असंही घडतं कधी कधी
एक दिवस अचानक राहुल दादांचा मॅसेज आला. “आपण लवकरच नागपुरात कवी संमेलन घेतोय”. तर आपण कवीसंमेलानाचे अध्यक्ष म्हणून लाभणार आहात. संमेलन तीन तासाचे असेल. तुमचा फोटो, पत्ता, फोन नंबर पाठवून ठेवा.” मी तर आश्चर्य चकित झाले. असं कधी कुणाला कुठेही अध्यक्ष होता येते का? तरी दादांना म्हटलं ” मला काही येत नाही बा ” तर राहुल दादांचा परत आश्वासक उत्तर” मी कशासाठी आहे? सगळी तयारी करतो, ताण घेऊ नका, फक्त सोबत राहा.” मी पण मनाने तयार झाले. दादांनी लगेच मुलाखत घेऊन ‘बिनधास्त न्यूज’ पोर्टलच्या ब्रेकींगला लावली. “पाऊसधारा” काव्य समेलनाच्या तयारीला भरपूर वेळ होता, म्हणून मी निश्चित होते. यथावकाश मुलाखत झाली.
कवी सम्मेलनात दोन शब्द बोलायची तयारी करायची म्हणून सकाळी वही पेन घेऊन बसली, तोच सकाळी साडेपाच लाख फोन आला माझे थोरले दाजी वारल्याचा. अगदी पहाटे साडेचारला त्यांचे निधन झाले. बातमी ऐकूनच मी सुन्न झाले. अगदी मेंदू निरंक झाला. सगळे विचार कुठच्या कुठे पळून गेले. लगेच दादांना मॅसेज टाकला. उशीरा येणार म्हणून. एखाद्या कार्यक्रमाला आवर्जून बोलावले जाते आणि अचानक अशा आकस्मिक घटना घडतात. आजीला शेवटचा निरोप देऊन मी मैत्रिणीकडे जाऊन तयार झाले आणि संमेलनस्थळी पोहोचली. विचारमंचावरील मान्यवरांनी आणि कार्यक्रमाचे आयोजक राहुलदादांनी अगदी मनापासून स्वागत केले. खरं तर सत्कारानेच मी भारावून गेले होते.
यावेळी कवयित्री, लेखिका कुसुमलता ताई वाकडे यांच्या “पंख पैंजण” या कथासंग्रहाचे खास प्रकाशन झाले. पुस्तक चाळताना लक्षात आले की, अगदी नेहमीच्या सभोवताल घडणाऱ्या घटनांचे पडसाद कथारूपात उतरलेले. अत्यंत दर्जेदार आणि लाघवी भाषेतील कथासंग्रह सर्वानी आवर्जून वाचावा. कार्यक्रमाला लाभलेले मा. डॉ अनिल पावशेकर, मा. रत्नाकरजी तिडके, डॉ.संजय पाचभाई (संजयदा) यांचे अप्रतिम मार्गदर्शन लाभले. ‘पाऊसधारा’ या काव्य संमेलनात सर्व आदरणीय कविंच्या कविता बरसल्या. आ. कवी /हायकूकार हंसराज खोब्रागडे आणि त्यांची अर्धांगिनी कवयित्री प्रतिभा खोब्रागडे यांचे कार्यक्रमात मोलाचे सहकार्य लाभले.
सुत्रसंचालन, सत्कार आणि संपूर्ण कार्यक्रमाची धुरा राहुलदादांनी एकट्यांनी सांभाळली. कार्यक्रमात माझ्या मैत्रिणी कवयित्री /गजलकारा सिंधू बोदेले आणि आ. गायत्रीताई नारनवरे यांनी हजेरी लावली. अतिशय सुंदर आणि सुटसुटीत कार्यक्रमाचे संमेलनाध्यक्षपद मला लाभले, त्याबद्दल मी आयोजकांची मनस्वी आभारी आहे. याप्रसंगी मला आ. सविताताई पाटील /ठाकरे, आ. तारकाताई रूखमोडे, स्वाती ताई मारोडे, सुधा मेश्राम, संग्रामदादा, विष्णू दादा यांची कमी जाणवली.
सविता धमगाये, नागपूर
============



