जीवन एक रंगमंच
माणूस जन्माला येतो, तेव्हा त्याचे जीवन सुरू होते. जेव्हा माणसाला देवाज्ञा होते त्याला जीवनाची दोरी तुटते. तर देवानं दिलेल्या हा जीवनाच्या रंगमंचावर आपण कसे राहावे हे प्रत्येकाचे प्रत्येकाने ठरवावे. पण हे ठरवलेले सगळं सत्यात उतरते का? आपण ठरवलेले असे सर्व सत्यात अजिबात उतरत नाही. याचे कारण देवाने आपल्या आधीच नशीब लिहिलेले आहे. हा पण या नशिबावर मात कशी करायची हे मात्र प्रत्येकाच्या कार्यावर ठरलेले आहे.
माझे नशीब छान म्हणून तुम्ही काहीच कार्य न करता थांबलात तर तुमचे जीवन व्यतीत कसे होणार. जीवनातले विविध अनुभव कसे येणार . जीवनाची वाटचाल कशी होणार. सुखदुःखाचे हिंदोळ्यावर कसे बसणार. अशा अनेक प्रश्नांची ही उत्तम बाग आहे. या बागेतील फुल मात्र आपण कार्य सिद्धीस नेले तरच आपल्याला उत्तम फुले फळे मिळतात. स्वप्नमयी जगात राहून चालत नाही. ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला धडपड करावीच लागते. चांगले शिकणे, शिकल्यानंतर नोकरी, व्यवसाय अशी काम आपल्याला करावीच लागतात. तरच जीवनामध्ये आपण ठामपणे उभे राहू शकतो.
जीवनाच्या या रंगमंचावर सर्वांची भूमिका खूप वेगळी आहे. कोण संकटांच्या वादळामध्ये अडकतो, तर कोण सुखाच्या वाटेवरती आनंद घेतो. सुखात असताना हुरळून जायचे नाही आणि दुःखात असताना संघर्ष करण्याची तयारी ठेवावी. कष्ट करून सौख्याची प्राप्ती करावी. जीवनाच्या रंगमंचावर मागे वळून बघायचे नाही. पुढे पुढे चालत राहायचे. भूमिका ठाम बजावत राहायचे. जीवन रंगमंचाला तीन घंटा नाहीत. भूत,भविष्य,वर्तमान या तिन्ही काळा पैकी वर्तमान काळात छान जगून घ्यावे. भूतकाळातील घटना होऊन गेल्या आहेत. भविष्यकाळात काय आपल्यासमोर वाढून ठेवले हे माहीत नसते. तरी देखील आपण भविष्या काळाचा खूप विचार करतो आणि त्यातच आपण गुरफटून राहतो. त्यामुळे वर्तमानातले आयुष्यातले जगण्याचे राहते. वर्तमान काळाचा आनंद घ्या.सुखाने जीवन व्यतीत करा.
आपल्या शहरातील जीवन म्हटल्यानंतर नोकरदार महिला जर का असेल तर, घरातील कामे करायची,मुलांचे संगोपन करायचे,त्याचबरोबर नोकरी सांभाळून संसाराला हातभार लावायचा. यामध्ये तिच्या काही सुप्त भावना असतात त्या ती पूर्ण विसरून जाते. एक रविवार सुट्टीचा मिळतो त्या सुट्टीमध्ये कुठेतरी फोर व्हीलर काढून मस्त फिरून यायचं आनंदी जीवन जगायचं, आणि मग पुढे परत सोमवारपासून शनिवार पर्यंत परत त्या नोकरीमध्ये, घरातील कामात कोष गुरफटून राहायचं. असं हे शहरातील जीवन आहे.
आई-बाबांच्या ह्या नोकरीमुळे लहान मुले सुद्धा त्यांच्या आई-बाबांच्या प्रेमाला मुकतात. मुले मग पाळणाघरात वाढली जातात. पाळणा घरातल्या काकू चांगल्या असतील तर ठीक. त्यांना चांगल्या सवयी लागतात. आणि जर ते कुटुंब व्यवस्थित नसेल तर मात्र त्या मुलाची वाट लागते. अशा ह्या जीवनाच्या रंगमंचावरती आपण उत्तम प्रमाणे भावविष्कारातून जगतो. संयम ठेवून जगतो. मानवा जीवन रंगमंच जर का एकदाच आहे तर याचा तू फायदा घे. संयमातून जीवन जग, पण जीवनाला निश्चित आकार दे.
नोकरी कर, व्यवसाय कर, पण संसाराला सुद्धा वेळ दे. आपल्या बायका मुलांना वेळ दे. जरा त्यांच्याशी सुसंवाद साध. औपचारिक वागू नकोस अनौपचारिकतेने घरात वाग. आणि हो भूतकाळात राहू नकोस. वर्तमान काळात जग.भविष्याची चिंता कर पण भविष्याची चिंता करता करता वर्तमान काळातील आयुष्य जगण्याचे मात्र राहू नकोस. घरातील जबाबदारी स्वीकारता स्वीकारता स्वतःच्या छंद यांना पण वेळ दे. एवढ्या मोठ्या आभाळाखाली पक्षांचे पंख घेऊन गगनी उंच भरारी घे. पाय मात्र जमिनीवर ठेव.
वसुधा वैभव नाईक, पुणे
==============



