तूच तर ती
तूच तर ती..
न पहिलेल्या स्वप्नांची पूर्ती..
तुझे जीवनी आगमन..
न जाणो कित्येक
युगांचे हे दबलेले मन..
जिथे फुटला पाझर..
तूच तर ती.
जिने जाणीले मनींचे गजर..
सरसावली घेण्या कवेत मजला..
मी ही आतुर तुझ्या सहवासाला..
तूच तर ती
जिने जिंकविले हारलेल्या मनास,
मिळे उभारी थकल्या तनास..
तूच तर ती
उद्रेक मनातील दाटलेले..
तुझ्या गारव्यात विझत गेले..
कधी पाझरलेल्या भावनांना
तू अलगत समेटून घेतलेले…
तूच तर ती.
आयुष्यसंध्येस मला भेटली..
हात हाती घेऊन..
माझी सहप्रवासी झालीस…
तुझ्या सोबतीत ना,
झळ दुःखाची लागली..
सुखातही तूच पुढे सरसावलीस…
तूच तर ती
मला समजून घेणारी..
कॉफी सोबत तुझी साथ..
तन,मन प्रसन्न करणारी..
तुझा ह्या जन्मीचा संग..
झालीस माझा अविभाज्य अंग..
तूच तर ती
माझी लेखणी
तुझ्यात होऊन जाते मी दंग..
तूच भरलास ह्या जीवनी रंग..
एकच आशा ह्या वेड्या मनीची..
कधीही न व्हावी आता..
ही काव्यसाधना कधी भंग..!
संध्या मनोज पाटील
अंकलेश्वर (गुजरात)



