कशाला उद्याची वाट
बघतोस कशाला उद्याची,वाट तू गड्या अशी?
सांगता येतं नाही रे,उद्याची वेळ येईल कशी?
वचने देऊन खोटी,नको वेळ मारून रे नेऊ
तोंडचा घास हिरावून,नको रे तळतळाट घेऊ
बघतोस कशाला उद्याची,वाट तू गड्या अशी?
कशाला मुहूर्त पाहतो,चांगल्या रे कामासाठी?
गिधाडांची झालीय रे,जिकडे तिकडे खूप दाटी
स्वार्थासाठी करतात,गरिबांना ही रे दमदाटी
बघतोस कशाला उद्याची, वाट तू गड्या अशी?
सत्यम शिवम सुंदरम,म्हणूनच झाली रे काशी
उलटी फिरली काटे,सेवाच सत्तेची झाली दासी
कृषिप्रधान देश असूनही,लोकं मरती रे उपासी
बघतोस कशाला उद्याची, वाट तू गड्या अशी?
सत्ता आणि खुर्चीचा खेळ,इथं चालतो राजरोस
गहाण ठेवून डोकं मत विकती, द्यावा कुणाला दोष
मोठ्यात मोठा गुन्हा करणारी, सुटतात रे निर्दोष
बघतोस कशाला उद्याची, वाट तू गड्या अशी?
तुझ्या जन्माचा तूच शिल्पकार, जाणीव रे हवी
चैतन्याची पेरणी करण्या,रोज उगवतो रे रवी
ऊठ एकजुटीने लढण्या,सांगे संग्राम हा कवी
संग्राम कुमठेकर
ता.जिल्हा लातूर
==========



