Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकोकणक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणेसंपादकीयसाहित्यगंध

प्रितीच्या झुल्यात सखी झुलते अलवार’; स्वाती मराडे

'गुरूवारीय चित्र चारोळी' स्पर्धेचे काव्यपरीक्षण

0 4 8 2 9 7

प्रितीच्या झुल्यात सखी झुलते अलवार’; स्वाती मराडे

‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण

श्रावणातला तो झुला अन् त्यावर बसलेली तू.. कितीदा हेच चित्र माझ्या डोळ्यासमोर येतं अन् पावलांना तुझी ओढ लावतं. तू झुल्यावर झोके घेताना तो वारा सुद्धा हळुवार खोडी काढतो. झुल्यावर मागे जाताच तनुस घट्ट बिलगणारी वेणी पुढे येताच वाऱ्यावर स्वार होते नि कुंतली माळलेला गजरा जणू गंध‌ उधळून देतो. तो गंधही मनास वेड लावणारा.‌ प्रितीच्या झुल्यात तू, मन तुजसवे झुले
जाता झुला आकाशात, गंधाळले तेही खुळे..!! निळ्या आकाशात जेव्हा झुला उंच जातो तेव्हा आकाशही भरून येतं.‌ हळुवार सरी येतात नि तनमन शहारते. हृदयपाखरू हवेत झेपावत तुझ्या चर्येवरील भाव टिपत राहतं. तुझ्या ओठावरील ते मधाळ हसू, डोळ्यातील चमक नि चेहऱ्यावरील तेज.. त्या अवकाशात कसं विरघळून जायला होतं.

इंद्रधनूच्या रंगात जसं ते आभाळ रमतं
प्रितीच्या झुल्यात मन माझंही झुलतं..!

तुझ्या कंठातील हृदयी बिलगलेला हार पाहून मीही तुला बिलगतो. झुल्यासोबत होणाऱ्या तुझ्या पावलांच्या लयबद्ध हालचाली नजरेस बद्ध करतात. त्यासोबत वाजणारी पैंजणांची रूणझुण… मनविभोर करून टाकते.

प्रितीच्या झुल्यात सखी झुलते अलवार
तिच्यासवे झुले मन.. भूल जादुई सकवार.

तू नेहमी मला म्हणतेस.. तू ही बस ना झुल्यावर. पण मला ना तुलाच झोका घेताना पहायला खूप आवडतं‌. तुला पाहताना होणारा आनंद मी कसा तुज सांगू? तेव्हा वाटतं जणू ही धरतीही आनंदाने नाचत आहे. आकाशही ओथंबून खाली वाकते आहे. वारा इकडून तिकडून उगाचच भिरभिरत आहे. इंद्रधनू डोकावून पाहत आहे.. हे सगळं सगळं आठवतं नि मन तुझ्याकडे धावतं.

सावन के झुलों ने मुझको बुलाया
मैं परदेशी घर वापस आया.. |

आज पुन्हा अगदी तसंच मला तुला पहायचंय झुल्यात झुलताना.. अहं.. प्रितीच्या झुल्यात झुलताना. फूलवेलींनी सजलेला तो झुला तुझ्याचसाठी. तो उधळेल पुन्हा गंध.. वेडावेल वारा, ओथंबेल नभा.. तोच रोमांच तोच शहारा.. पुन्हा अनुभवायला. झुला आणि आनंद हे नातं जसं घट्ट आहे. तसंच आपलंही नातं घट्ट सांभाळू.

आज ‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेसाठी आलेले चित्र सखीला झुला झुलवणाऱ्या सख्याचे. अगदी जन्मापासूनच आल्हादपणाची जाणीव देणारा हा झुला पाहिला की आठवण येते ती श्रावणातील झुल्याची, आखाजीच्या झुल्याची… झुल्यावर झुलणाऱ्या राधाकान्हाच्या छबीची, झुल्यावर मौजमस्ती करणाऱ्या सख्यांची. अनेक गोड गीतांची, त्या श्रावणाचीही. आवडती व्यक्ती सोबत असेल तर नित्य श्रावणच सोबत आहे असेच वाटणार ना..! प्रितीच्या झुल्यात म्हटले की, हमखास आठवते ती मराठमोळी लावणी‌. फुलांनी सजलेला झुला आठव देतो ती ‘कुणीतरी येणार गं..’ याचीही. आज या सर्वच आनंदमयी क्षणांना शब्दकोंदण देत रचना साकार झाल्या. सहभागी सर्व रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन. आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार.

स्वाती मराडे, इंदापूर जि पुणे
मुख्य परीक्षक/ कवयित्री/ लेखिका
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह

5/5 - (4 votes)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे