दुपटा
माझ्या दुपट्याची मी, किती सांगू नवलाई।
त्याच्याविन नाही रे, कोणाचीही भलाई.।।
कधी बापाचा शेला होतो, कधी मायेचा पदर।
जिवाभावाने जपतो अन्, करी जीवाची कदर।।
दुपट्याने झाले मायबाप, जन्मोजन्मीचे साथी।
तयामुळे उजळल्या मम , आयुष्यातील वाती।।
जन्म झाला तेव्हा आलो,मी नागडा उघडा।
बापाने नेसवला मला ,हा तो पहिला कपडा।।
माय शिदोरी सोडते,अन् बाप शेला हातरते।
शेतामध्ये गंगा तेव्हा, धुंद प्रीतीची झरते।।
वर्षाचे चार ऋतू हे, याचे कामही श्रेष्ठ महान।
कधी संगे सावली बनून ,कधी भागवी तहान।।
हात पाय अंग पुसे ,पुसे डोळ्यातील अश्रू।
सुख दुःखात धावतो, नसतो कोणाचाही शत्रू।।
दुपट्याच्या ठायीच आहे, सगळे चार धाम।
गळ्याभवती लपेटून बघा, बुध्द विष्णू श्री राम।।
ऊन वारा थंडी पासून, सदा जीवांना रक्षिते ।
मरणा नंतरही भल्यांचा, दुपटा कफनही असते।
गोवर्धन तेलंग
पांढरकवडा
==========



