजशी तारीख जवळ येत होती तसे आतुरता आणि येणाऱ्यांची संख्याही वाढलेली. आदल्या दिवशी नियोजन समितीतील मुलांनी सर्वांना पुन्हा वैयक्तिक फोन केले. कसे येणार, कुठून सोय होऊ शकते याचेही नियोजन सांगितले. मला फलटणमधून जाण्यासाठी विवेक गायकवाडची फाॅरच्युनर गाडी आहे त्यात तुम्ही चौघीजणी या असे सांगितले गेले. अवघडलेपण तर वाटणार नाही ना अशी मनात थोडी धाकधूक होती. पण गाडीत बसताच विवेकचे साधे व मनमोकळे बोलणे ऐकून आम्ही सगळेच गप्पांमध्ये रमलो. शाळेत पोहोचताच सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून मन, सगळ्यांचा चिवचिवाट ऐकून कान व दिलेला नाष्टा खाऊन पोट तृप्त झाले.

कार्यक्रमाचे मुख्य ठिकाण शाळेपासून सात आठ किलोमीटर अंतरावर होते तिथपर्यंत जाण्यासाठीही मुलांनी छानच नियोजन केले होते. गुलाबफूल व मिंटवाॅटर देऊन केलेले स्वागत एवढ्या उन्हातही मनास गारवा देऊन गेले. आलेले शिक्षक पाहून व त्या सर्वांचे मनोगत ऐकून अनेक आठवणी जाग्या झाल्या. काही शिक्षक, वर्गमित्र, पहलगाम हल्ल्यातील शहीद यांना वाहिलेली श्रद्धांजली भावूक करून गेली. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ज्यांच्या रजा रद्द होऊन कार्यक्रमास येता आले नाही, त्यांच्याशी सर्वांची व्हिडिओ भेट म्हणजे आम्ही सगळे एकत्र आल्याचे पाहून त्यांनाही झालेला आनंद व भेटता आले नाही याची वेदना दोन्हींचा मेळ. सगळ्याच विद्यार्थ्यांनी कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात छान जम बसवलाय हे ऐकून झालेला आनंद शिक्षकांच्याही चेहऱ्यावर पहायला मिळाला. त्यानंतर झालेले रूचकर जेवण, गप्पा आणि स्वतःचा परिचय देतानाचे हास्यविनोद, महेशचे दमदार सूत्रसंचालन व विक्रमचे त्याला साथ देण्यासाठी केलेले लेखन यात दिवस कसा सरला हे कळलेच नाही. शेवटी पुन्हा भेटूया हे आश्वासन देत जड पावलांनी सगळे निघाले.

मुली घरी सुखरूप पोहचेपर्यंत मुलांनी घेतलेली काळजी मायेचा, आपुलकीचा ओलावा देऊन गेली‌. तरडगावमध्ये आपलं आता हक्काचं कुणीही नाही ही माझी व्यथा या स्नेहमेळाव्याने दूर झाली. मी कधीही हक्काने येथे येऊ शकते याची खात्री मिळाली. या विचारांनी माझेही मन कितीतरी वेळा आनंदाश्रूत न्हाले. एक वेगळा दिवस नवी ऊर्जा देऊन गेला. ‘स्नेहबंधनाच्या आज पडल्या गाठी भेटीत तृप्तता मोठी.. भेटीत तृप्तता मोठी’, यासाठी स्नेहमेळावा नियोजन समितीचे आभार मानावेत तेवढे कमीच. विक्रम सपकाळ, तुषार मगर, आदेश जमदाडे, संतोष शिंदे, विलास लोखंडे व महेश राजपूत.. तुम्ही सर्वांनी मुलींचे फोन नंबर मिळवण्यासाठी केलेली धडपड, शिक्षकांना प्रत्यक्ष जाऊन निमंत्रण, कार्यक्रम नियोजन व आयोजन.. सगळंच अगदी मनापासून केलेत. या अविस्मरणीय दिवसासाठी खूप खूप धन्यवाद….!

सौ. स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, पुणे
सहसंपादक, साप्ताहिक साहित्यगंध.
=======

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे