Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरसाहित्यगंध

आभासी जगात, ‘विवेकाचा आधार घ्यावा’; वृंदा करमरकर

सोमवारीय काव्यत्रिवेणी स्पर्धेचे काव्यपरीक्षण

0 4 8 2 8 6

आभासी जगात, ‘विवेकाचा आधार घ्यावा’; वृंदा करमरकर

सोमवारीय काव्यत्रिवेणी स्पर्धेचे काव्यपरीक्षण

आज प्रकर्षानं मला ती घटना आठवली. माझी दूरच्या नात्यातील पार्वती काकू. तिचं लग्न झालं आणि सहा महिन्यात माझ्या काकाला युद्धासाठी सीमेवर जावं लागलं. माझ्या लहानपणी एकत्र कुटुंब होतं. हा काका सैन्यात होता. काही दिवसांनी अचानक एक बातमी येऊन धडकली. काका बेपत्ता झाल्याची. असेच काही महिने झाले. घरच्या मोठ्या माणसांनी, काका युध्दात हुतात्मा झाल्याबद्दल मनाची तयारी केली. अर्थात त्याचा मृतदेहही मिळाला नव्हता. पण पार्वती काकू काही ऐकायला तयार नव्हती. ‘ते मला भेटायला येणार आहेत’, असं ती सतत म्हणायची. अहेवलेणी तिनं काढू दिली नाहीत. तब्बल वीस वर्ष ती काकाची वाट पहात होती. हा आभासच तिला जगायला बळ देत होता. शेवटी ती मरण पावली, पतीच्या प्रतिक्षेतच.

‘भास आणि आभास हे मनाचे खेळच असतात’. क्षितीज रेषेवर आकाश धरणीला टेकलं असं वाटतं. हवा असते, भासते पण दिसत नाही.आपल्या भवतालचं जग आभास आहे असं म्हटलं जातं. पण तरी आपण जगतोय ना.? जीवन जगताना अनेक अडचणींचा सामना करत आपण सुखाचा शोध घेतो. माणसाभोवती एक मायेचं पटल आहे. त्यामुळं हे भासमान जीवन त्याला सत्य वाटतं. मायेच्या प्रभावामुळं माणूस जीवनाच्या खेळात रंगतो. षड्रिपूही असतातच त्याच्या मदतीला. त्यामुळं हाव, मोह , ईर्षा, मत्सर काम असे विकार त्याच्या मनात निर्माण होतात आणि मग तो बरीवाईट कर्मे करतो व कर्म बंधनात बध्द होतो. वाळवंटात तहानलेल्या माणसाला मृगजळ दिसते. त्याच्या शोधासाठी तो पुढं पुढं चालतो, पण तो एक आभासच असतो.

आता आभास म्हणजे काय? याचा विचार केला तर जे नसतं ते आहे असे भासणं, म्हणजेच आभास. हे जीवन सत्य आहे असं वाटून माणूस जगण्यासाठी धडपड करतो. मृगजळामागं धावता धावता शेवटी कधीतरी ‘ओॶॅसिस’ त्याला सापडतं. मग हा आभास माणसाला जगण्याची ऊर्मी देतो असंच म्हणावं लागेल. सध्या मोबाईलच्या विळख्यात माणूस अडकला आहे. गरज ही व्यसन बनली आणि आभासी जगात माणूस रमून गेला. इतका कि तो घर, घरातील नाती,आपलेपणा विसरून गेला. त्यामुळं आपली नाती दुरावू लागली, त्याचेही त्याला भान राहिले नाही. मग आभासाच्या मागं इतकं धावणं योग्य आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. या आभासाच्या मागं लागून तरुणाई कधीकधी मोहाच्या गर्तेकडं ओढली जाताना दिसते. ही बाब चिंताजनक आहे.

कधी प्रेमभंग होतो, परीक्षेत अपयश येतं, नोकरीसाठी वणवण करावी लागते. अशावेळी ईप्सित ध्येयआभास वाटते. पण अशावेळी नेटानं प्रयत्न करून या ध्येयाची प्राप्ती करावी लागते. जीवनात कधी निराशा येते. पण म्हणून आशेचा पदर धरून अविरत प्रयत्न केले पाहिजेत. देव तरी भक्ताला दिसतो का? पण संतांनी वर्णिलेली मूर्ती तो मनात साठवून त्या ईश्वराच्या प्राप्ती साठी तो अविश्रांत प्रयत्न करतो. नाम साधना करतो. आभासामागं एका मर्यादेपर्यंत जाणं योग्य. पण विवेकशील वृत्ती बाळगून या आभासाला आपल्या मनावर स्वार होऊ देऊ नये.

आजच्या त्रिवेणी काव्य स्पर्धेसाठी आदरणीय राहुल सरांनी दिलेला ‘आभास हा’ विषय नेहमीप्रमाणेच वैचारिक आहे. शिलेदारांनी पण स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यासाठी त्यांचे आभार.

वृंदा (चित्रा) करमरकर
मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक
सांगली जिल्हा सांगली
©मराठीचे शिलेदार समूह

4/5 - (4 votes)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे