दौलतमंगल किल्ल्यातील ‘भुलेश्वर’
दौलतमंगल किल्ल्यातील ‘भुलेश्वर’
पुण्यापासून ५० किमी अंतरावर असलेले ‘भुलेश्वर’ हे ठिकाण तेराव्या शतकात बांधण्यात आलेल्या शंकराच्या प्राचीन मंदिरासाठी ओळखले जाते. या मंदिरातील शिल्पे हा शिल्पसौंदर्याचा उत्तम आविष्कार आहे. भुलेश्वरच्या मंदिरात स्त्रीरुपातील गणेशमूर्तीचे दुर्मिळ शिल्प पाहता येते. भुलेश्वरचे मंदिर पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावाजवळ आहे. हे मंदिर दौलतमंगल या किल्ल्यात सामावलेले आहे. पुणे शहराच्या दक्षिणेकडे सह्याद्री पर्वताची उपरांग ‘भुलेश्वरची रांग’ म्हणून ओळखली जाते. ती रांग पूर्व-पश्चिम अशी पसरलेली आहे. त्या रांगेत सिंहगड आणि मल्हारगड यांच्या सोबतीने दौलतमंगल किल्ला उभा आहे. त्या किल्ल्याचे काही बुरूज आणि प्रवेशद्वार वगळता केवळ भग्नावशेष उरले आहेत.
‘भुलेश्वरचे मुख्य मंदिर भव्य असून ते एका पठारावर उभारले आहे:. मंदिराची उभारणी जमिनीपासून उंच चौथऱ्यावर केली आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे. संपूर्ण मंदिर दगडात कोरण्यात आले आहे. मंदिराच्या चौथऱ्यावर प्रवेश करायच्या आधी पाय-यांजवळ असलेल्या द्वारपालांच्या मूर्ती लक्ष वेधून घेतात. मूर्तीच्या शरिरावरील दागिन्यांचे कोरीवकाम आकर्षक आहे. उजव्या बाजूच्या मूर्तीशेजारी वाघ हत्तीवर आक्रमण करत आहे असे शिल्प कोरलेले आहे. मुख्य मंदिरावर मोठी पितळी घंटा टांगलेली आहे. मंदिरासमोर प्रशस्त फरसबंद आवर आहे. आवारातून दर्शनी मंडपात प्रवेश करण्यासाठी तिन्ही बाजूना प्रवेशद्वारे आहेत. आतील बाजूस उत्तुंग घुमटाकृती रचना असल्याने दगडातला थंडावा उन्हाळ्यातही टिकून असतो. मंदिरात मोठ्या प्रमाणात मानवी व देवतांची शिल्पे आहेत. देवळाभोवती असलेल्या ओवऱ्यांमध्ये अनेक मूर्ती आहेत. काही ओवऱ्या रिकाम्या आहेत भिंतींवर कोरीवकाम, मूर्तीकाम केलेले आहे.
मुख्य सभामंडपाच्या भोवती असलेल्या अर्धभिंतींवर युद्धप्रसंग, सिंह, हत्ती इत्यादी प्राणी व रामायण- महाभारतातील प्रसंग कोरलेले आहेत. महाभारतातील प्रसंग भारतातील इतर मंदिरांपेक्षा येथे जास्त रेखीव आहेत. द्रौपदी-स्वयंवर, शरपंजरी भीष्म, हत्तीला आकाशात फेकणारा भीम ही कथानकशिल्पे, तसेच मातृकादेवी, गणपती, विष्णूंचे अवतार, योद्धे, पक्षी इत्यादी विविध प्रकारचे शिल्प या मंदिरात आढळतात. कुंभ, कमळ कीर्तिमुख, मकर, पाने-फळे, वेलबुट्ट्या, घंटा ही शुभचिन्हे मंदिराच्या सुशोभनात वापरलेली आहेत. तेथील दर्पणधारी स्त्रीमूर्ती शिल्पकलेचा सुंदर नमुना आहे. दक्षिण दरवाज्यावर असलेल्या भरत-शत्रुघ्नाच्या डाव्या बाजूस दोन चौघडावाले उंट दाखवलेले आहेत. दक्षिणेकडील मंदिरात उंटाचे शिल्प क्वचितच आढळते. माळव्यात प्रचलित असलेल्या भूमिज उपशैलीचा प्रभाव तेथील काही शिल्पांवर ठळक आढळतो.
- सौ. स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, पुणे
सहसंपादक, साप्ताहिक साहित्यगंध.



