“माझी शाळा, माझा अभिमान”
कु. माधुरी घनश्याम कावडे

“माझी शाळा, माझा अभिमान”
मी वणीतील नामांकित शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमासाठी उपस्थित होते. विविध कार्यक्रम पाहताना सर्वप्रथम माझे लक्ष गेले ते सूत्रसंचालन करणाऱ्या एका विद्यार्थिनीकडे. ती वारंवार शिक्षकांशी चर्चा करून सूत्रसंचालन करत होती. इंग्रजी माध्यमाची शाळा, शाळेची सुरुवातही इंग्रजीतून. तरीही ही विद्यार्थिनी अडखळते आहे, असा प्रश्न क्षणभर माझ्या मनात आला. तेवढ्यात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. आपण पालक म्हणून आपला मराठी व जिल्हा परिषद शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि इंग्रजी शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन किती वेगळा आहे! झगमगाट, मोठी फी आणि इंग्रजी माध्यम म्हणजेच दर्जेदार शिक्षण असे समीकरण आपण नकळत स्वीकारतो; पण त्या झगमगाटामागचं खरं वास्तव अनेकदा आपल्या लक्षात येत नाही. याच क्षणी मला आठवली माझी जिल्हा परिषदेची शाळा.
ना मोठा थाट, ना झगमगती व्यवस्था, ना शाळेची सुरुवात इंग्रजीतून… तरीही २६ जानेवारीच्या कार्यक्रमात आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी इंग्रजीत अत्यंत सुंदर, स्पष्ट, आत्मविश्वासपूर्ण आणि समयसूचकतेचं भान ठेवून सूत्रसंचालन केलं. हे यश सहज मिळालेलं नव्हतं. देवानंद निकुंबे सर यांचे मार्गदर्शन, चतुर मॅडम यांची सातत्यपूर्ण मेहनत आणि पवार सरांचे शिस्तबद्ध नियोजन. या तिघांच्या अथक प्रयत्नांचा तो सुंदर परिणाम होता. शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता ओळखून त्याच्यावर स्वतंत्रपणे मेहनत घेतली आणि विद्यार्थ्यांनीही ती मेहनत मनापासून स्वीकारली.
आपण अनेकदा ऐकतो “जिल्हा परिषद शाळेत काही शिकवत नाहीत.” पण वास्तव याच्या अगदी उलट आहे. इथे प्रत्येक मूल ओळखून, त्याच्या कौशल्यांना वाव देत, त्याला आत्मविश्वासाने उभं करण्याचं काम केलं जातं. ही शिक्षकांची प्रामाणिक मेहनत आणि त्यांची बांधिलकी शब्दांत मावणारी नाही. खरं तर कोणतीही शाळा घडते ती केवळ इमारतींमुळे नाही, तर शिक्षक, विद्यार्थी आणि पालक या तिन्ही घटकांच्या सकारात्मक सहभागामुळे. पालकांनी शाळेकडे विश्वासाने आणि सहकार्याच्या भूमिकेतून पाहिलं, तर जिल्हा परिषद शाळा कोणत्याही इंग्रजी शाळेपेक्षा कमी नाहीत, उलट अनेक बाबतीत सरसच आहेत.
आमच्याकडे कदाचित सर्व सुविधा नसतील, पण जिद्द आहे, मेहनत आहे, समर्पित शिक्षक आहेत आणि घडण्याची तयारी असलेली मुले आहेत. यासाठी फक्त एकच गोष्ट हवी, पालकांचा सकारात्मक दृष्टिकोन आणि ठाम पाठिंबा. शेवटी एवढंच म्हणेन, सुविधा महत्त्वाच्या असतात, पण विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा विश्वास यांना तोड नाही. आपल्या मुलांवर विश्वास ठेवा, शाळेसोबत उभे रहा. कारण योग्य संधी मिळाल्यास कोणताही विद्यार्थी कमी पडत नाही.
कु. माधुरी घनश्याम कावडे
जि. प. उच्च प्राथ. शाळा, ढाकोरी
ता. वणी जि. यवतमाळ
=========



