स्वामी विवेकानंद : एक प्रेरणास्थान
अनिता व्यवहारे ता.श्रीरामपूर जि.अहिल्यानगर

स्वामी विवेकानंद : एक प्रेरणास्थान
‘सत्यम् शिवम् सुंदरम् यांचा हृदयंगम संगम म्हणजे संस्कृती’, अशी सुस्पष्ट विचारधारा मांडणारे स्वामी विवेकानंद हे केवळ संन्यासी नव्हते, तर संपूर्ण विश्वाला मानवतेचा संदेश देणारे महान विचारवंत होते. ‘युवकांचे प्रेरणास्थान म्हणून जगभर ओळखले जाणारे स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी रोजी झाला. म्हणूनच हा दिवस आपल्याकडे केवळ स्वामी विवेकानंद जयंती म्हणून नव्हे, तर राष्ट्रीय युवा दिन म्हणूनही साजरा केला जातो.
स्वामी विवेकानंद यांनी भारतीय संस्कृतीला नवा अर्थ आणि नवी उंची प्राप्त करून दिली. त्यांचा जन्म ‘१२ जानेवारी १८६३ रोजी कोलकाता (तत्कालीन कलकत्ता) येथे झाला’. त्यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त होते. त्यांचे वडील विश्वनाथ दत्त हे उच्चशिक्षित वकील होते, तर आई भुवनेश्वरी देवी या धार्मिक, कर्तव्यदक्ष व संस्कारक्षम होत्या. आईकडून लाभलेली श्रद्धा आणि वडिलांकडून मिळालेली बुद्धिवादाची दृष्टी या दोन्हींचा सुंदर संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येतो. ‘वैदिक विचारशक्ती, इस्लामी शरीरसंपदा आणि ख्रिस्ती मन असलेला भारत हे माझे स्वप्न आहे. असे ते ठामपणे सांगत. भारतीय परंपरेतील आध्यात्मिक शक्ती आणि पाश्चात्त्य विज्ञाननिष्ठा यांचा सुंदर मेळ त्यांनी घातला. धर्म म्हणजे कर्मकांड, अंधश्रद्धा किंवा केवळ ग्रंथप्रामाण्य नव्हे; तर विवेकबुद्धीने कर्माचा अभ्यास करून मानवसेवा करणे हाच खरा धर्म आहे, ही शिकवण त्यांनी समाजाला दिली.
रामकृष्ण परमहंस हे त्यांचे गुरु होते. तरुण वयातच नरेंद्रनाथांच्या मनात देव, धर्म आणि जीवनाच्या अर्थाविषयी अनेक प्रश्न होते. रामकृष्ण परमहंसांच्या सान्निध्यात त्यांना अध्यात्माची खरी दिशा मिळाली. त्यांच्या प्रेरणेतूनच त्यांनी संन्यास स्वीकारला आणि पुढे संपूर्ण भारत भ्रमण करत सामान्य जनतेचे दुःख, दारिद्र्य आणि अज्ञान जवळून पाहिले. त्यांच्या प्रेरणेतूनच स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. समाजातील दारिद्र्य, अज्ञान, विषमता आणि जातिभेद यावर त्यांनी निर्भीडपणे प्रहार केला. मानवतावाद आणि विश्वबंधुत्व या तत्त्वांचा पुरस्कार करत त्यांनी संपूर्ण मानवजातीला एक कुटुंब मानण्याचा संदेश दिला.
अमेरिकेतील १८९३ साली शिकागो येथे भरलेल्या जागतिक धर्मपरिषदेत, “My dear brothers and sisters of America” असे शब्द उच्चारताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. त्या एका संबोधनातूनच स्वामी विवेकानंदांचे व्यक्तिमत्त्व, त्यांची व्यापक दृष्टी आणि भारतीय संस्कृतीची श्रेष्ठता संपूर्ण जगाला अनुभवायला मिळाली. स्वामी विवेकानंदांचे जीवनकार्य इतके विशाल आणि गहन आहे की त्यांच्या प्रत्येक कृतीतून उदाहरण मिळते. भारतभ्रमणाच्या वेळी त्यांनी उपाशी, शोषित आणि वंचित जनतेची अवस्था पाहिली. तेव्हा त्यांनी ठामपणे सांगितले, ‘भुकेल्या माणसाला आधी भाकरी द्या, मग धर्म सांगा. ‘हाच विचार पुढे रामकृष्ण मिशनच्या कार्याचा पाया ठरला. स्वामी विवेकानंदांचे जीवनकार्य इतके विशाल आणि गहन आहे की त्याविषयी बोलताना शब्द अपुरे पडतात. एखाद्या शिंपल्यात संपूर्ण समुद्र भरावा, तशीच अवस्था त्यांच्या कार्याचे वर्णन करताना होते. देशातील अज्ञान आणि दारिद्र्य नष्ट करणे म्हणजेच खरी देशसेवा, असे त्यांचे ठाम मत होते.
आजच्या युवकांसाठी स्वामी विवेकानंदांचे विचार ‘दीपस्तंभासारखे मार्गदर्शक’ आहेत. आत्मविश्वास, परिश्रम, मानवसेवा आणि राष्ट्रप्रेम यांची शिकवण देणारे स्वामी विवेकानंद हे खऱ्या अर्थाने युगप्रवर्तक प्रेरणास्थान आहेत. स्वामी विवेकानंद यांचे ४ जुलै १९०२ रोजी अल्पवयात महाप्रयाण झाले. हीच त्यांची पुण्यतिथी म्हणून ओळखली जाते. जरी त्यांचे आयुष्य अवघ्या ३९ वर्षांचे असले, तरी ‘त्यांच्या विचारांची उंची आणि कार्याचा विस्तार अमर आहे. आजच्या धावपळीच्या, स्पर्धात्मक आणि मूल्यभ्रष्ट होत चाललेल्या युगात स्वामी विवेकानंदांचे विचार अधिकच समर्पक वाटतात. ‘त्यांनी युवकांना केवळ स्वप्ने पाहायला शिकवले नाही, तर ती साकार करण्याची ताकद स्वतःमध्ये शोधा असा आत्मविश्वास दिला.’ “स्वतःवर श्रद्धा ठेवा, परिश्रमाला प्रतिष्ठा दया,” आणि “मानवतेच्या सेवेतूनच ईश्वराची उपासना करा.हा त्यांच्या जीवनाचा सारांश आहे.”
स्वामी विवेकानंदांचे विचार म्हणजे केवळ इतिहासातील सुवर्णपान नव्हे, तर आज आणि उद्याच्या भारताचा मार्गदर्शक नकाशा आहे. ‘त्यांच्या विचारांवर चालणारा युवकच खऱ्या अर्थाने राष्ट्र उभारणीचा शिल्पकार ठरू शकतो. विचारांना दिला विवेकाचा दीप, कर्मातून जागवली मानवतेची झेप; युवकांच्या मनात चेतवला आत्मविश्वास,
तेच स्वामी विवेकानंद भारताचा श्वास..!” त्यांचे हे विचार आत्मसात करा.. ‘उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका’
“स्वामी विवेकानंद यांना विनम्र अभिवादन…!”
अनिता व्यवहारे
ता.श्रीरामपूर जि.अहिल्यानगर



