भेटू कधीतरी’ पोकळ आश्वासन न ठरो; वृंदा करमरकर
सोमवारीय त्रिवेणी काव्यस्पर्धेचे परीक्षण
‘भेटू कधीतरी’ पोकळ आश्वासन न ठरो; वृंदा करमरकर
सोमवारीय त्रिवेणी काव्यस्पर्धेचे परीक्षण
‘ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी, भेटीत तुष्टता मोठी’ या गीताची आज प्रकर्षानं आठवण झाली. खरंच एक काळ असा होता, त्यावेळी गरजा कमी अन सुखाच्या कल्पना मोजक्याच होत्या.पण आनंददायी अशा त्या काळात सुखाचे परिमाण संपत्तीत मोजले जात नसे. माणुसकीची महती असणाऱ्या त्या सुवर्णयुगात मोबाईल आणि टीव्ही नव्हते ही खरे तर फार सुखासमाधानाची बाब होती. तेंव्हा माणसे सकाळीच एकमेकांची विचारपूस करायची, सुख दुःखात सामील व्हायची, आपसातल्या नात्याला त्या काळात अपार महत्व होते. त्यावेळी संपर्क साधने अगदी दुर्मिळ होती. दळणवळणाच्या साधनांची वानवा होती. आपल्या मुलांची, नातलगांची ख्यालीखुशाली पोस्टकार्डा वरून समजायची. पण परस्परातील अंतर जास्त असले तरी मने जवळ होती.
आपसात आपुलकी होती. कधी भेट झाली तर अगणित आनंद व्हायचा. शेजारपाजारचे लोक आवर्जून भेटायला यायचे. खूप सुख होतं तेव्हा.
भेटू कधीतरी तू म्हटले
विश्वास ठेवला तुझ्यावर
पण पोकळ आश्वासन ते ठरले
आता काळ बदलला आहे. संपर्क साधनं खूप आहेत. मोबाईल द्वारे क्षणात दूरवर संपर्क साधता येतो. पण या मोबाईल नावाच्या जादूगारानं साऱ्यांवर मोहिनी घातली. आभासी दुनियेचं विश्व खुलं करून दिलं. मग प्रत्येक जण त्या दुनियेत रमला. परस्पर संवाद तुटले. आभासी जडले नाते साऱ्या विश्वाचे. मग उरला संवेदना शून्य माणूस. मुलांना घरात आई वडिलांशी बोलायला वेळ नाही. नातलग तर दूरचेच झाले. मग ‘भेटू कधीतरी’ असं म्हणत कधी भेट होईना. भेटी होणे गरजेचं आहे. केवळ ‘भेटू कधीतरी’ हे पोकळ आश्वासन ठरू नये. त्यासाठी आतून ओढ हवी. जिव्हाळा हवा. आज आपल्या आदरणीय राहुल सरांनी दिलेला विषय ‘भेटू कधीतरी’ मार्मिक आहे. ढासळत चाललेल्या संवादाच्या पुलाबाबत चिंता आहे. त्यामध्ये आपण सर्व शिलेदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.
वृंदा(चित्रा)करमरकर
मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक
सांगली जिल्हा सांगली
©मराठीचे शिलेदार समूह



