Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखविदर्भसाहित्यगंध

नाते – गुरू शिष्यांचे

कुसुमलता दिलीप वाकडे

0 4 8 2 9 7

नाते – गुरू शिष्यांचे

मी कधीच वर्ग पहिला शिकविला नव्हता. कारण चौथ्या वर्गाचे स्काॅलरशिप वर्ग माझ्याकडे असायचे, म्हणूनच मला दरवर्षी चौथा वर्ग शिकवावा लागत असे. माझ्यातील शिकविण्याची शैली व कौशल्य बघून मुख्याध्यापिका शेंडे मॅडम (आता त्या हयात नाहीत) यांनी मला सत्र 2005 – 06 च्या शाळा प्रारंभलाच वर्ग पहिला देणार हे पूर्वीच सांगितले. जानेवारी महिन्यात पटनोंदणी सर्वेक्षण करावे लागायचे. वरठी (भंडारा रोड) हे गाव रेल्वे स्टेशन व सनफ्लाॅग कंपनी असल्यामुळे चांगलेच मोठे गाव होते. येथे रेल्वे स्टेशन जवळ जि.प.प्राथमिक शाळा वरठी क्र 1 व रेल्वे क्रॉसिंगच्या त्या बाजूला जि.प.प्रा.शाळा वरठी क्र 2 आहे. मी वरठी क्र. 1 ला होते. एकाच शाळेत आठ शिक्षिका प्रत्येकाला सर्वेक्षणाकरीता वेगळे वॉर्ड वाटून देण्यात यायचे, माझ्याकडे सुभाष वाॅर्ड होता. आम्ही शिक्षिका पहिल्या वर्गाच्या भरती करीता जात असायचो. मी सर्वेक्षण करताना बर्‍याच पालकांकडे जायची त्यात ‘अंकुश घाग’ या दादाकडे त्याची मुलगी ‘अक्षता’ ही 6 वर्षाची भरतीस पात्र लाभार्थी होती.

दि 26 जूनला शाळा प्रारंभ दिन असतो. पूर्वी 1 जुलै ला शाळा सुरू व्हायच्या, त्याप्रमाणे शाळा सुरु झाल्यात. माझ्या वर्गात चाळीस विद्यार्थी होते. अक्षता ही आपल्या छोट्या बहिणीला अर्थातच समिक्षाला शाळेत घेऊन यायची व आपल्या सोबतच बसवायची दोघात फक्त दीड वर्षाचा फरक असावा. मी बडबड गीत, कविता, गाणी शिकविल्यात की,ती सर्व विद्यार्थ्यांतून पटकन म्हणायची. त्यावेळेस बाराखडी होती, आता चौदाखडी आहे. ती सुंदर हस्ताक्षरात सुटसुटीत बाराखडी लिहून काढायची. समिक्षाची अभ्यासातील आवड व शिकण्याची गोडी बघून मी स्वतःच निर्णय घेतला की इयत्ता पहिलीत हिचा प्रवेश घ्यावा. त्यावेळेस आर.टी.ई.अँक्ट प्रमाणे पहिलीतील विद्यार्थी 6 वर्ष पूर्ण झालेला असावा अशी अट नव्हती. शाळेपासूनच हाकेच्या अंतरावर समीक्षाचे घर ,आई कपडे शिवायच्या तर बाबा सनफ्लाॅग खाजगी कंपनीत असल्यामुळे तिची आई अर्पणा ताईशी समिक्षाच्या पहिल्या वर्गात भरती संबंधाने मी बोलले त्या म्हणाल्या ,”ती लहान होणार मी यांना विचारुन कळविते.”

समीक्षाचे दररोज शाळेत येणे सुरूच होते. वर्गातील विद्यार्थ्यांसोबत ती सुध्दा आपली पाटी माझ्याकडून तपासून घ्यायची. माझी उत्कंठा शिगेला पोहचली. कारण चाळीस विद्यार्थ्यांत सुंदर हस्ताक्षर, लवकर समजून घेण्याची आकलनशक्ती,अक्षर ओळख,अंकाची संपूर्ण ओळख सर्व विद्यार्थ्यांपेक्षा लवकर ग्रहन केले होते.त्यामुळेच मी अंकुश दादाला अर्थात त्यांच्या वडीलांना पुनश्च घरी जाऊन भेटले व इयत्ता पहिलीतील प्रवेशासंदर्भात मी माझे मत त्यांना कळविले.हो-नाही करता करता समिक्षाचा पहिलीत प्रवेश केला.मुख्याध्यापिकेनी सुध्दा परवानगी दिली.प्रतिज्ञा लेखवर पालकांची स्वाक्षरी घेण्यात आली.दाखल खारीज रजिस्टरवर नाव नोंदविण्यात आले.नियमीत विद्यार्थ्यांसोबत आता ती पुढे अभ्यासत जाऊ लागली ही बँच 1 ते 4 वर्ग रोटेशन नुसार मी शिकविलेत.त्या कालावधीत समिक्षा खो-खो क्रिडासत्र,स्नेहसंमेलन मधील सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग, भाषण,नृत्य स्पर्धेत भाग घेत असायची.

दि. 5 सप्टेंबर ला शिक्षकदिनी स्वयंमशासन दिनी शिक्षिकेच्या वेशभूषेत छान साडीत तयारी करुन वर्गाला शिकवायची. बरीच बक्षीस जिंकत असे.समिक्षानंतर वर्गात इतरही मुली हुशार होत्या आचल,अक्षता,दिक्षा पालकांचा आग्रह माझ्या वर्गात आपला पाल्य असावा असा असायचा कारण त्यावेळेस एका वर्गाच्या चार तुकड्या असत. समिक्षाचे पुढील शिक्षण 5 ते 7 लालबहादूर शास्त्री विद्यालय भंडारा येथे झालेत.पप्पाची नोकरी बुटीबोरी नागपूर मध्ये शिफ्ट झाली म्हणून आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण हाॅलीक्राॅस इंग्लिश मिडीयम हायस्कूल बुटीबोरी येथे तर अकरावी बारावी मूळगाव रत्नागिरी येथील बाबासाहेब कोलते ज्यूनिअर काॅलेज साखरपा येथे व BSC, MSC चे शिक्षण मुंबई मध्ये आणि जाॅब सुध्दा समीक्षा मुंबईलाच करते.अक्षता साॅफ्टवेअर डेवलपर म्हणून जाॅबला आहे.

समीक्षाचा दहावीत प्रथम क्रमांक, बारावीच्या परीक्षेत काॅलेज मध्ये आणि तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त तर CSIR NET Life Science Exam मध्ये ऑल इंडिया रॅक 39 वा होता. सर्व श्रेय ती आपल्या आईबाबा व शिक्षकांना देते .आईबाबांनी आम्हा बहिणभावासांठी जे कष्ट केलेत त्याचे सार्थक मी नक्कीच पुढे चालुन करणार अशी तिची मनोकामना आहे. मला समीक्षा 5 सप्टेंबर शिक्षकदिनी व गुरुपौर्णिमेला मॅसेज किंवा आवर्जून फोन करते. पुढील उज्वल भविष्याकरीता समीक्षाला भरभरून आशिर्वाद व अनेक शुभेच्छा !

कुसुमलता दिलीप वाकडे
दिघोरी रोड,नागपूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे