दडपलेला आवाज
समोरील स्मिता लगबगीने सकाळी सहा वाजता उठली. मोठे अंगण झाडून सळा-रांगोळी टाकून आतील घरातील कामे उरकवत असावी. नुकतेच लग्न होऊन आलेली सोबत सासु-सासरे राहत असायचे. सासरे सुध्दा नोकरीवर व पती विजय कुठल्या खाजगी शाळेत कारकून होता.दोन महिने झालेत आतून रमा काकू व दामोधर काकांचा ओरडण्याचा आवाज नेहमी यायचा. कुणाचा हुंदक्याचा आवाज येत असे पलीकडील वीणा ताई माझ्याकडे आल्यात व म्हणाल्या ” स्मिताचा तुम्हाला आवाज आला का ? ” मी म्हटले, “नेमका कुणाचा हे कळले नाही” त्या म्हणाल्या ” त्या पोरीकडून संपूर्ण कामे करून घेतात. रमा काकू तर तिचे केस ओढताना मी बघितले आहेत.”
एक महिना लोटला दुपारच्या वेळेला स्मिता भितभित माझ्याकडे आली. आणि म्हणाली “काकू माझे सासू सासरे बाहेर गेलेले आहेत व हे शाळेत गेलेत मला खूप त्रास देतात माझ्याकडे मोबाईल सुध्दा नाही. कृपया या मोबाईल नंबर वर फोन करता का ?” मला स्मिताने मोबाईल नंबर असलेला कागदाचा तुकडा दिला.मी त्या नंबरवर काॅल लावला कुणी उचलेना. स्मिता म्हणाली ” परत लावा नां काकू ” पुन्हा लावताच तिकडून हॅलो म्हणून आवाज आला. मी लगेच मोबाईल स्मिताकडे दिला. ती रडतच म्हणाली ” बाबा तुम्ही या ना मला इकडे भेटायला एकदा तरी ” मला मोबाईल परत देत म्हणाली “काकू कुणाला सांगू नका मी तुमच्याकडे आले होते म्हणून ” व ती लगबगीने आपल्या घराकडे निघाली.
दोन दिवसानंतर तिचे आईबाबा त्याच्यांकडे आलेत.तेव्हा तिकडून मोठमोठ्याने आवाज येत होता “तुमच्या मुलीला कुठलेही काम येत नाहीत संपूर्ण कामे मला करावी लागतात.” रमा काकू म्हणाल्या. “आई संपूर्ण कामे मी करते. लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी भांडे कपडे धुणा-या बाईला यांनी कामावरून काढून टाकलयं ” स्मिता सांगू लागली. बाबा म्हणाले, “चलं पोरी कपडे बॅग घेऊन ये. तीन चार दिवसांनी परत येशील. ” रमा काकूचा मोठयाने आवाज “तुम्ही जर आता घेऊन गेलातं तर परत पाठवायचे नाही आमच्याकडे.” वडिलापुढे मोठा प्रश्न पडला. आल्या पावली आईवडील परत गेलेत. स्मिता पाठमोर्या आईवडिलांच्या मूर्तीला भरलेल्या डोळ्यांनी बघत होती.
अधून मधून रमाकाकूच्या घरातील दबका आवाज यायचा. शेजारील तीन चार कुटुंबानी काहीतरी ठरवलंय रविकांत दादा त्यांची पत्नी उषा, दोडके पती पत्नी, राहुल भाऊ व सविता वहिणी यांच्या मनात काही वेगळेच सुरू होते. माझ्याकडे त्या घरी आल्यात व म्हणाल्यात “ताई तुमच्याकडे स्मिताच्या वडिलाचा नंबर आहे ना ?” मी प्रथम नाही म्हटले निशा वहिणी म्हणाल्यात “स्मिताचा त्रास बघवत नाही. तिच्याकडून काम तर करून घेतात; त्यापेक्षा उशीरा जेवण आणि थोडया थोडया गोष्टीला मारहाण बघवत नाही.”
सविता वहिणी बोलल्यात तिच्या आईवडीलांना खरं काय ते सांगायचं. एखादया मुलीस मरणाच्या दारात ठेवणे योग्य नाही. नकळत काही वाईट घडायला नको. मी मधेच बोलली माझ्याकडे स्मिताच्या बाबाचा मोबाईल नंबर आहे. पण मला भिती वाटते म्हणून मी आपणास नाही म्हटले. राहुल दादानी स्मिताच्या वडीलास फोन लावला. रविकांत दादा बराच वेळ बोलत राहिलेत. दुसर्याच दिवशी स्मिताचे वडील व एक पोलीस रमाकाकूच्या दारात उभे बाबा लांबच उभे होते.
पोलीस स्मिताच्या सासऱ्यांना म्हणालेत, ‘तुमच्याबद्दल आमच्याकडे तक्रार आली असल्यामुळे आम्ही मुलीस तिच्या वडीलाकडे सोपवित आहोत’. आपणास जे काही सांगायचे ते पोलीस स्टेशनला येऊन बोला. कुटुंबीय तक्रार निवारण केंद्रातून एक वर्षाच्या आतच मुलीची सोडचिठ्ठी झाली. नंतर एका समजुतदार व शिक्षक असलेल्या मुलांशी स्मिताचे लग्न झाले व ती आता आपल्या घरी आनंदाने नांदत आहे.
सौ.कुसुमलता दिलीप वाकडे
दिघोरी रोड,नागपूर



