अंकांची बहार ….बे दुणे चार’; शर्मिला देशमुख
मंगळवारीय बालकाव्य स्पर्धेचे परीक्षण
‘अंकांची बहार ….बे दुणे चार’; शर्मिला देशमुख
मंगळवारीय बालकाव्य स्पर्धेचे परीक्षण
पाढ्याच्या गाण्याची रेकॉर्डिंग …आता म्हणाल, पाढे आणि गाणे ? होय ,बरोबर वाचताय ! पाढेच गाण्याच्या तालासुरात म्हणून त्याची रेकॉर्डिंग माझ्या बालपणी माझ्या गुणवंत, आदर्श शिक्षकांनी त्याकाळी केली होती. ‘टू इन वन’ म्हणजेच टेप आणि रेडिओ एकत्र आणि तोही जिल्हा परिषद शाळेत सापडण्याचा दुर्मिळ योग असणाऱ्या काळात आमच्या त्या काळच्या गुरुजींनी “बे एक बे ..बे दुणे चार” हे गाणे रेकॉर्डिंग केले होते. मी इतकी भाग्यशाली की त्याच शाळेत मला प्रथम नेमणूक मिळाली. रेकॉर्डिंग करणारे गुरुजी जरी नसले, तरी त्यावेळी लहान वर्गाला शिकवणारे गुरुजी माझ्या सहकाऱ्यांमध्ये होते आणि हे माझ्यासाठी खूप गौरवाचेच..!
सांस्कृतिक कार्यक्रम बसवण्यासाठी तो टेप काढला आणि जुन्या कॅसेट सापडल्या. जिज्ञासा म्हणून ऐकल्या तर काय त्यात तेव्हाच्या पाढ्यांची रेकॉर्डिंग सापडली आणि सौख्य ते काय असावे ? माझे पाऊल जणू गगणातच चालत असल्याचा भास मला झाला. एखादा राष्ट्रीय पुरस्कार भेटल्याचा आनंद मला मिळाला असे वाटले, त्यात नवल ते काय?
आज राहुल दादांनी “आम्ही बालकवी” समूहात ‘बे दुणे चार ‘हा विषय दिला आणि बालपणीपासूनचे सर्व प्रसंग जणू क्षणात नजरेसमोरून गेले आणि ते पाढ्याचे गाणे दिवसभर कानात ऐकू येऊ लागले. आज स्पर्धा असल्यामुळे की काय समूहात (रोजच्या लेखणीच्या तुलनेत ) बालकाव्यांची बे दुणे चार ,चाराचे आठ आणि आठचे सोळा असे गणित वाढतच गेले आणि तब्बल दोन चा पाढा पार करत या रचना बावीस वर जाऊन पोहचल्या. पाढ्याबरोबर वेगवेगळ्या कल्पना गणिताच्या ,अंकांच्या विश्वाभोवती फेर धरून नाचू लागल्या. सर्वजण जणू बे दुणे चार आज दिवसभर घोकून पाठ करत होते आणि आपल्या बालपणात पुन्हा पुन्हा जाऊन राहिलेले विसरलेले पाढे पाठ करण्याचा आणि पुन्हा पुन्हा बालपण जगण्याचा ते आनंद घेत होते.
बालजीवनात सगळ्यात सोपा असणारा आणि शंभर पर्यंत उजळणी येण्याआधी पाठ असणारा पाढा आज अशा आनंद आणि मनोरंजक दुनियेत घेऊन गेला.पाढ्यासोबत गणिते ,अंक, गुणाकार यांची आकडेमोड तर झालीच पण निसर्ग ,बालमनाच्या कल्पना , खेळ,छडीचा मार, सामाजिक नियम, निसर्गाशी गट्टी,आई बाबांचे प्रेम, मित्र मैत्रिणींसोबत मस्ती, आवडत्या खाऊंची मेजवानी, व्यावहारिक ज्ञान, अशा विविध कल्पना समुहात पाढे म्हणू लागल्या. सर्व ताई दादांच्या कल्पक रचना अप्रतिम आणि आनंददायी होत्या. सर्व ताई दादा पाढे म्हणण्याचा मनसोक्त आनंद घेत होते.
पाढे हे गणिताचा अविभाज्य अंग आहेत आणि ते रटाळ न बनवता मनोरंजक बनवले तर पाढे पाठांतर घोकंपट्टी न ठरता मनोरंजन ठरू शकते हे शिलेदार ताई दादांनी आज दाखवून दिले आहे. तरीही या कल्पनांमध्ये आणखीही विविधता आणता आली असती असे मला वाटते. तसेच लिखाणातील सातत्य जर असेच टिकून राहिले तर नक्कीच “बे दुणे चार आणि अंकांबरोबर कल्पनेला आलेली बहार” सार्थकी ठरेल. आदरणीय राहुल दादांनी मला “आम्ही बालकाव्य “समूहातील स्पर्धेचे परीक्षण लिहिण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे कायम ऋण व्यक्त करून थांबते . धन्यवाद….!!!
शर्मिला देशमुख -घुमरे, बीड
परीक्षक, सहप्रशासक कवयित्री लेखिका
©मराठीचे शिलेदार समूह



